Join us  

मुलं सतत येताजाता अबरचबर खातात, ओव्हर इटिंगमुळे पोट बिघडतं? ४ उपाय- नीट जेवणाची लागेल सवय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 3:38 PM

Easy Hacks To Prevent Child Over Eating : अनेक मुलं एकावेळी एकदम जास्त खाऊ शकत नाही, मात्र ओव्हर इटिंग कुठं सुरु होतं, त्यानं वजन जास्त वाढतं का यावर लक्ष ठेवणं आवश्यक

लहान मुलांचे खाण्याच्या बाबतीत फारच नखरे असतात. हे नको, ते नको, हे आवडत नाही, अशी कारणे त्यांच्याकडे नेहमी तयार असतात. जेवणाच्या वेळी ही मुलं व्यवस्थित जेवत नाहीत. जेवणाच्या वेळी योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना अवेळी भूक लागते. अशी अचानक अवेळी भूक लागल्याने मुलं बाहेरचे काही अरबट - चरबट पदार्थ खातात. काहीवेळा जेवून झाल्यानंतरही मुलांना भूक लागते अशावेळी मुलं बाहेरून विकत आणलेले पॅक्ड फूड खातात. हे  पॅक्ड फूड प्रीझव्ह करण्यासाठी यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आणि साखर घातलेले असते.

वरचेवर मुलांनी हे पॅक्ड फूड खाल्ले तर त्यांचे पोट बिघडते. काहीवेळा मुलांना हे पॅक्ड फूड खाण्याची चटक लागते. अशा परिस्थितीत ही मुलं जेवण सोडून विकतचे बिस्किट्स, चिप्स, चॉकलेट असे पदार्थ जास्त खाणे पसंत करतात. घरचे पौष्टिक जेवण सोडून हे बाहेरचे पॅक्ड फूड खाऊन मुलांना ओव्हर इटिंगची सवय लागते. या ओव्हर इटिंगच्या वाईट सवयीमुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. आपल्या मुलांना देखील ही ओव्हर इटिंगची वाईट सवय लागली असेल तर काही सोप्या टीप्स वापरून आपण ही समस्या दूर करु शकता(Easy Hacks To Prevent Child Over Eating). 

नक्की काय उपाय करता येऊ शकतो? १. खाण्याच्या वेळा निश्तिच करा :- मुलांच्या ओव्हर इटिंगची वाईट सवय सोडवायची असल्यास खाण्याच्या वेळा निश्तिच करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. मुलं जेवणाच्या वेळी एका जागेवर बसून व्यवस्थित जेवत नाही. या मुख्य कारणाने मुलांना वारंवार अवेळी भूक लागत राहते. अशावेळी मुलांच्या खाण्याच्या वेळा सर्वप्रथम निश्चित कराव्यात. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतच्या सगळ्या खाण्याच्या वेळांचे एक वेळापत्रक करून ठेवावे. व त्या वेळापत्रका नुसारच मुलांना खाण्यास द्यावे. जेव्हा आपली मुलं योग्य वेळी योग्य प्रमाणांत आहार घेतील तेव्हा त्यांना वेळी - अवेळी लागणारी भूक किंवा काही अरबट - चरबट खाण्याचे क्रेव्हिंग्स होणार नाहीत. 

२. मुलांना त्याचे जेवणाचे वेगळे ताट द्यावे :- काहीवेळा काही पालक मुलांचे जेवण आपल्याच ताटात घेऊन त्यांना आपल्या हाताने जेवण भरवतात. यात तसे फारसे काही चुकीचे नाही. परंतु असे केल्याने मुलं किती खात आहेत याचा आपल्याला अंदाज येत नाही. मुलांचे जेवण आपल्याच ताटात घेतल्याने काहीवेळा ते जास्त खातात तर काहीवेळा कमी जेवतात. आपले व मुलांचे जेवण एकाच ताटात घेतल्याने कोण किती खात आहे याचा अंदाज बांधता येत नाही. यामुळे गरजेपेक्षा कमी खाणे किंवा जास्त खाणे अशा दोन समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही समस्या तशा मुलांच्या आरोग्याचा दृष्टीने वाईटच आहेत. अशा परिस्थितीत जर मुलांनी कमी खाल्ले तर त्यांना वारंवार भूक लागते व त्यांना ओव्हर इटिंगची वाईट सवय लागू शकते. त्यामुळे मुलांना त्याचे जेवणाचे वेगळे ताट द्यावे जेणेकरून त्याच्या भुकेनुसार ते त्यांना हवे तेवढे खातील व त्यांनी किती खाल्ले याचा पालकांना अंदाज बांधणे सोपे जाईल.     

३. टीव्ही, मोबाईल ठेवा दूर :- जेवणाच्या वेळी घरातील टीव्ही, मोबाईल बंद करून ठेवण्याचा नियम पाळा. बहुतेकवेळा मुलं जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवतात. यामुळे मुलांना आनंद वाटतो, परंतु हे साफ चुकीचे आहे. टीव्ही, मोबाईल बघत जेवण केल्याने आपण किती खातो आहे याचा अंदाज मुलांना येत नाही. त्यामुळे काही खात असताना घरातील टीव्ही किंवा मोबाईल बंद करून ठेवण्याचा नियम बनवा. असे केल्याने मुलं हळुहळु माइंडफुल इटिंग करण्यास शिकतील. त्याबरोबरच खाताना जर मुलांचे संपूर्ण लक्ष खाण्यावर असेल तर त्यांना ओव्हर इटिंगची वाईट सवय लागणार नाही. 

४. किचनमधील खाण्याचा पदार्थांवर लक्ष ठेवा :- मुलांना ओव्हर इटिंग करण्यापासून रोखण्यासाठी आपल्या किचनमध्ये हेल्दी पदार्थ ठेवण्यावर भर द्यावा. जर आपण किचनमध्ये अनहेल्दी, मसालेदार, तळलेले, चटकदार पदार्थ ठेवाल तर मुलांना असे पदार्थ खाण्याची वाईट सवय लागेल. असे अनहेल्दी पदार्थ बघून मुलांना ते खाण्याची इच्छा होते यामुळे ओव्हर इटिंगची समस्या उद्भवते. मुलं लहान असतानाच आपल्या किचनमध्ये हेल्दी स्नॅक्स ठेवण्यावर जास्त भर द्यावा. जेणेकरून लहान वयातच मुलांना योग्य आणि सकस पदार्थ खाण्याची सवय लागेल. यामुळे मुलांचे ओव्हर इटिंग आपोआप थांबेल.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स