Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलं का होताहेत खूप लठ्ठ? कोण म्हणतं मुलांना काहीच स्ट्रेस नसतो..

लहान मुलं का होताहेत खूप लठ्ठ? कोण म्हणतं मुलांना काहीच स्ट्रेस नसतो..

लहान मुलं तुडतुडीत चपळ हवी, मात्र आता भारतातही मुलं लठ्ठ होऊ लागली आहेत, त्याची कारणं काय? (child obesity and stress)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 04:23 PM2022-08-16T16:23:46+5:302022-08-16T16:33:37+5:30

लहान मुलं तुडतुडीत चपळ हवी, मात्र आता भारतातही मुलं लठ्ठ होऊ लागली आहेत, त्याची कारणं काय? (child obesity and stress)

child obesity and stress, why kids become obese, how to deal with it? | लहान मुलं का होताहेत खूप लठ्ठ? कोण म्हणतं मुलांना काहीच स्ट्रेस नसतो..

लहान मुलं का होताहेत खूप लठ्ठ? कोण म्हणतं मुलांना काहीच स्ट्रेस नसतो..

Highlightsजर मूल लठ्ठ असेल तर त्याच्या मनात कुठल्या तणावाने घर केलेलं नाही ना, हे अवश्य बघावं आणि ते दूर कसे होतील हे बघावं.

डॉ. श्रुती पानसे

लहान मूल हे उत्साही हवं, त्याने भरपूर हालचाली आणि दंगा करायला हवा. यांच्या जोडीला ते चपळ आणि तुडतुडीत असावं. खरं तर भारतीय मुलं ही अशीच आहेत. अशीच होती. मातीत खेळणारी, झाडांवर चढणारी, नदीत पोहणारी, डोंगर चढणारी. पण आजची शहरी आणि ग्रामीण भागातली मुलं आहेत का अशी? की त्यांच्यावरही लठ्ठपणाचा विळखा पडतो आहे?
आपण गेल्या काही वर्षात हे ऐकलंच असेल की एरवी प्रौढ वयात जे आजार होतात, ते आता मुलांनाही होऊ लागलेले आहेत. याचं मूळ कारण आहेत समाजातल्या काही नव्या चुकीच्या गोष्टी. लहान मुलांच्या बाबतीत आपल्या - समाजाच्या-पालकांच्या अनेक चुका होत आहेत. त्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. ज्याची दखल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वारंवार घेतली आहे. आणि आता २०२२ च्या अहवालात त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे. त्या नुसार २०२५ पर्यंत अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि याचं एक कारण असणार आहे- लठ्ठपणा. प्रौढ आणि लहान मुलांमधला लठ्ठपणा.
जी मुलं आज लठ्ठ आहेत त्यांना त्यातून कसं सोडवायचं आणि ज्या मुलांना अजून हा आजार शिवलेला नाही त्यांना कसं वाचवायचं हे आपल्याच हातात आहे.
मुलांमधला लठ्ठपणा ही एक महत्वाची आरोग्य समस्या आहे. त्यांची अनेक कारणं आहेत. 

(Image : Google)

मुख्य 3 कारणं आहेत. 

१. वाढते ताणतणाव
२. बैठी जीवनशैली आणि
३.अयोग्य आहार

मुलांना कसला स्ट्रेस?

लहान मुलांना ताणतणाव नसतात, असा जर आपला समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. मुलं हसतात, मजेत असतात, याचा अर्थ ती तणावमुक्त असतात, असं नाही. सध्याच्या काळात मुलांना ताण असतात आणि ते बहुतेक वेळा समाजनिर्मित असतात. घरातल्या मोठ्या माणसांमध्ये असलेल्या कुरबुरी आणि अस्वस्थता विविध पद्धतीने मुलांपर्यंत पोचतात. त्यामुळे नकळत त्यांच्यात ताण निर्माण होतात. कॉर्टीसोलसारखी ताणकारक रसायनं शरीरावर वाईट परिणाम करतात.
असाच एक दुसरा समाजनिर्मित ताण सध्याच्या मुलांना आहे तो म्हणजे अभ्यासाचा ताण. दहावी बारावीतल्या मुलांना असलेल्या ताणाची नेहमी चर्चा होते, त्यांच्यासाठी समुपदेशन केंद्रं ही चालवली जातात. पण सध्याच्या काळात बालवाडीतल्या वयातल्या मुलांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यांच्या वयाला झेपत नसतानाही शाळा त्यांना हवा तो अभ्यास अक्षरक्ष: ‘करवून ’ घेते. पहिलीसाठीची तयारी बालवाडीत करणं हे केवळ चूक आहे. मुलं हा अभ्यास करत नसतील तर पालकांना समज दिली जाते. मुलं कसाबसा रडतखडत अभ्यास करतात. वास्तविक याची गरज नाही. मुलांच्या वयानुसार त्यांना अभ्यास दिला पाहिजे. ते आपल्याकडच्या बऱ्याचशा शाळांमध्ये घडत असतं. पण यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावरचा ताण वाढतो.
मुलांना हे स्वत:लाच माहीत नसतं की आपल्याला ताण आहे. पण त्याच्या शरीरावर दिसणाऱ्या विविध लक्षणांवरून पालक ते समजून घेऊ शकतात. त्यातलंच एक लक्षण म्हणजे लठ्ठपणा. अभ्यास ही गोष्ट पूर्वी सुद्धा होती, पण गुणांच्या शर्यतीत आपण मागे पडलो तर आईबाबा रागावतील, मारतील या भीतीचं प्रमाण वाढलं आहे. अभ्यासाची गोडी निर्माण होऊच दिली जात नाही. आधी निर्माण होतो तो ताण आणि मग इयत्ता वाढते तसा तो वाढत जातो. मुलं मोठी होतात, तसं त्यांच्या विविध क्षमता वाढत जातात आणि अभ्यास झेपतो. पण आपल्याकडे वय आणि अभ्यास याचं प्रमाण व्यस्त आहे. यांचा विचार व्हायला पाहिजे.
आपण शर्यतीच्या घोड्याला जन्म दिलेला नसून एक संवेदनशील मूल जन्माला घातलं आहे, हे लक्षात घ्यावं. परीक्षेतल्या मार्कांपेक्षा त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन द्यायला हवं. घरातलं आनंदी वातावरण मुलांच्या मेंदूत ऑक्सिटोसिन निर्माण करतं. जे त्याच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी आवश्यक आहे. जर मूल लठ्ठ असेल तर त्याच्या मनात कुठल्या तणावाने घर केलेलं नाही ना, हे अवश्य बघावं आणि ते दूर कसे होतील हे बघावं.

लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.
संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830
अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी)

 

Web Title: child obesity and stress, why kids become obese, how to deal with it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.