डॉ. श्रुती पानसे
मोबाईल फोनवर व्हिडिओ गेम्स खेळायला सगळ्यांनाच आवडतं. त्यात किती वेळ जातो हे कळतही नाही. पण सतत गेम्स खेळल्याने मेंदूवर वेगळेच- फारसे चांगले नसलेले परिणाम होतात. मुख्य म्हणजे अभ्यासात याचे अडथळे येतात. डोळ्यांवर वाईट परिणाम तर होतातच, पण मेंदूही आळशी होतो. मेंदूला एकाग्र व्हायला जमत नाही. नक्की कोणतं उत्तर लिहायचं, यांचा गोंधळ होतो. आपल्या मेंदूतल्या ग्रे मॅटर या भागावर जास्त मोबाईल गेम्स बघण्याचा परिणाम होतो. शिवाय त्यात आपला वेळ किती जातो हे ही समजत नाही. आपण जर स्क्रीनचा खूप वापर करणं सोडलं नाही तर शरीर आणि मेंदूवरचे हे दुष्परिणाम वाढतच जातात. पण आपला मेंदू उत्साही करायचा असेल आणि त्याला छान अभ्यासात ठेवायचं असेल तर काय करायचं?
(Image : Google)
तर, स्क्रीनचा मर्यादीत वापर करायचा आणि त्या ऐवजी भरपूर पुस्तकं वाचायची. विविध पद्धतीचं वाचन केल्यामुळे मेंदूमध्ये खूप चांगले बदल घडून येतात. सगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी ही एक गोष्ट खूप मदत करते, ती म्हणजे वाचन. पाठ्यपुस्तकांचं वाचन हा झाला अभ्यासाचा भाग. पण त्याशिवाय जी गोष्टींची पुस्तकं असतात. ती वाचायला हवीत. त्यामध्ये विशेष माणसांची – शास्त्रज्ञांची, खेळाडूंची, उद्योजकांची चरित्रं असतील. कोणी स्वत:च्या आत्मचरित्रात आयुष्याविषयीचे अनुभव लिहून ठेवले असतील. अजिबातच खऱ्या नसलेल्या फक्त कल्पनाशक्ती वापरून लिहिलेल्या गोष्टी असतील किंवा काळाच्या पुढे जाऊन विज्ञानाचा आधार घेऊन लिहिलेल्या कथा असतील. साहसकथा असतील. पुस्तकांचे असे अनेक प्रकार असतात.
असं काहीही वाचलं तरी ते आपल्या मेंदूत जातं. संपूर्ण पुस्तक लक्षात राहिलं नाही तरी त्यातल्या ठळक, आपल्याला आवडतील अशा गोष्टी नक्की लक्षात राहतील. यांचा उपयोग ठिकठिकाणी होतो, पण त्यासाठी आधी काही प्रश्न स्वत:लाच विचारा!
(image : Google)
एकेक प्रश्न विचारा...
प्रत्येक उत्तरासाठी दोन मिनिटं थांबा. आठवा. स्वत:ला उत्तर द्या आणि मगच पुढच्या प्रश्नांकडे वळा.
1. मी कोणकोणती गोष्टींची पुस्तकं वाचली आहेत?
2. त्यातली किती आणि कोणती पुस्तकं मला आत्ता लगेच आठवताहेत?
3. कोणती पुस्तकं जरा स्मरणशक्तीला ताण दिल्यावर आठवतात?
4. या पुस्तकांचे विषय काय होते ?
5. या पुस्तकांमधलं मला काय आवडलं? पुस्तकातली एखादी व्यक्तिरेखा, एखादी कल्पना, प्रसंग, गंमत.
6. कधीकधी एखादं पुस्तक किंवा त्या पुस्तकातली एखादी गोष्ट आवडत नाही. असं का होतं? एखाद्या पुस्तकातली अशी एखादी न आवडलेली व्यक्तिरेखा कोणती? ती का आवडली नाही? एखादी कल्पना का आवडली नाही?
7. तुम्ही वाचलेल्या पुस्तकात चित्रं होती का? ती चित्र आठवताहेत का?
कोणत्याही प्रकारचं वाचन केल्यामुळे आपली भाषा – वाक्यं सुसंगत होतात. विचारांना एक ओघ येतो. शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे अनेक ठिकाणी चपखल शब्द वापरता येतात. एक प्रकारे आपल्या अभ्यासाला यांची नकळत मदत होते. हातात सतत मोबाईल असेल आणि त्यावर गेम्स चालू असण्यापेक्षा हातात कोणतंही पुस्तक असेल आणि ते तुम्ही वाचत असाल. विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं छानपैकी देता आली तर यांचा भरपूर चांगला उपयोग आपल्याला अभ्यासात खूपच होईल. मग, तुम्ही हातात काय घ्याल? पुस्तक की मोबाईल फोन?
(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.)
संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830
अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी)