टीनएजर मुला मुलींचं वागणं आज अनेक आई बाबांचा चिंतेचा विषय झाला आहे. जेव्हा या किशोरवयीन मुलांचा हट्टीपणा, चिडचिड, आतातायीपणा हा पालकांना झेपेनासा होतो तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की आपण आई बाबा म्हणून कुठे कमी पडलो? काय चुकलं आपलं म्हणून मुलं अशी वागतायेत. ही मुलं जर अशीच वागली तर त्यांचं भविष्यात कसं होईल ही चिंताही पालकांचं मन पोखरत असते.
आई बाबांना मुलांच्या अशा वागण्याचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. पण किशोरवयीन मुलं मुली असं का बरं वागतात याचा कधी विचार केला आहे का आई बाबांनी? किशोरवयीन मुलांच्या समस्या हाताळणारे तज्ज्ञ म्हणतात की मुलांच्या वयाच्या या टप्प्यावर आई बाबा आणि मुलं यांचं नातं खूपच नाजूक आणि संवेदनशील होतं. हा असा टप्पा आहे जिथे आई बाबा मुलांचे छान मित्र बनू शकता नाहीतर मुलांच्या आणि पालकांच्या मनात एकमेकांविषयीची अढी निर्माण होते. तज्ज्ञ म्हणतात की टीनएजर मुलंमुली कसं वागतात याचं मूल्यमापन करण्याआधी आधी आई बाबांनी मुला मुलींचे चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करायला हवा. हे झालं तर आई बाबा आणि मुलं यांच्या नात्यात विसंवादापेक्षा मोकळेपणा येईल. घरातलं वातावरण हसतंखेळतं राहील. मुलांना आपल्या कोणत्याही समस्येत आपल्या आई बाबांचा आधार वाटेल.
छायाचित्र- गुगल
मुलांचे मित्र होण्याच्या मार्गाचे हे फायदे खूप छान वाटतात पण म्हणून प्रत्येक आई बाबांना आपल्या किशोर वयातल्या मुला मुलींशी मैत्री करता येतेच असं नाही. ही मैत्री करणं अवघड वाटत असलं तरी तज्ज्ञांनी काही मार्ग सांगितले आहे. त्याचा अवलंब केल्यास आई बाबा आणि किशोरवयीन मुलं मुली यांच्यात घट्ट मैत्री निर्माण होऊ शकते.
टीनएजर मुला मुलींशी मैत्री करण्याचे मार्ग
1. मुलांचा आधार बना
किशोरवयीन मुला मुलींशी मैत्री करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा मुलांना त्यांच्या भविष्यात होणार असतो. आई बाबांसोबतची मैत्री मुलांना संवेदनशील, संमजस, परिपक्व बनवण्यास मदत करत असते. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येतात.
किशोरवयीन मुला मुलींशी मैत्री करण्याचा सोपा मार्ग म्हणजे मुलांचा आधार होणं. तज्ज्ञ म्हणतात की या टप्प्यावर अनेक आई बाबा इथेच चुकतात. ते सतत मुलांवर टीका करत राहातात. तुझं हेच चुकलं, तुला हे जमतच नाही म्हणत त्यांचे टीकाकार होतात. पण नेमकं याच टप्प्यावर मुलं सैरभैर असतात. त्यांच्या मनात हे का ते असा गोंधळ उडालेला असतो. ते आई बाबांकडे मोठ्या आशेने ते आपली मदत करतील म्हणून पाहात असतात. आई बाबांनी आपल्या आधारासाठी आपल्या जवळ असावं ही त्यांची इच्छा असते. नेमक्या याच वेळेस जर आई बाबांनी टीकेचे अस्त्र उगारलं तर मात्र दुरावा निर्माण होतो. म्हणूनच टीका करण्यापेक्षा आई बाबांनी मुलांना आधार देणं गरजेचं आहे. त्यांना काय म्हणायचंय हे शांततेनं समजून घेण्याची, त्यांचे निर्णय, मतं कितीही फालतू असले तरी ते आधी ऐकून घेण्याची भूमिका आई बाबांनी घ्यायला हवी. मुलं जर काही चुकत असतील तर चुकांवर बोट ठेवण्याआधी, त्यावर काट मारण्याआधी या चुकातून ते काय शिकले या विषयावर त्यांच्याशी समजूतीनं बोलणं गरजेचं असतं. पुढच्या वेळेस तुला चांगलं जमेल हा विश्वास देऊन त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं असतं.
