समृद्धी तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली आणि थोड्याच वेळात दोन मुलगे घरी आले. समृद्धीच्या आईने त्यांची ओळख विचारली. अमोल आणि विदित. आम्ही समृद्धीचे मित्र आहोत असं दोघांनी सांगितलं. अभ्यासाबद्दल काहीतरी डिस्कस करण्यासाठी ते समृद्धीकडे आले होते. ती घरी नाही हे बघून दोघेही निघून गेले. इकडे आईच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं. वयात येणाऱ्या मुलीने मुलांशी मैत्री करावी, मुलांनी असं घरापर्यंत यावं हे काही आईला पटत नव्हतं. समृध्दीने मैत्रिणी कराव्यात. मित्र कशाला हवेत? असे प्रश्न तिच्या मनात येत होते.
कधी एकदा समृद्धी घरी येते आणि तिच्याशी हे बोलते असं आईला झालं होतं.ती घरी आल्या आल्या आईने हा विषय काढलाच.
'समृद्धी अभ्यासाबद्दल बोलायला कुणी अमोल आणि विदित आले होते. तुझे मित्र आहेत असे म्हणाले ते...' '
हो ते माझे मित्र आहेत क्लासमधले' समृद्धीने लगेच सांगितलं.
' पण काय गं तुला क्लासमध्ये कोणी मैत्रिणी नाहीत का?' आईच्या प्रश्नाचा रोख काही समृद्धीला कळाला नाही.
' हो मला मैत्रिणी आहेत आणि मित्रही!' असं समृद्धी सहजपणे म्हणाली. ' पण तू शक्यतो मैत्रिणीसोबत राहात जा!' आई हे का म्हणतेय याचा अंदाज अजूनही तिला येत नव्हता. ' पण का?' या समृद्धीच्या प्रश्नावर आईने स्पष्ट सांगितलं, ' अगं वयात येतेय ना तू... मुलांना मित्र असतात आणि मुलींना मैत्रिणी. एवढं मला कळतं!' आईचे हे विचार ऐकल्यानंतर समृद्धीचाचाही सूर बदलला. ' हो.. पण हा काही नियम नाही ना!' तिनेही घाबरता आपलं म्हणणं मांडलं.
आई मुलींशीच मैत्री कर असा आग्रह करत होती तर मुलगे आपले मित्र आहेत यात समृद्धीला काही विशेष काही वाटत नव्हतं.
हा वाद एकट्या समृद्धीच्याच घरात चालतो असं नाही. मुलगा आणि मुलगी यांची मैत्री अमान्य असणारी बहुतेक घरं आहेत. मुलांचं आणि पालकांचं काही समाधान होईल असं काही या वादातून साध्य होत नाही. पण मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्रीवर संशोधकांनी अभ्यास केला आहे. आणि मुलामुलींच्या सर्वांगिण विकासासाठी अशी मैत्री कशी उपकारक असते हे संशोधकांनी आपल्या अभ्यासातून मांडलं आहे.
मुलामुलींची मैत्री? काय त्यात वाईट?
१. मैत्री महत्त्वाची. मुलाने मुलाशी आणि मुलीने मुलींशीच मैत्री करावी असा नसलेला नियम केवळ पालक आहे म्हणून मुलांवर लादायला गेल्यास मैत्रीतील नैसर्गिकता निघून जाते.
२. मुला मुलींच्या मैत्रीतून मुलगे मुली नैसर्गिकपणे एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकतात. अभ्यास सांगतो की लिंगसापेक्ष नियम अशा मैत्रीतून पुसले जातात.
३. एखादी समस्या कशी सोडावी याचं कौशल्य मुलगे आणि मुलींमध्ये मैत्रितूनच विकसित होतं.
४. मुली प्रत्येक गोष्ट बोलून मोकळ्या होतात. तर मुलगे नियमांना चिकटून राहातात. या त्यांच्या स्वाभाविक गुणधर्मांची मुलगा मुलींमध्ये देवाणघेवाण मैत्रीतूनच होते.
५.मुलींसोबतच्या मैत्रीतून मुलग्यांनाही आपल्या भावना व्यक्त करण्याची प्रेरणा मिळते.
६. मुलगे मुलींच्या मैत्रीतून मुलगे आणि मुलींभोवतीचा लिंगसापेक्ष साचेबध्दपणा मोडला जातो. आपल्यातील गुण-आवड यांना प्रोत्साहन मिळून मुक्तपणे जगण्याचा दोघांचाही कल वाढतो.
७.एकत्र खेळताना मुलींमध्ये मुलग्यांमधली स्पर्धात्मकता आणि मुलग्यांमध्ये मुलींमधली भावनिकता निर्माण होण्यास मदत होते. शिवाय मैत्रीमुळेच जेंडर बायस कमी होतात.
८. मुलगा आणि मुलगी यांच्यात मैत्री आहे म्हणून आरडाओरड न करता ही मैत्री स्वाभाविक आहे ही जाणीव निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी असल्याचं अभ्यासक म्हणतात.
मुलगे आणि मुलींच्या मैत्रीतून काय मिळतं याबाबत अधिक वाचा या लिंकवर
https://urjaa.online/what-wrong-with-girl-boy-friendshipparents-need-to-know-about-value-of-boy-girldfriendship/