Join us  

मुलांसाठी पाळणाघर निवडताय? निर्णय घेण्यापूर्वी १० गोष्टी तपासून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 4:53 PM

पाळणाघर ही आवश्यक सपोर्ट सिस्टिम आहे, त्यामुळे पाळणाघराची निवड अत्यंत बारकाईने करायला हवी.

ठळक मुद्देसर्वात महत्त्वाचे आपल्या मुलाला याठिकाणी आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण मिळत आहे ना याबाबत वारंवार चौकशी करायला हवी.पालकांनी ही सजगपणे मुलांची सुरक्षा, स्वच्छता व योग्य वातावरणाची खात्री करून पाळणाघराची निवड करावी..

देवकी आठवले

पूर्वी पाळणाघर म्हणजे ओळखीच्या किंवा शेजारपाजरच्या काकूंकडे २-४ तासांसाठी सगळी मुले खेळायला एकत्र जमणे असे होते. मात्र गेल्या काही वर्षात पाळणाघराची व्याख्याच बदलली असून शहरी भागात पाळणाघर म्हणजेच डे केअरची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. पाळणाघर ही एक सपोर्ट सिस्टिम आहे. आईवडील दोघे नोकरी करत असतील तर मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरांची व्यवस्था आवश्यक बनली. सुरुवातीच्या काळात घरगुती स्वरूपात, अगदी लहान जागेतही २-४ मुलांना सांभाळले जायचे. आता बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलत गेले.

आज काल व्यवसाय म्हणून गल्लोगल्ली पाळणाघरं दिसतात. पण आपण दिवसभर मुलांना ज्याठिकाणी ठेवतो ती जागा, तेथील व्यक्ती खरंच चांगल्या आहेत का, आपल्या मुलांचा त्याठिकाणी विकास होत आहे का याबाबत खातरजमा करणे आवश्यक असते. मुलांना मोकळे वातावरण मिळणे, त्यांच्या जिज्ञासा जोपासल्या जाणे, कलागुणांना वाव मिळणे, ताजे स्वच्छ अन्न मिळणे, समवयस्कांचा सहवास, या गोष्टींचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. कारण पाळणाघर म्हणजे, ठराविक वेळेसाठी मुले सांभाळणे इतकेच नाही तर मुलांच्या संगोपनात घर, शाळा हे जितके महत्त्वाचे असते तितकेच आता पाळणाघरही महत्त्वाचे असते. अभ्यासू वृत्तीने पाळणाघराची निर्मिती व्हायला हवी, या विषयातील शिक्षण घेतलेल्या, अनुभव असलेल्या माहीती असलेल्या व्यक्तींनीच पाळणाघर सुरु करावे. तसेच पालकांनी ही सजगपणे मुलांची सुरक्षा, स्वच्छता व योग्य वातावरणाची खात्री करून पाळणाघराची निवड करावी..

(Image : Google)

पाळणाघराची निवड करताना काय तपासून पाहाल?

१) पाळणाघर सुरु करणाऱ्या संचालिकेपासून, शिक्षक, मदतनीस ताई, सफाई मदतनीस सर्व प्रशिक्षित असावेत.

२) मुलांची आवड असणारा व त्यांना मायेने सांभाळणारा स्टाफ हवा. मुलांना सांभाळण्याचे काम हे वाटते तितके सोपे नाही तर त्यासाठी पेशन्सची आवश्यकता असते. तसे वातावरण पाळणाघरात आहे का?

३) पाळणाघरची जागा मोठी, हवेशीर असावी. याठिकाणी उजेड चागंला असावा. तसेच मुलांना खेळण्यासाठी, वावरण्यासाठी ही जागा सोयीस्कर आहे हे पहायला हवे.

४) पाळणाघरात सर्व वयोगटातील मुलांचा विचार करून खेळ इतर साधने असावीत. जेणेकरुन आपले मूल कंटाळणार नाही आणि छान रमेल.

५) मुलांचा सर्वांगिण विकास साधला जाईल अशा ॲक्टिव्हिटीज याठिकाणी होतात ना याबाबत खात्री करावी.

६) अन्न हा पाळणाघरातील महत्त्वाचा मुद्दा आहे. लहान मुलांना आवश्यक असणारे ताजे व स्वच्छ ठिकाणी केलेले आणि पौष्टिक अन्न दिले जावे.

(Image : Google)

७) लहान मुलांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता. तर पाळणाघराची जागा, तेथील खिडक्या किंवा इतर गोष्टी, त्याठिकाणी वावर असणाऱ्या व्यक्ती सुरक्षेच्यादृष्टीने योग्य आहेत ना याबाबत खातरजमा करावी.

८) मुलांशी व पालकांशी सुयोग्य संवाद वेळोवेळी साधला जात आहे ना हे पाहायला हवे.

९) पाळणाघराची वेळ, आकारली जाणारी फी, सर्व सुविधा, मनुष्यबळ या सर्वाचा योग्य तो मेळ असावा.

१०) सर्वात महत्त्वाचे आपल्या मुलाला याठिकाणी आनंदी आणि खेळीमेळीचे वातावरण मिळत आहे ना याबाबत वारंवार चौकशी करायला हवी.

(लेखिका पुण्यात पाळणाघर चालक आहेत)

टॅग्स :पालकत्वलहान मुलं