घरोघर अनेक आयांची एक तक्रार असते की मुलं डबाच खात नाही. डबा शाळेतून जसाच्या तसा परत येतो. आता प्रश्न असा की मुलं डबा का खात नाही? त्यांना भूक नसते म्हणून की पदार्थ आवडतच नाही म्हणून? की भूक असूनही मुद्दाम खात नाही. त्यातही लहान मुलं, ज्यांना काही भाज्या पदार्थ आवडत नाही. फक्त गोडच हवं म्हणून ते खात नाही. मग प्रश्न असा आहे की मुलांना खाऊ कसं घालायचं? डब्याचं करायचं काय?
डबा करताना लक्षात ठेवू काही गोष्टी..
१. शाळेत जाणाऱ्या मुलांचा डबा आकर्षक हवाच. शक्य असेल तर रोज नव्या रंगाचा, डिझानचा डबा लहान मुलांना द्यायचा. डब्याची एक्साइटमेण्ट वाटली पाहिजे. आता कुणी म्हणेल कशाला खर्च, कशाला नसत्या सवयी, काय गरज? तर त्यात गंमत वाटली पाहिजे. हे अगदी लहान मुलांसाठी. म्हणजे जे अगदीच खेळवाडीत जातात त्यासाठी. ज्या रंगाचा डबा, त्या रंगाचा खाऊ. आपण त्यांना डबा खाण्याची सवय लावतो आहोत. डबा खाणं गंमत वाटली पाहिजे, शिक्षा नाही.
२. मोठ्या डब्यात एक लहानशी डबी त्यात रंगबिरंगी फळांच्या फोडी द्या. गर काढून द्या. दही आवडत असेल तर द्या. सॅलेड द्या. केळी द्या.
३. अजून एका डबीत ड्राय फ्रुट्स दिले तर अनेकांना ते बसमध्ये खाता येतात.
४. पोळी भाजी खावून कंटाळा येतो तर पोळी रोल करून त्यात थोडीशी सुकी भाजी टाकली तर तो रोल खाणं सोपं होतं. एखादी चिज क्यूब त्यात घालून द्यावी.
५. बदलून बदलून पदार्थ दिले तर मुलांना खाण्याची सवय आणि विविध चवी कळतात.
६. डबा काय करायचा या निर्णयात मुलांना सहभागी करुन घ्या.
७. मुलांच्या मित्रांसाठीही डब्यात खाऊ द्यावा. त्यांचा डबा खाऊ द्यावा. म्हणजे डबा खाणं ही आनंदाची गोष्ट ठरते.