लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते कित्येक तास झोपतं. या झोपेतच त्याची वाढ होत असते असं म्हणतात. जसं मूल मोठे होतं तसं ते झोपतं तेव्हाच काय ते घर शांत असतं. नाहीतर दिवसभर दंगा आणि मस्ती. हे सगळं ठिक आहे पण मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांची पुरेशी झोप होणे गरजेचे असते. मोठ्या माणसांसाठी झोप जशी आवश्यक असते, त्याचप्रमाणे लहानग्यांसाठी झोप ही टॉनिक असते. झोपेत त्यांचा मेंदू शार्प होतो, जास्त वेळ शांत झोपल्याने त्यांची शारीरिक, मानसिक वाढ चांगली होते असे म्हटले जाते. मूल व्यवस्थित झोपले तर त्याचा चिडचिडेपणा कमी होतो. झोप पूर्ण झाल्यास मूल एनर्जेटीक होते आणि अतिशय उत्साहाने खेळायला लागते. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यामुळे दिवसभर खेळून मूल थकते. अशावेळी त्याने झोपणे आवश्यक असते, त्यामुळे त्याचा थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच मूलांचे पोट व्यवस्थित भरलेले असेल तरीही मूल झोपण्यासाठी त्रास न देता लगेच झोपते. पण किती वयाच्या मुलाने किती झोपावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पाहूयाच शास्त्रीयदृष्ट्या मुलांनी किती तास झोपायला हवे याविषयी...
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या झोपेचे तास,
बाळाचे वय झोपेचे तास
० ते ३ महिने - १४ ते १७ तास
४ ते ११ महिने - १२ ते १५ तास
१ ते २ वर्षे - ११ ते १४ तास
३ ते ५ वर्षे - १० ते १३ तास
आता ही झोप नेमकी कधीची असा प्रश्न पालकांना पडतो. तर ही सगळी झोप फक्त रात्रीची नसून रात्रीची आणि दिवसाचे मिळून हे तास आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये मूलांच्या झोपेच्या सवयीनुसार किंवा आजुबाजूच्या वातावरणानुसार काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकते. पण शक्यतो या प्रमाणात झोप झाल्यास मूल चिडचिडे होत नाही किंवा त्याला आळस, डोकेदुखी अशा समस्या उद्भवत नाहीत. ते नव्या दमाने खेळण्यासाठी तयार होते.
० ते ३ महिने - ही झोप लहान लहान तुकड्यात होणारी असते. नव्यानेच जगात आल्याने आजुबाजूच्या गोष्टींशी, हवामानाशी जुळवून घेणारे नवजात बालक दर थोडा वेळानी उठते आणि दूध प्यायले की पुन्हा झोपते. या काळात बाळाच्या झोपेच्या वेळा, सवयी सतत बदलत असतात. मात्र अशावेळी पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही.
४ ते ११ महिने - नॅशनल स्लिप फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार या वयातील बाळांनी पूर्ण दिवसात १२ ते १५ तास झोपण आवश्यक आहे. यामध्ये साधारण बाळाची आंघोळीनंतरची २ तासाची झोप, दुपारची २ तासाची झोप आणि रात्रीची ९ ते १० तासाची झोप यांचा समावेश असतो. या वेळा प्रत्येकानुसार काही प्रमाणात बदलू शकतात. पण साधारणपणे या वयात बाळ आंघोळीने आणि दूध पिऊन तसेच हातपाय मारुन आणि इतर हालचालींमुळे थकते. पुरेशी झोप झाल्यास ते फ्रेश होते.
१ ते २ वर्षे - जसजसे मूल मोठे होत जाते त्याची झोप कमी होत जाते. एकदा ते चालायला लागले की त्याचे खेळणे वाढते. तसेच दंगा कऱण्याचे प्रमाणही वाढते. अशावेळी झोपेचा वेळ आधीपेक्षा निश्चितच कमी होतो. या वयातील मुले दमून झोपतात. या वयात त्यांचा मेंदू वेगाने काम करत असतो. झोपेमध्ये बाळाची उंची वाढते असेही म्हटले जाते. दिर्घकाळ व्यवस्थित झोप झाल्यास बाळाचा मेंदू उत्तम मोटर कौशल्ये संपादित करतो.
३ ते ५ वर्षे - या वयातील मुले शाळेत जातात, शाळेतील अॅक्टीव्हीटी, इतर मित्रमंडळींबरोबरचे खेळणे आणि घरातील दंगा यामध्ये मूल पूर्णपणे बुडून गेलेले असते. अशावेळी मुले दिवसा झोपण्यासाठी किरकिर करतात, रात्रीही जागवतात. परंतु ही मुले एकदा झोपली की गाढ झोपतात. अशावेळी ते सकाळी त्यांची झोप पूर्ण झाल्यावर उशीरा उठतात.
लहानपणापासून म्हणजेच साधारण वयाच्या ६ महिन्यानंतर बाळाचे झोपेचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. बाळाला साधारण कोणत्या वेळेला, कोणत्या गोष्टी केल्यावर झोप येते हे समजून घेत आईने आणि घरातील इतरांनी त्याचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. त्याचा बाळाच्या शांत आणि नियमित झोपेसाठी चांगला फायदा होतो. तसेच बाळाचे झोपण्याचे तास लक्षात ठेवा. बाळ किती वेळा भुकेनी उठते याचीही नोंद ठेवणे गरजेचे आहे. बाळ झोपत असलेली खोली शांत, हवेशीर आणि प्रसन्न असेल याची काळजी घ्या, जेणेकरुन बाळ वेळच्या वेळी झोपण्यास त्याची निश्चितच मदत होईल. बाळ हळूहळू जसे मोठे होते तशी दिवसाची झोप कमी होऊन रात्रीची झोप वाढते. तेव्हा रात्री ते लवकर झोपेल आणि सकाळी लवकर उठेल याची काळजी घ्या.