मुलांची तब्येत सांभाळायची म्हणजे तमाम आई वर्गापुढे एक मोठं आव्हान असतं. काही ना काही कारणाने मुलांसमोर येणारं जंक फूड आणि बदलतं हवामान यांमध्ये मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी नेमकं काय करायला हवं हे अनेकींना माहित नसते. घरचं खायला देऊन, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनही मूल सतत आजारी पडतं आणि मग सगळं घर आजारी पडल्यासारखं वाटतं. कधी कधी मुलांची भूक अचानक कमी होते तर कधी मुलांना सतत कोणती ना कोणती इन्फेक्शन्स होतात. तुमच्या मुलांसोबत सतत असं काही ना काही होत असेल तर तुम्ही वेळीच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. अनेकदा सगळं नीट करुनही मुलांची तब्येत सुधरत नसल्याने आई म्हणून आपल्यालाच नैराश्य यायला लागते. पण असे करण्यापेक्षा मुलांची भूक कमी होण्यामागे किंवा प्रतिकारशक्ती कमी होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते शोधायला हवे (Parenting Tips about Children Who Had Low Immunity and Low Appetite).
काय असतं असं होण्याचं कारण?
इन्स्टाग्रामवर ‘लिटील चेरी मॉम’ नावाचे पेज चालवणाऱ्या ज्योती श्रीवास्तव यांनी मुलांना अशाप्रकारचे त्रास होण्याची काही कारणे सांगितली आहेत. त्या सांगतात भारतातील बहुतांश मुलांमध्ये लोह आणि झिंक यांची कमतरता असते. ही समस्या अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. मात्र त्यामुळेच भूक कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि अन्नाची वासना उडणे अशा समस्या उद्भवतात. असे झाल्यास मुलं एकतर खूप अॅक्टीव्ह होतात किंवा एकदम सुस्ती आल्यासारखे करतात. या सगळ्यामध्ये मुलांचे वजनही अचानक कमी व्हायला लागते.
उपाय काय?
१. पालकांनी मुलांना डॉक्टरांकडे नेणे आवश्यक असते. डॉक्टर अशावेळी मुलांना गरज पडल्यास आवश्यक ती सप्लिमेंटस देतात ज्यामुळे शरीरातील मायक्रोन्यूट्रीअंटसची कमतरता भरुन निघते.
२. ही सायकल नीट व्हावी यासाठी वजन वाढवण्याच्या मागे न लागता बॅलन्स डाएट घेणे महत्त्वाचे आहे.
३. ज्योती सांगतात, तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या मुलाच्या डाएटमध्ये किमान अंड्याचा समावेश करायलाच हवा. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिलेले अंडे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते.
४. मूल लहान असताना त्याच्या सुरुवातीच्या डाएटमधून त्याला पोषण मिळणे अतिशय आवश्यक असते.
५. अनेकदा ‘पोट भरलं ना मग बास’ असं लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं जातं. मात्र मुलांचं पोट लहान असलं तरी त्यांच्या पोटात जाणारा प्रत्येक घास अतिशय महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
ज्योती कायम डाएट, फिटनेस, मुलांची वाढ अशा विविध विषयांवर नव्याने पालक झालेल्यांना मार्गदर्शन करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे असंख्य फॉलोअर्स असून या माध्यमातून त्यांना काही ना काही चांगली माहिती देण्याचा प्रयत्न ज्योती करत असतात. आताच्या पोस्टमध्येही त्यांनी झिंक आणि लोह देणारे पदार्थ कोणते यांची यादी दिली आहे. त्यानुसार आपल्या मुलांच्या आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.