डॉ. रत्ना अष्टेकर, डॉ. शाम अष्टेकर
भारतात आतापर्यंत लहान मुलांचे कुपोषण म्हणजे अल्प-पोषण (रोडावणे, खुरटणे) असाच अर्थ घेतला जात होता. आता त्यात अतिवजन आणि पुढे स्थूलता अशी भर पडली आहे. आमच्या नाशिक येथील सर्वेक्षणात खासगी मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये अति वजन व स्थूलतेचे ५ ते ९ टक्के असे प्रमाण आढळले. मुद्दा असा की, बाल-किशोर अतिवजन आणि स्थूलता (Childhood Overweight and obesity-COBOW) ही मध्यम-उच्चवर्गीय समाजात एक महत्त्वाची समस्या बनते आहे. लवकर उपाय केले नाहीत तर असे मूल पुढे स्थूल राहण्याची खूप शक्यता असते आणि स्वतःच्या जास्त वजनामुळे येणारी कमीपणाची भावना व नैराश्य, मधुमेह, अतिरक्तदाब अशा समस्या तरुण वयातच सुरू होतात. मुला-मुलींमध्ये लैंगिक बदल लवकर होतात (उदा. मुलींमध्ये पाळी लवकर येणे). कोविड काळात या समस्येची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. किशोरवयात (१२ वर्षांपासून पुढच्या वयात) मुलांची समस्या वाढत जाते. (अर्थात काही मुले यातून सुटून पण जातात.)
लठ्ठ मुले : कारणे काय?
आहाराचे प्रमाण जास्त, त्यामानाने शारीरिक हालचाल-कष्ट कमी ही बाल-किशोर अतिवजन आणि स्थूलता समस्येची मूळ कारणे आहेत. यामागे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व्यवस्था कारणीभूत ठरते. व्यावहारिक पातळीवर खालील पाच कारणे प्रमुख आहेत.
१. अधिक खाणे, त्यात गोड पदार्थांचा मारा, शीतपेये, प्रथिन-कमतरता (आपले मूल काहीच कसे जेवत नाही, असे बहुसंख्य आया व आज्यांचे आंधळे मत असते.)
२. शाळेत आणि इतरत्र खेळ-व्यायामाचे प्रमाण कमी/नगण्य, खेळापेक्षा अभ्यास व मार्कच महत्त्वाचे अशी पालकांची चुकीची समजूत.
३. घरी-दारी कोणतेही शारीरिक काम न करण्याची सवय/ पद्धत.
४. मोबाइल-टीव्ही यातून ‘बैठी’व निष्क्रीय करमणूक आणि त्याचे व्यसन लागणे.
५. शाळेला जाण्या-येण्यासाठी बस-स्कूटर-कार-दुचाकीचा वापर आणि चालणे/सायकल याला फाटा.
६. सटरफटर खाण्याच्या पदार्थांची दुकाने शाळेच्या अगदी जवळ सहज उपलब्ध असणे.
याशिवाय काही मूळच्या आरोग्य समस्या/आजार उदा. थायरॉइड ग्रंथीचे दोष, जनुकीय दोष असू शकतात; परंतु याचे एकूण प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असेल. आपल्या मुलामध्ये लठ्ठपणा दिसतोय, हे पालकांच्या लक्षात येत असेल, तरी याबद्दल फार उपाय करणे कठीण वाटू शकते.
शाळेत शिक्षकांची भूमिकादेखील मर्यादित असते. स्वत: त्या मुलाला/मुलीला स्वतःला देखील इतरांच्या नजरेतून किंवा टोमणे ऐकून जाणीव झालेली असते, पण त्याबद्दल खंत आणि राग असण्यापलीकडे त्यांचा उपाय नसतो. यावर कोणी काय काय करावे, याबद्दल संभ्रम असतो. निश्चित उपाय नसल्यामुळे डॉक्टरही सल्ला देण्यापलीकडे जात नाहीत. खरे म्हणजे या तिघा-चौघांनीही एकत्रित दीर्घ प्रयत्न केला तरच यातून मुलाची सुटका होऊ शकते.
(Image : google)
लठ्ठपणा ओळखायचा कसा?