छायाचित्र- गुगल
2. मुलांच्या नाजूक वयाला समजून घ्या
किशोरवयातल्या मुला मुलींच्या शरीरात मनात बदललेल्या हार्मोन्समुळे खूप काही वेगळं घडत बिघडत असतं. आपल्या शरीर मनातल्या या स्थित्यंतराबद्दल मुलं मुली फारशी बोलत नाहीत. काय होतंय, या बदलांना कसं सामोरं जावं हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. तेव्हा आई बाबांनी स्वत:हून मुलांच्या मनातलं समजून घ्यायला हवं. यासाठी त्यांना काय होतंय हे सांगण्याची बळजबरी करण्यापेक्षा आपल्या वागण्यातून त्यांच्यात असा विश्वास निर्माण करावा की ते हळूहळू आपल्या मनातलं बोलू लागतील. हा विश्वास मुलांमधे निर्माण होण्यासाठी त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी संवाद साधत राहाणं महत्त्वाचं असतं.
3. वेळ काढा आणि वेळ द्या
आई बाबा आपल्या कामात व्यस्त, मुलं मुली आपल्या शाळा, कॉलेज, अभ्यास , क्लास, छंद यात व्यस्त. त्यामुळे एकमेकांना वेळ देता येणं हे अवघड होऊन जातं. पण कामाच्या व्यस्ततेतून थोडा वेळ मुलांसाठी काढणं गरजेचं असतं असा सल्ला तज्ज्ञ पालकांना देतात. एकत्रं जेवणं, गप्पा मारत जेवणं, एकत्र टीव्हीवर सिनेमा बघून त्यावर बोलणं, मुलांसोबत बैठे खेळ खेळणं, त्यांच्या सोबत बाहेर थोडं फिरायला जाणं अशा पध्दतीनं आई बाबा मुलांना सहज थोडा वेळ देऊ शकतात. या वेळेत मुलांसोबत घालवलेले क्षण, त्यांच्यासोबत केलेले हास्यविनोद, गप्पा यामुळे मुलं खुलतात. मुलांना हे लक्षात येतं की आई बाबा आपल्याला वेळ देतात. आपली काळजी घेतात. मुलांना समंजस बनवण्यासाठी मुलांमधे आई बाबांबद्दल अशा भावना निर्माण होणे अतिशय गरजेचं असतं.
छायाचित्र- गुगल
4. मुलांकडेही करावं मन मोकळं
सतत मुलांनीच आपल्याल काहीतरी सांगावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं असं तज्ज्ञ सांगतात. ही चूक सुधारण्याचा मार्ग म्हणजे आपल्या मनातलं आपण आपल्या मुलांनाही सांगायला हवं. काही अडचण वाटत असल्यास ती मुलांना सांगून यावर तुला काय मार्ग सुचतो हे त्यांना विचारायला हवं. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचं मत, विचार घ्यायल हवेत. यामुळे मुलांनाही आपण आपल्या आई बाबांना किती महत्त्वाचे वाटतो ही भावना निर्माण होते. आई बाबांचा आपण आधार असल्याचं समाधान त्यांनाही मिळतं.
या अशा सोप्या मार्गांनी आई बाबा आणि किशोरवयीन मुलं मुली यांच्यात घट्ट मैत्री होवू शकते असं तज्ज्ञ म्हणतात.