श्रुती पानसेपुरेसा अभ्यास झालेला असला की परीक्षाही छान जातेच. हे वाक्य ऐकायला चांगले आहे; पण पुरेसा अभ्यास झालेला नसेल किंवा झाल्यासारखा वाटत नसेल तर?आता अगदी जवळ येऊन ठेपलेल्या बोर्डाच्या परीक्षांच्या वातावरणात हा प्रश्न येता-जाता समोर येतोच. पालकांना विचारला जातो, मुलांनाही. अभ्यास झाला का?खरेतर अभ्यास झाला का, यापेक्षा परीक्षा कशी छान जाणार, असा प्रश्न पडायला हवा.त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे? तर स्वत:ला हे काही प्रश्न विचारले की उत्तर सापडत जाईल.
अभ्यास किती झाला?आपला अभ्यास पुरेसा झाला आहे, हे कसे समजायचे? हे कसे लक्षात येईल? यासाठी एक उपाय करून बघा. मागच्या काही वर्षांतले बोर्डचे पेपर तुमच्याकडे असतीलच. ते समोर ठेवा आणि हातात एक पेन्सिल ठेवा. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत ओळीने वाचा. ज्या प्रश्नाची उत्तरे येत आहेत, त्यावर खूण करा. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतल्या किती टक्के प्रश्नांची उत्तर येत आहेत, हे बघा.१.१०० टक्के उत्तरे आली, तर समजा की आपला अभ्यास झाला आहे. आता लेखनाचा सराव हवा आहे.२. ८० ते ९० टक्के प्रश्नांची उत्तरे येत आहेत, असे वाटले तर ज्या प्रश्नांची उत्तरे आलेली नाहीत, तो अभ्यास बाकी राहिला आहे असे समजा. तो करा.३. ५० ते ७० टक्के प्रश्नांची उत्तरे आली तर व्यवस्थित टाइमटेबल करा आणि प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या.४. त्यापेक्षा कमी टक्के प्रश्नांची उत्तरे येत असतील तर टाइमटेबल करा. प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या. जे विषय जास्त अवघड आहेत, त्यांना जास्त वेळ द्या.५. प्रश्नाची उत्तरे वाचून झाल्यावर आठवा आणि लिहून काढा. गणिताचा अभ्यास रोज करा. आकृत्या काढा. रोज काय करायचे हे ठरवून पूर्ण करा.५. परीक्षेला किती दिवस राहिले, त्यानुसार नियोजन आराखडा करा. त्यानुसार अभ्यास करा. म्हणजे ताण येणार नाही. कमी दिवसातही अभ्यास नीट होईल.
शांत झोपताय ना रात्री? आणि किती तास?परीक्षेच्या काळात अभ्यास असला तरी झोप व्यवस्थित झाली पाहिजे. किमान ७ - ८ तास झोप झाली नाही तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो. रात्री जागून दुपारी झोपायचे हेही शक्यतो टाळा. रात्रीची नीट आणि शांत झोप घ्या.काय म्हणता खेळणेच बंद केले?तुम्हाला जर नेहमी खेळायची सवय असेल तर त्याची शरीराला सवय झालेली असते. आपल्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ असते. खेळल्यामुळे शरीराच्या हालचालीतून उत्साहवर्धक रसायने निर्माण होत असतात; पण आता खेळ बंद झाल्यामुळे अस्वस्थता येते. मन एकाग्र व्हायला वेळ लागतो. सारखे अभ्यासातून उठावेसे वाटते. म्हणून अभ्यास करताना तासाभराने पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन हालचाल करावी. उड्या मारणे, नाच करणे, सायकलवर छोटी चक्कर मारून येणे, शांतपणे दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे हा व्यायाम करा. यात जास्त वेळ घालवायचा नाही; पण झोप आली, कंटाळा आला, डोक्यात काही शिरेनासे झाले, याचा अर्थ असा की मेंदूला ऑक्सिजनची गरज आहे. हलका व्यायाम केला की ऑक्सिजन मिळतो. मेंदू पुन्हा छान चालायला लागतो.
अभ्यासाची तुमची पद्धत शोधा.आता परीक्षेला थोडेच दिवस उरले आहेत. आता जो काही अभ्यास होईल, त्यावरच परीक्षा द्यायची आहे. म्हणून अभ्यासाची आपली पद्धत शोधून काढायची. त्यात येणारे अडथळे दूर करायचे. अभ्यास चांगला झाला तर चांगले मार्क मिळतात. म्हणून रोजच्या अभ्यासाकडे, त्यातल्या प्रत्येक तासाकडे लक्ष दिले तर त्याचे परिणाम नक्की चांगले मिळतील.
मोबाइलचे काय करू?आता शाळेला सुटी असल्यामुळे पूर्ण वेळ अभ्यासच करायचा आहे. मित्र- मैत्रिणी यांच्याशी गप्पा मारायला हरकत नाही; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मोबाइलवर जास्त वेळ घालवू नका. तो दूर ठेवा. आई-बाबांनी परीक्षेच्या वेळी फोन काढून घेतला तर ते ठीकच आहे. खरेतर आपणच तो बाजूला, दुसऱ्या खोलीत किंवा बंद करून ठेवावा. मोबाइलवर गेम्स खेळण्यात वेळ घालवतो. त्यात मेंदू इतका गुंगतो की किती वेळ गेला हे कळतच नाही. असे वेगवान गेम खेळून मोबाइल बाजूला ठेवला की अभ्यासात पुन्हा लक्ष घालणे महाकठीण वाटते, कारण मेंदूला त्या वेगाची सवय झालेली असते. तो वेग काही केल्या अभ्यासात आणता येत नाही.गेम नसतील तर उगाचच काही बाही रील्स बघत बसतो. या कचरा रील्सने तर मेंदू अक्षरश: सडतो. एकदा मोबाइल हातात घेतला की आपल्याला घड्याळ, अभ्यास, टाइमटेबल कसले भानच राहत नाही. अर्धा तास – एक ताससुद्धा कसा गेला, हे समजत नाही. हातात फोन कशासाठी घेतला होता, हेही आठवत नाही.मोबाइल बाजूला काढून ठेवला नाही तर आपला अभ्यासच होणार नाही, हे विसरू नका.(करिअर काउन्सिलर आणि मेंदूविषयक अभ्यास तज्ज्ञ)drshrutipanse@gmail.com