डॉ. कल्पना सानप-सांगळे
जवळ-जवळ दोन वर्षांनंतर सुमित आला होता. मी माझे पेशंट्स नावाने चांगले ओळखते. पण आज मी सुमितला ओळखलेच नाही. कॉविड काळापूर्वी येणारा सुमित आणि आज आलेला सुमित यात जवळ-जवळ १२ ते १५ किलोचा फरक असावा ! आताशा असे अनेक सुमित / सुनीता आम्हा डॉक्टरांच्या पाहण्यात येत आहेत की, ज्यांचे वजन हे गेल्या दोन वर्षात अचानक धोकादायक प्रकारे वाढले आहे. अशातच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा(NFHS-5) रिपोर्ट प्रकाशित झाला. २०१९ ते २०२१ च्या कालावधीत केला गेलेला हा सर्व्हे सांगतो की, पाच वर्षांच्या आतील ३.४ टक्के मुलं स्थूलतेकडे झुकलेली आहेत. हेच प्रमाण २०१५-१६ या कालावधीत २.१ टक्के होते. भारताची लोकसंख्या बघता ०.१ टक्के जरी वाढला तरी त्याची संख्या प्रचंड वाढली असते हे आपल्याला समजेल. हीच मुले अजून १५/२० वर्षांच्या कालावधीनंतर भारताचे स्थूल नागरिक होणार आहेत.
(Image : Google)
बरं, आता हे सुमुतच्या बाबतीत का झाले ते पाहुयात.
सुमित वय वर्षे ८, वजन ४६ किलो. लॉकडाऊन लागला आणि सुमितची शाळा बंद झाली. त्याचे घराबाहेर पडणे बंद झाले. मित्रांबरोबर खेळणे बंद झाले. शारीरिक हालचाल बंद, एकाच घरात राहून राहून तो कंटाळला म्हणून घरीच टीव्हीसमोर बसू लागला, कार्टूनमध्ये गुरफटून गेला. येता-जाता बिस्किटे, चिप्स, चिवडा, चॉकलेट खाऊ लागला. त्यातच शाळा ऑनलाइन झाली. आता सुमितकरिता त्याचा स्वतःचा टॅब / मोबाइल आला. त्यावर शाळेच्या वेळी शाळा व इतर वेळी गेम्स आणि कार्टून तो पाहू लागला. त्याला नवनवीन गेम्सची माहिती झाली, तो ते खेळू लागला किंवा आता मोबाइल किंवा टॅबवरच त्याचे आवडीचे कार्टून पाहू लागला. २४ तास मुलगा घरी आहे तो कंटाळत असेल म्हणून आई-बाबापण त्याला विरोध करत नसत. कार्टून बघतोय पण शांत बसतोय ना, आपले ऑफिसचे काम करून देतोय ना मग ते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. ही अशी लाइफस्टाइल किती धोक्याची आहे ते समजायला २ वर्षे लागली. जेव्हा सुमित दहा पावले जरी चालला तरी धाप टाकू लागला. घामाघूम होऊ लागला. सततच्या स्क्रीन एक्सपोजरमुळे त्याच्या डोळ्यांवर ताण येऊन चष्मा लागला तो वेगळाच ! तशात टीव्हीवरच्या वेगवेगळ्या पेयांच्या जाहिराती, चॉकलेट्सच्या जाहिराती, अमुक चॉकलेटमध्ये कसे दूध आणि गव्हाचे प्रोटीन आहे. शिवाय त्याचा अंड्यासारखा आकार म्हणजे ते पौष्टिक असणार, असा झालेला समज. मोबाइलवर असणारे हॉटेलचे चमचमीत जेवण घरपोच देणारे ॲप्स म्हणजे एकप्रकारे माकडाच्या हाती कोलीत दिले गेले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि सुमितचे वजन कमी कालावधीत प्रचंड वाढले.
आधी सर्वांना तो किती छान गुटगुटीत झालाय, गोबरे गाल झालेत लॉकडाउन मानवले सुमितला असे वाटत होते. आपल्याकडे मुळातच अन्न साक्षरता नाहीये. न्यूट्रिशन हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात असावा असे माझे मत आहे. आपल्या शरीराला काय चांगले, काय वाईट आहे हे शाळेत शिकवले गेले की त्याचा जास्त फायदा होईल. मुळात अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन हे दोन्हीही प्रकार कुपोषणातच मोडतात हे लोकांना कळतच नाही. कुपोषित बालके ही वजनाने कमी, ज्यांना खायला प्यायला मिळत नाही, अशी साधारणपणे मेळघाटात असतात, तशी असेच त्यांना वाटते. स्थूल असलेली मुले देखील कुपोषणाची शिकार असतात हे मात्र पालकांना पटवून द्यावे लागते.
सुमितच्या बाबतीत मला त्याच्या आई-वडिलांशी बोलावे लागले. कारण सुमितला परत पहिल्यासारखा करणे ही आताची प्राथमिकता होती. जसे हे वजन एका दिवसात वाढले नाही, तसे ते लगेच कमी पण होणार नाही. त्यासाठी पूर्ण कुटुंबाला आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत, हे त्यांना सांगितले. त्यांना ते पटले, त्यामुळे सुमित आता फॅट टू फिट व्हायच्या मार्गावर चालायला लागला आहे. तुमच्या घरचे सुमित आणि सुनीता काय म्हणतायेत?
