उन्हाळा सुरू झाला की शरीराची इतकी लाहीलाही होत असते की आपल्याला सतत पाणीपाणी होते. सारखे पाणी प्यायल्याने जेवण नीट जात नाही आणि मग ऊन उतरले की संध्याकाळी सणकून भूक लागते. आपल्यालाच असे होते तर लहान मुलांनाही या उकाड्याचा त्रास होतच असणार. उन्हाळ्यात नीट जेवण जात नसल्याने मूल मलूल झाले, त्याचे वजन कमी झाले असे जर तुम्हाला वाटत असेल तर याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आधीच परिक्षा संपून मुलं पूर्णवेळ घरात असतात. दुपारी उन्हाचा तडाखा जास्त असल्याने आपण त्यांना खेळायला बाहेरही सोडत नाही. अशावेळी सतत घरात राहून त्यांना सारखं वेगळं आणि चटपटीत काहीतरी खायला हवं असतं. त्यातही गारेगार काही असेल तर त्यांची स्वारी आणखी खूश होते. पाहूया मुलांना झटपट आवडेल असे घरच्या घरी काय देता येईल. ज्यामुळे त्यांची भूक तर भागेलच पण शरीरालाही पोषण मिळेल.
१. सकाळी उठल्या उठल्या मुलांना पोटभर नाष्ता द्या. यामध्ये एखाद्या फळाचा समावेश असेल असे आवर्जून पाहा. सकाळी एकदा पोट व्यवस्थित भरलेले असले की दुपारी थोडे कमी खाल्ले तरी चालते. दुपारी उन्हामुळे सतत पाणी प्यायले जात असल्याने मुलांना जेवण कमी जाते. मात्र सकाळी उठल्यावर नीट प्रोटीन असलेला पोटभर नाश्ता केलेला असला की आपल्याला टेन्शन राहत नाही.
२. दुपारी जेवणाच्या आधी किमान एक तास मूल काही खाणार किंवा पिणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे मुलांना जेवणाच्या वेळी व्यवस्थित भूक लागेल. जेवणात भाजी-पोळीबरोबरच एखादा पातळ पदार्थ असेल तर मुलांना कोरडे न होता ते आनंदाने जेऊ शकतील. तसेच तोंडी लावायला चटणी, लोणचे, कैरीचा साखरांबा, गुळांबा, मेथांबा असे चव वाढवणारे पदार्थ असतील तर अधिक चांगले. याशिवाय पापड भाजणे, पापड्या तळणे यामुळे जेवणाची लज्जत वाढू शकेल.
३. मुलांना तरीही जेवण कमी गेल्यास त्यांना काकडी, कलिंगड, खरबूज असे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे पदार्थ आवर्जून खायला द्या. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहून त्यांना त्रास होणार नाही.
४. याबरोबरच मुलांना मिल्कशेक, ताक, लस्सी, वेगवेगळी सरबते असे त्यांच्या आवडीप्रमाणे आवर्जून प्यायला द्या. त्यामुळे ते खूश होतीलच पण शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहिल्याने उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. सरबतातून साखर आणि मीठ गेल्याने त्यांना गळून गेल्यासारखे होणार नाही.
५. मुलांना संध्याकाळी ऊन उतरल्यावर त्यांच्या आवडीचे भेळ, सँडविच किंवा चीज, पनीर यांपासून केलेले पदार्थ खायला द्या. पदार्थ त्यांच्या आवडीचे असतील तरी भेळमध्ये मटकी, मूग, इतर सलाड किंवा सँडविचमध्ये बीट, गाजर असे घालून त्याची पौष्टीकता वाढेल याचा प्रयत्न करा. पोळीचा पिझ्झा, गव्हाच्या किंवा रव्याच्या शेवयांची मॅगी असे प्रकार केल्याने त्यांच्या आवडीचेही होईल आणि पौष्टीक गोष्टीही पोटात जातील.
६. मधल्या वेळेत खाण्यासाठी खाकरा, लाडू, भडंग, पोह्याचा चिवडा, गव्हाची शंकरपाळी असे चटपटीत पर्याय उपलब्ध असल्यास ते मुलांना खायला द्या. घरात असणारी वाळवणे तळल्यास मुले बाहेरचे चिप्ससारख्या गोष्टी मागणार नाहीत.