लहान मुलं म्हटली की चिडवाचिडवी होणारच. मज्जा मजा म्हणून चिडवत असतील... असंही वाटेल कुणाला. पण नेहमीच चिडवाचिडवी ही दुर्लक्ष करावी किंवा मौजमजेच्या दृष्टिकोनातून ती घ्यावी अशी नसते. चिडवणे, दादागिरी करणे, ज्याला आपण बुलिंग म्हणतो तो प्रकार सध्या खूप वाढला आहे. त्याच्या परिणामांकडेही पालकांनी गांभीर्याने पाहाणे आवश्यक आहे.
आता संजूच उदाहरण घ्या ना. संजू हा हुशार आणि अभ्यासू मुलगा. शाळेत इतर मुलामुलींमध्येही तो फारसा मिसळत नसे. जेव्हा पहावं तेव्हा पुस्तक हातातच. त्याच्या या सवयीवरुन त्याची मुलं टिंगल करु लागले. त्याला टोपणनावं पाडली गेली. एकदा तर नोटीसबोर्डवर त्याचं घाणेरडं कार्टून काढलं गेलं. ही गोष्ट संजूच्या मनाला खूप लागली. तो शाळेत येईनासा झाला. संजू आजारी पडला, त्याचा त्याच्या अभ्यासावर, परीक्षेवरही परिणाम झाला. मोठ्यांना जी साधी चिडवाचिडवी वाटते ती मुलांवर किती गंभीर परिणाम करु शकते त्याचं हे खरंखुरं उदाहरण. बुलिंगबद्दल अनेक प्रश्न पालकांच्याही मनात असतात. या प्रश्नांच्या उत्तरातूनच या प्रकाराकडे गांभीर्यानं बघण्याचं महत्वही लक्षात येतं.
(Image : google)
बुलिंग का केलं जातं?
१ काही मुलांना (मुलं-मुली दोन्हीही आली) कोणीतरी 'व्हिक्टिम' हवं असतं. जी शरीर मनाने कमजोर आहेत, किंवा संवेदनशील आहेत त्यांना ही मुलं टार्गेट करतात. प्रसिध्दी मिळवण्यासाठी, चमकोगिरी करण्यसाठी दुसऱ्यांवर दादागिरी केली जाते.
२ कधी कधी शाळेत, खेळाच्या मैदानावर दादागिरी करणारी मुलं घरी त्यांना त्याच पध्दतीने वागवलं जातं, ती मानसिकदृष्ट्या असुरक्षित असतात. घरी त्यांना हिणवलं जातं, ओरडलं जातं त्याचा परिणाम बाहेर दादागिरी करण्यात होतो.
३ टी.व्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पाहिल्या असतील तर त्याचं अनुकरण म्हणून प्रत्यक्ष आयुष्यात इतरांवर दादागिरी केली जाते.
बुलिंग होतंय हे कसं ओळखायचं?
१ मुलं वेगळी वागतात. सतत भांबावलेली, घाबरलेली दिसतात.
२ नीट जेवत झोपत नाही. नेहमीच्या गोष्टीही व्यवस्थित करत नाहीत.
३ मुलं मूडी होतात. लवकर निराश होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांचा मूड जायला लागतो.
शाळेत जाणं, मित्रांशी खेळणं, घरातल्यांशी बोलणं टाळायला लागतात.
(Image :google)
आई बाबा काय करु शकतात?
१. वरील लक्षणं आपल्या मुलांच्या बाबतीत दिसल्यास त्यांना त्यावर बोलतं करायला हवं. हेच काम अवघड असतं. आई बाबा रागावतील म्हणून किंवा आपण हे आई बाबांना सांगितलं म्हणून दादागिरी करणारी मुलं आपल्यावर काट खातील या भीतीने शांत राहातात. अशा वेळी त्यांना वेगवेगळ्या पध्दतीनं बोलतं करावं. एखादा टीव्हीवरचा प्रसंग सांगून तू याबाबतीत काय विचार करतोस/करतेस ? तुझ्या बाबतीत असं झालं तर तू काय करशील? असे प्रश्न विचारुन मुलांना या विषयावर बोलतं करावं.
२. शिक्षकांशी / शाळेतल्या समुपदेशकांशी बोलावं.
३. दादागिरी करणाऱ्या मुलांच्या पालकांना भेटावं.
(Image :google)
आई बाबा मुलांना काय सांगाल?
१. आपल्या मुलांना असं काही त्यांच्याबाबतीत शाळेत किंवा इतर कुठेही झाल्यास त्यांना घरातल्या मोठ्यांशी, शाळेत शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी बोलायला सांगणं.
२. दादागिरी करणाऱ्या मुलांना टाळावं. कोणीतरी आपल्याला चिडवत आहे म्हणून राग येणं स्वाभाविक आहे. पण आपण चिडलो तर त्याचे गंभीर परिणामही होवू शकतात. म्हणून राग आला तर तो नियंत्रित करावा. तिथून लगेच निघून जावं.
३. कोणी चिडवतंय, दादगिरी करतंय म्हणून घाबरु नये. आपण धाडसी व्हावं. तिथून निघून जावं. अशा मुलांकडे दुर्लक्ष करावं.
४. आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवावा. आपल्याला आवडतो तो खेळ खेळावा. ज्या गोष्टीतून मजा येते त्या गोष्टी कर.
५. दिवसभरात चांगलं काय घडलं हे विचारावं. यातून आपल्याबाबत झालेल्या चांगल्या गोष्टींकडे मुलांचं लक्ष जातं.
मुलांसोबत होणाऱ्या बुलिंगबाबत आणखी वाचा
https://urjaa.online/how-to-face-bullying-in-school-or-playground-how-parents-can-be-help-their-kids-who-face-bullyingwhat-should-do-avoid-bad-effects-of-bullying-on-our-kids/