Join us  

मुलांना ताप भरला की आईबाबा हमखास घाबरुन ४ चुका करतात, ताप तर उतरत नाहीच उलट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 6:01 PM

Common Mistakes We Do When The Baby Has Fever : डॉ. माधवी भारद्वाज यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे.

लहान मुलांना ताप येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. हवेत थोडा बदल झाला किंवा एखाद्या विषाणूचा संसर्ग झाला तर मुलांना लगेच ताप येतो. अशाप्रकारे ताप येणे त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ताप आल्यानंतर मुलं त्या विषाणूशी प्रतिकार करण्यास सक्षम होतात आणि शरीरात प्रतिविषाणूची निर्मिती करतात. त्यामुळे पुन्हा त्याच विषाणूने शरीरावर आघात केला तर शरीराची प्रतिकारशक्ती त्याच्याशी लढण्यासाठी तयार झालेली असते. कधी दात येताना, तर कधी ताप आलेल्या कोणाच्या संपर्कात आल्यावर मुलांना सणकून ताप येतो. मुलांना ताप आला की आई-बाबा पार घाबरुन जातात आणि नेमके काय करावे ते त्यांना सुचत नाहीत (Common Mistakes We Do When The Baby Has Fever). 

कारण एरवी दंगामस्ती करणारी, घरभर बागडणारी ही मुलं अचानक मलूल होतात. तापामुळे त्यांना खायलाही नीट जात नसल्याने ते सतत कुरकुरत राहतात. घाबरुन गेल्याने आपल्याकडून मुलांना सांभाळताना काही हमखास चुका होतात. या चुका कोणत्या आणि त्या होऊ नयेत म्हणून पालकांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी याविषयी डॉ. माधवी भारद्वाज यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या पालकांसाठी त्यांनी या महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या असून त्या काय सांगतात पाहूया...

(Image : Google)

१. गरम कपडे घालू नका

मुलांना ताप आला की आपण साधारणपणे त्यांना गरम कपडे घालतो. यामध्ये अगदी पायमोज्यांपासून ते टोपड्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. मात्र गरम कपडे घातल्याने मुलांना आणखी इरीटेशन होते आणि त्यांचा ताप उतरत नाही. त्यामुळे मुलांना ताप आला असताना असे गरम कपडे घालणे टाळायला हवे. 

२. गार पाण्याच्या पट्ट्या ठेवण्याबाबत

साधारणपणे ताप आला की मुलांच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवतो. पण या पट्ट्या गार पाण्याच्या न ठेवता सामान्य तापमानाच्या पाण्याच्या ठेवाव्यात. पाण्याने पुसल्यावर मुलांना थंडी वाजेल आणि त्यामुळे ताप वाढेल असे आपल्याला वाटते. मात्र तसे नसून यामुळे ताप उतरण्यास मदत होते हे लक्षात घ्यायला हवे. 

३. मुलं काहीच खात नाहीत तेव्हा 

ताप आल्यावर सहसा आपल्यालाही अन्न नकोसे वाटते. त्याचप्रमाणे तापाने मुलांच्या तोंडाची चव गेलेली असते. अशावेळी त्यांना अन्न नकोसे होते. आता पोटात काहीच नाही तर मुलांना औषध कसे द्यायचे असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. पण सामान्यपणे ताप आल्यावर डॉक्टर पॅरासिटमॉल देतात. मुलाला अॅसिडीटीचा त्रास नसेल तर आपण रिकाम्या पोटीही हे पॅरासिटमॉल देऊ शकतो ज्यामुळे काही वेळात ताप उतरण्यास मदत होते आणि मूल अन्न खाण्यास तयार होण्याची शक्यता असते. मात्र आपण औषध द्यायचे म्हणून जबरदस्ती अन्न भरवल्यास मूल उलटी करण्याची शक्यात असते. त्यामुळे असे करणे टाळावे. यापेक्षा मुलांना द्रव पदार्थ देत राहावेत जेणेकरुन मूल डिहायड्रेट होणार नाही. 

४.  खोलीच्या तापमानाकडे लक्ष द्या

मुलांना ताप आला की आपण फॅन, एसी सगळं बंद करतो. मात्र यामुळे मुलांना जास्त इरीटेट होतं. असं न करता खोलीचं तापमान योग्य राहील याची काळजी घ्यायला हवी. ताप आलेला असताना मुलं फॅन, एसी या दोन्हीमध्ये राहू शकतात. मात्र ते खूप जास्त जोरात असू नये. तसेच या दोन्हीची हवा मुलांच्या थेट अंगावर येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्य