Join us  

मुलांना लागलेलं मोबाइलचं व्यसन कसं सुटेल? मुलं मोबाइल ॲडिक्ट झाल्याची १० लक्षणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 3:40 PM

What do you do when your child is addicted to their smart phone? : मुलांच्या हातात मोबाइल आहेत, तंत्रज्ञान त्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहेच; फक्त त्याचा गैरवापर करायचा नाही हे मुलांना कसं शिकवणार? parents-kids and mobile addiction.

ठळक मुद्देआपण मुलांना स्क्रीन ॲडिक्ट होण्यापासून वाचवू शकू. त्यासाठी पालकांनी सतर्क राहायला हवं.

डॉ. ऋचा सुळे

‘आमच्या काळात फारच सोपं होतं डॉक्टर ! परीक्षा जवळ आली की वडील घरातलं केबल कनेक्शन दोन महिने बंद करुन टाकायचे आणि मैत्रिणींबरोबर मोजकाच वेळ आई खेळायला सोडायची ! बाकी वेळ अभ्यास एके अभ्यास!’-एका सहा वर्षांच्या मुलाची आई माझ्याशी बोलत होती. त्यांच्या चिंतेचं कारण म्हणजे त्यांचा पहिलीत शिकणारा मुलगा. तो दिवसभर मोबाइल घेऊन बसतो आणि मोबाइल हातातून काढून घेतला तर चिडचिड करतो. अभ्यासाचा सर्व वेळ युट्यूबवर कार्टून पाहण्यात नाहीतर सबवे सर्फ खेळण्यात घालवतो.

आजकालच्या अनेक पालकांसमोर हीच समस्या उभी राहिली आहे. नवीन पिढीची मुलं सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा लवकर वापर करायला आधीच शिकली आहेत. त्यात गेली दोन वर्षे शालेय शिक्षणासह बहुतांश कामांसाठी आपण त्याच तंत्रज्ञानावर अवलंबून होतो. मोठेच जर मोबाइल, टॅब, लॅपटॉपचा एवढा प्रचंड वापर करतात तर मुलांना ते सारं वापरण्यापासून थांबवायचं तरी कसं? पण, मग तंत्रज्ञानाचा योग्य आणि योग्य तितका वापर मुलांनी कसा करावा? यात पालकांची भूमिका काय असावी? समजा आपलं मूल तंत्रज्ञान व्यसनाच्या सापळ्यात अडकत चाललं असेल तर पालकांनी काय करावं?

(Image : Google)

मुलांच्या हाती मोबाइल, पालकांना काय करता येईल?

कोरोनाकाळ खरंतर आपल्या सर्वांनाच तंत्रज्ञानाच्या आणि खास करुन सर्व प्रकारच्या स्क्रीन्सच्या फार जवळ घेऊन गेला आहे. मग ते कामासाठी झूमवर मिटिंगचं निमित्त असो वा जुन्या मित्रमैत्रिणींना फेसबुक-व्हॉट्सॲपवर शोधून नव्यानं कनेक्ट करणं असो. लॉकडाऊन काळात तर अनेक लग्नांना आपण ऑनलाइनच हजेरी लावली. आपली मुलंही घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेऊ लागली. परिणाम आपल्या सर्वांचाच स्क्रीन टाइम चांगल्याच प्रमाणात वाढला आहे. स्क्रीन टाइम म्हणजेच काय तर जो वेळ एखादी व्यक्ती कोणत्याही स्क्रीनसमोर घालवते तो वेळ. मग ते टीव्ही असो, लॅपटॉप- कॉम्प्युटर असो की मोबाइल, टॅबलेट की व्हिडिओ गेम. याचाच अर्थ असा की फक्त मुलंच नाही तर सिरिअल पाहणाऱ्या आजी-आजोबांचा सुद्धा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. पण, मग आपण असं का म्हणतो की फक्त मुलांनाच स्क्रीनचं व्यसन लागलं आहे? किंवा ते लागेल की काय म्हणून पालक सारखे का घाबरत आहेत?

खरंतर हा प्रश्न काही प्रमाणात बरोबरच आहे. मात्र काहीसा चुकीचासुद्धा आहे. चुकीचा यासाठी की व्यसन फक्त मुलांनाच लागतं असं नाही ते प्राैढांनाही लागू शकतं. पण त्याचं प्रमाण वाढण्याआधीच एखादी सुजाण व्यक्ती स्क्रीनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणून तर आजकाल डिजिटल डिटॉक्सचा ट्रेण्ड आला आहे. मुलं वयानं लहान, समजूतदारपणा व अंतर्दृष्टी तयार न झाल्यामुळे त्यांना कुठं थांबायचं हे पटकन लक्षात येत नाही. ते या स्क्रीनच्या जगात पुरते बुडून जाण्याची शक्यता जास्त असते.

(Image : Google)

पण मग याला पर्याय काय?

आपल्याला एव्हाना कळून चुकलं आहे की, या पिढीपासून तंत्रज्ञान आपण दूर करू शकत नाही. त्यांच्या हातातून काढून घेऊ शकत नाही. कारण त्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानवापर आवश्यक आहे. म्हणजे मग आपण मुलांना फक्त योग्य पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकवू शकतो.

१. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देखील या सर्व तंत्रज्ञानासंदर्भात अपडेटेड राहावं लागेल. मुलांशी त्यांच्या भाषेत बोलण्याकरिता ते वापरत असलेले पॉप्युलर ॲप्स आपल्याला माहिती हवेत. मग ते स्नॅपचॅटचे फिल्टर असो की इन्स्टा स्टोरी अपलोड करणं असो. अगदी टिंडरवर राइट स्वाइप, लेफ्ट स्वाइप पण नाही पाहिजे, नाहीतर तुम्ही मुलांच्या नजरेत मागास पिढीचे ठरता आणि मग त्यांना तुमच्याशी कनेक्ट करणं अवघड जातं. जे ॲप्सच्या बाबतीत खरं आहे तेच ऑनलाइन गेम्स आणि इंटरनेटच्या वापरासंदर्भातही.

२. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालक म्हणून आपण तंत्रज्ञानाच्या वापराबाबतीत मुलांसमोर चुकीचे उदाहरण तर ठेवत नाही ना? हेही पालकांनी तपासायला हवेत. म्हणजे काय तर मुलांना आणि प्रौढांना स्क्रीनच्या वापरासंदर्भात वेगवेगळे नियम नसावेत. म्हणजेच बाबा दमून आले त्यामुळे त्यांनी जेवताना मोबाइल पाहिला तर चालतो; पण मुलांना मात्र बाबा किंवा आई जेवताना मोबाइल पाहिला की रागावतात. आपल्या म्हणजेच पालकांच्या वागण्यातला हा दुटप्पीपणा मुलं लक्षात ठेवतात व कधी ना कधी बोलूनही दाखवतात.

३. संपूर्ण परिवाराने ‘स्क्रीन फ्री टाइम’ची संकल्पना राबवावी. स्क्रीन बंद करून तो वेळ सर्वांनी एकत्र काहीतरी करण्यात किंवा बोलण्यात घालवावा. लहान मुलांना आवडतील, असे खेळ मोठ्यांनीही त्यांच्यासोबत खेळावे.

४. इंटरनेट/ ॲप्स/ ऑनलाइन गेम्सचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याची मुलांशी चर्चा करावी. चुकीच्या लिंक्स क्लिक करणं कसं टाळावं, चुकून क्लिक केलंच तर मोठ्यांना चटकन का सांगावं हे सारं सविस्तर सांगावं.

५. आपली व्यक्तिगत माहिती ऑनलाइन कुठंही देण्यापूर्वी मोठ्यांशी बोलणं का गरजेचं आहे हे सांगावं. त्याची पडताळणी कशी करावी, हे समजावून सांगावं. मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी तंत्रज्ञानांच्या फायद्यासह तोट्यांची चर्चा करावी. त्यांचा स्क्रीन टाइम त्यांनी कसा वापरायचा याची माहिती द्यावी; मात्र निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्यावेत. त्यासाठी सक्षम बनवणं हे पालकांचं काम. निर्णय घ्यायची जबाबदारी असली तर मुलं परिणामांची जबाबदारीही स्वीकारायला तयार होतात, शिकतात.

६. लहान मुलांना पालकांच्या देखरेखीखाली स्क्रीनचा वापर करायला लावावा. त्यांना वयानुरूप अटी घातल्या गेल्या पाहिजेत.

सलग तासभर मोबाइल पाहण्यापेक्षा दिवसातून तीन वेळा वीस - वीस मिनिटं पाहायला देणं, जास्त चांगलं.

७. थोडक्यात काय तर तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्याच दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग. येत्या काळात तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं त्याच्यावरचं अवलंबित्व वाढतच जाणार आहे. त्यामुळे या पिढीला तंत्रज्ञान स्वत:च्या फायद्यासाठी वापर करायला शिकवणं. आणि तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणात कसं ठेवावं हेही शिकवलं पाहिजे.

८. स्क्रीनचा वापर महत्त्वाचा जरी असला तरी तो प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यास काय लक्षणं दिसू शकतात. त्यावेळी पालकांनी काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे. तरच आपण मुलांना स्क्रीन ॲडिक्ट होण्यापासून वाचवू शकू. त्यासाठी पालकांनी सतर्क राहायला हवं.

(Image : Google)

स्क्रीनच्या अतिवापराची/व्यसन लागण्याची शक्यता असलेली लक्षणं

१. स्क्रीन काढून घेतल्यावर मुलांची चिडचिड होते. बेचैन दिसतात.

२. मन एकाग्र करण्याची क्षमता कमी होणे.

३. शिक्षणावर होणारे परिणाम. कमी गुण मिळणे, नापास होणे.

४. घरच्या कुठल्याही कामात, समारंभात सहभागी होण्यास टाळाटाळ करणे.

५. एकटे राहायला आवडणे.

६. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे.

७. अर्धवट झोप होणे, सकाळी उशिरा उठणे.

८. व्यायामाची टाळाटाळ करणे.

९. घरच्यांशी, मित्रांशी संवाद कमी होणे.

१०. एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीच्या मेंदूत होणारे सर्व बदल स्क्रीनचे व्यसन असलेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात.

 

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

iphmindlabnashik@gmail.com

टॅग्स :मोबाइलपालकत्वस्मार्टफोन