लहान मुलं काही वेळा अजिबात ऐकत नाहीत आणि आपल्याला हवं तेच करत राहतात. टीव्ही आणि मोबाईल हे तर सध्या आई-वडीलांपुढील सर्वात महत्त्वाचे प्रश्न बनले आहेत. मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. अनेकदा मुलं सांगूनही ऐकत नाहीत आणि मग आई-वडील वैतागून त्यांना काही ना काही शिक्षा देतात. पण सतत टीव्ही पाहणाऱ्या एका मुलाला आई-वडीलांनी अतिशय अनोखी शिक्षा दिली आहे. चीनमधील एका ८ वर्षाच्या मुलाला आई-वडीलांनी दिलेली शिक्षा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही (Chinese Parents Punishment to Child Force him to Watch TV Through Night).
तर हा मुलगा सतत टीव्ही पाहायचा. म्हणून आई-वडीलांनी त्याला रात्रभर झोपू न देता टीव्ही पाहायला बसवले. त्याचे आई-बाबा संध्याकाळी फिरायला गेले होते. घराबाहेर जाताना त्याने काय काय करायचे आहे हे आई त्याला सांगून गेली होती. होमवर्क करुन त्यानंतर जेवण करुन ८.३० वाजेपर्यंत झोप अशा सूचना आईने त्याला दिल्या होत्या. आता आई घरात नाही म्हटल्यावर मुलगा काही ना काही मज्जा तर करणारच. त्यामुळे हा मुलगा सगळे आवरुन न झोपता बराच वेळ टिव्ही पाहत बसला. आई-वडील बाहेरुन फिरुन आले तरीही तो टीव्ही पाहत असल्याचे पाहून आई-वडीलांचा पारा नक्कीच चढला असणार.
आई-बाबा आल्यावर हा मुलगा घाबरुन झोपायला निघाला. त्यावेळी आई-बाबांनी त्याला झोपायला न जाता रात्रभर टिव्ही पाहत बसवून ठेवले. सुरुवातील कदाचित त्याला अशाप्रकारे रात्रभर टिव्ही पाहायला मिळणार म्हणून मज्जा वाटली असावी. पण नंतर त्याला खूप झोप यायला लागली आणि कधी एकदा आपल्या खोलीत जाऊन झोपतो असे त्याला व्हायला लागले. मात्र आई-बाबांनी त्याला रात्रभर अजिबात झोपू दिले नाही आणि पूर्ण वेळ त्याला टिव्ही पाहत बसायला लावले. असे साधारण पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होते. चीनमधील जोडप्याने दिलेल्या या शिक्षेचे काही पालकांकडून कौतुक होत आहे तर काही पालक इतकी कठोर शिक्षा मुलांना द्यायला नको असेही म्हणत आहेत.