(Image : Google)
सुमित आणि त्याच्या आई-बाबांनी काय करायला हवे?
१ वाण सामानामध्ये बेकारीचे पदार्थ जसे ब्रेड, बिस्किटे, टोस्ट पूर्ण बंद करा. चॉकलेट किंवा दुधात घालून त्याची फक्त चॉकलेटी चव करणारी पेय पूर्ण बंद करा, कितीही भारी जाहिरात असली किंवा कितीही मोठा खेळाडू / सिनेमा स्टार ती जाहिरात करत असला तरीही बंदच !
२. चहा, कॉफी, बाटलीबंद पेय, टेट्रापॅकमधील फ्रूट ज्यूस (प्रचंड प्रमाणात साखर टाकलेली असते त्यात) गोड आणि तळलेल्या गोष्टी जसे की पेढा, बंगाली मिठाया, सामोसे इत्यादी बंद.
३. हॉटेलमधील खाणे रस्त्यावरचे, उघड्यावरचे खाणे, लोणी आणि चीजचा मारा केलेले खाद्यपदार्थ बंद. त्याबरोबरच टू मिनिट्ससाठी प्रसिद्ध असलेले मैद्याचे मसाला टाकून पाण्यात उकळून केलेले पदार्थ बंद.
४. सर्वांनी घरी बनवलेला ताजा नाष्टा जसे पोहे, उपीट, इडली, डोसा, आप्पे या घरगुती पदार्थांनी दिवसाची सुरुवात करावी. नाष्टा टाळू नय. दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार आहेत तो.
५. दुपारच्या जेवणात भाजी फुलके, वरणभात, कोशिंबीर, ताक, मठ्ठा जरूर असावा. पालेभाज्या आणि मोड आलेल्या धान्याचा मुबलक वापर करावा, काकडी, कांदा, गाजर, बीट यांच्या चकत्या पण ताटात असाव्यात .
६. रात्रीचे जेवण हलके असावे. म्हणजे वन पॉट मिलसारखे. कधी सालीच्या डाळी घालून व भाज्या घालून केलेली खिचडी, कधी वरणफळ, कधी दलियाची खिचडी, पिठले भाकरी आणि त्याबरोबर भरपूर सॅलेड.
७. तीन जेवणाच्या अधेमधे काहीही खायला देऊ नये, पाणी भरपूर देणे.
८. सर्वात महत्त्वाचे, जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात. त्यात शक्यतो बदल नको आणि जेवताना कुठलाही स्क्रीन समोर नको. टीव्हीचा नाही आणि मोबाईल / टॅबचाही नाही. जेवणाची वेळ सर्वांनी पाळावी, घरातील वडीलधाऱ्या माणसांनी पण हे पाळावे तरच मुले अनुकरण करतील.
९. स्क्रीनटाईम कमीत कमी ठेवून वाचलेला वेळ मैदानी खेळ, चालणे, धावणे, बॅडमिंटन, सायकल चालवणे यात घालवावा.
१०. घरी आठवड्याचा मेनू नीट आखून ठेवला की, हे सर्व आरामात करता येते.
(Image : Google)
घरात तक्ता लावा...
आजकाल माहितीचा स्रोत आपल्या हातात आहे. आयएपी म्हणजे इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स ही बालरोगतज्ज्ञांची जी संस्था आहे. त्यांनी वय आणि लिंगानुसार, मुलांचा BMI त्यांच्या वजन व उंचीनुसार कसा काढायचा आणि तो तक्त्यावर कसा मांडायचा, याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपल्या मुलांचा BMI काढून आपण बघू शकतो, की तो स्थूलतेकडे झुकला आहे की नाही.
वजनात झालेली वाढ लपून राहात नाही, ती लगेच लक्षात यायला हवी. तिचे दूरगामी दुष्परिणाम आहेत. उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेह, काही प्रकारचे कर्करोग, त्याचबरोबर सततच्या इतर मुलांच्या चिडवण्यामुळे येणारे मानसिक अस्वास्थ्य जसे डिप्रेशनही येत असते. त्याला वेळीच आवर घालणे आपल्या हातात आहे.
लठ्ठ होणार का?
२०३०मध्ये जगातील १० स्थूल बालकांमधील १ बालक हा भारतीय असणार आहे.
हे नको असेल तर प्रत्येकाला या धोक्याबद्दल अवगत करायला हवे. सरकारी धोरणात रस्त्यांबरोबरच सायकल ट्रॅक, खुली मैदाने, ओपन जिम, शाळा कॉलेजमध्ये मैदानी खेळांसाठी राखीव मैदाने असायला हवीत. त्यासाठी आपण मुळात आग्रही असावे.
सुरुवात कुटुंबापासून व्हायला हवी. हा लेख वाचून घरात बेकरी आणि मिष्ठान्न भांडारमधील खाद्यपदार्थ बंद झाले आणि मोबाईलचा वापर कमीत कमी झाला तर २० टक्के लढाई आपण जिंकलो, असे म्हणता येईल.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)