डाॅ. श्रुती पानसे
परीक्षाकाळात पाणी पिण्याच्या संदर्भात प्रत्येक शाळेचे नियम वेगवेगळे असतात. काही वेळेला मुलांना पाण्याची बाटलीसुद्धा वर्गाच्या बाहेरच ठेवून जावी लागते, तर काही वेळेला त्यांना पाण्याची बाटली आत न्यायची परवानगी असते. जिथे पाण्याची बाटली आत नेण्याची परवानगी नसते तिथे परीक्षा खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली असते. पाण्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जात नाही पण त्यांचा वेळ जाऊ नये म्हणून पाणी हाताशी ठेवलं जातं. पण काही मुलंमुली परीक्षाकाळात पाणीच पित नाहीत तर काही अभ्यास करतानाही पाणी कमीच पितात. लघवीला जावं लागेल म्हणून पाणी पिणं टाळतात पण त्यानं वेगळेच प्रश्न निर्माण होतात.
होतं काय?
१. परीक्षेचा पेपर अवघड आला आहे, त्याचा ताण वाढला आणि घशाला कोरड पडली म्हणून खूप जास्त पाणी एका वेळेला पिण्याची गरज नसते. भीती वाटली तर त्याची प्रतिक्रिया म्हणून पाणी प्यायलं जातं. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणून तहान लागू शकते. पण अशा वेळेला आपल्याला पाण्याची नेमकी किती गरज आहे हे लक्षात घ्यावं आणि तितकच पाणी प्यावं.
२. खरं सांगायचं तर एकूणातच घटाघट पाणी पिण्याची सवय योग्य नाही असंच मानलं जातं त्यामुळे केवळ आपला घसा ओला करण्यापुरतं पाणी प्यायलं तरीही चालू शकतो मग ते साधारणपणे तीन तासात दर अर्ध्या पाऊण तासाने तीन-चार घोट एवढं पाणी प्यायला पुरेसं आहे.
(Image : google)
३. अजिबातच तीन तासात पाणी प्यायचं नाही असं मात्र करू नये. कारण तुम्ही उन्हातून मुलं परीक्षेला पोहोचतात. मेंदू हा प्रत्येक क्षणाला पाणी वापरत असतो. ज्या वेळेला आपला मेंदू कसलाही विचार करत असतो, त्या वेळेला पाणी वापरत असतो. त्यामुळे अधून मधून घोट घोट पाणी प्यायलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. अशा वेळेला ग्लासभर किंवा बाटलीभर गटागट पाणी मात्र पिऊ नका. याचं कारण, असं आणि इतकं पाणी पिण्याचा उपयोग शरीराला होत नाही.
४. आपला मेंदू विचार करतो आहे स्मरणशक्तीच्या केंद्रातून. परीक्षा देताना, केलेला अभ्यास स्मरणकेंद्रातून बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू असते. जे स्मरणाच्या केंद्रात आहे, त्यावर प्रक्रिया करून ते व्यवस्थित आपल्या भाषेमध्ये कसं लिहून काढायचं , ही मेंदूची प्रक्रिया सुरू आहे हे लक्षात घेऊन त्याला पूर्ण कोरडे ठेवू नये आणि खूप जास्त पाणी पिऊ नये पण घोटघोट पाणी मात्र आवश्यक आहे.
(लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com