जास्त लठ्ठ असलेले मूल ओळखायला सोपे असते. पोट सुटणे, बेंबी खोल जाणे, वळ्या पडणे, चेहरा, छाती, दंड, मांड्या या अवयवांवर चरबीची गोलाई आणि थर, मनगट-मान जाड दिसणे या उघड खाणाखुणा आहेत. पण याची सुरुवात ओळखणे जास्त महत्त्वाचे आणि अवघड असते. यासाठी मोजमापे आहेत. उदा. वजन, उंची, BMI, दंड व मानेचा घेर, त्वचेची जाडी इ.
पुण्याचे डॉ. वामन आणि अनुराधा खाडीलकर यांनी वजन-ऊंची, शरीरभार, कमर-घेर, दंडघेर यावर संशोधन करून २-१८ वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी वेगवेगळे वाढ-तक्ते बनवले आहेत आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेने हे मापदंड स्वीकारले आहेत. बालरोगतज्ज्ञ हे तक्ते दाखवू शकतात आणि नेटवर मिळतात तसेच मोबाइल फोनवर app देखील आहेत. हल्ली impedance मीटर यंत्रे मिळतात, त्यात शरीरातील चरबीच्या टक्केवारीचे मोजमाप करता येते. लठ्ठपणामुळे मधुमेह-प्रवृत्ती झाली असल्यास रक्तातील सरासरी साखर (hba1c) आणि fasting insulin मोजूनच निदान करता येते. थायरॉईड संप्रेरक, cortisol देखील तपासणे आवश्यक होऊ शकते. या सगळ्या तांत्रिक मोजमापाशिवायदेखील जाणकार आई-वडील पोट-पाठ-दंड-मांडी-मान यावरून सहज अंदाज बांधू शकतात.
उपाय काय करता येतील?
१. आहारात पोळी-भाकरी-भात प्रमाण निम्मे करून वरण, उसळी, दूध, अंडी आणि भाजीपाला/फळभाजी यांचे प्रमाण वाढवावे. पुरेशा प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थ खाऊ देणे हा उपाय आहे.
२. चॉकलेट-आईस्क्रीम, मिठाई, शीतपेये, कुरकुरे आदी पदार्थ अगदी कमी किंवा बंद करणे.
३. अधून-मधून खाण्याची सवय थांबवून दिवसातून ३-४ वेळाच खाण्यासाठी ठरवून घेणे.
४. घरातली छोटी-मोठी कामे मुलांना करायला प्रवृत्त करणे/प्रोत्साहन देणे, कामात सामील करून घेणे.
५. धावपळ असलेल्या खेळाची सवय/गोडी लावणे (खो-खो, पोहणे, फुटबॉल, पकडापकडी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस इत्यादी) आणि यासाठीही रोज तास-दोन तास वेळ राखून ठेवणे. (खरंतर स्वत: आई-बाबांनी देखील खेळायला पाहिजे.)
६. रोज एकूण चालण्याचे प्रमाण वाढवणे.
७. आठवड्यातून एकदा तरी आजूबाजूचे डोंगर, किल्ले चढणे, याची गोडी लावणे.
८. शाळेत शेवटचा तास सर्व विद्यार्थ्यांना घामेघुम खेळासाठी राखून ठेवणे.
एकूण आहार आणि शारीरिक क्रियाकलाप यांचे गुणोत्तर बदलून ऊर्जा खर्च होईल, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
एका वाक्यात सांगायचे तर लठ्ठपणा हा जीवनशैलीचा आजार असल्याने, जीवनशैली बदलणे हेच मुख्य आणि खात्रीचे उपाय आहेत.
९. प्रत्येक मुलाची समस्या थोडी वेगळी असू शकते आणि निदान-उपाय देखील त्यानुसार योजावे लागतील, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
१०. जागरूक पालक स्वत: मुलांना मदत करू शकतात.
मानसिक प्रोत्साहन, आहार नियोजन आणि अभ्यास, खेळ-काम यांचा समतोल ही मुख्य ‘रणनीती’असते, हे विसरू नका!
११. योग्य जीवनशैलीचा जो सल्ला मुलाला दिला जातो, तसेच वर्तन पालकांनी ठेवले तरच मुलांना खरी सोबत आणि प्रोत्साहन मिळू शकते. सुयोग्य जीवनशैली ही कुटुंबाने सांभाळायची गोष्ट आहे.