Join us  

जन्मत: बाळाच्या हृदयाला छिद्र असेल तर? पालकांना डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला.. घाबरु नका तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 2:02 PM

Congenital heart defects in children : दरवर्षी जन्मलेल्या दर १०० बाळांमधील एकाला जन्मजात हृदयदोष असतो. दरवर्षी याच्या २.५ मिलियन केसेस आढळून येतात.

आईच्या पोटात गर्भ वाढत असताना त्याच्या हृदयाच्या एका किंवा अधिक भागांच्या सर्वसामान्य वाढीत काही चुका राहून गेल्यामुळे जन्मजात हृदयदोष (सीएचडी) उद्भवतो. जन्मजात हृदयदोषाचे अनेक प्रकार असतात, हृदयाला छिद्र असणे, हृदयातील वेगवेगळ्या संरचनांमधील त्रुटी किंवा चुका, हृदयातील विविध कप्प्यांना रक्तवाहिन्या चुकीच्या पद्धतीने जोडलेल्या असणे (धमन्यांची जागा चुकलेली असणे, हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट्स, पल्मनरी वेनस जोडण्यांमधील विसंगती, एओर्टिक आर्चेसमधील व्यत्यय, फुफ्फुसाच्या धमनीमधून डावी कोरोनरी धमनी जाण्याची विसंगती, एबस्टाईनची विसंगती आणि १२७ पेक्षा जास्त प्रकारच्या इतर विसंगत जोडण्या) यांचा यामध्ये समावेश होतो. (Types of Congenital Heart Defects you should be aware about) जन्मजात म्हणजेच बाळाला तो आजार जन्मापासूनच असतो. डॉ. स्मृती रंजन मोहंती (कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी 'लोकमत सखी'ला याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

दरवर्षी जन्मलेल्या दर १०० बाळांमधील एकाला जन्मजात हृदयदोष असतो. दरवर्षी याच्या २.५ मिलियन केसेस आढळून येतात. जन्मजात हृदयदोष असलेल्या लहान मुलांमध्ये काहीच लक्षणे दिसून न येण्याची देखील शक्यता असते किंवा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात, सतत घाम येणे, दूध नीट पिता न येणे, बाळाला सतत खोकला, सर्दी होणे, शारीरिक हालचाली करताना त्रास होणे यांचा त्यामध्ये समावेश होतो.

मोठ्या वयाच्या मुलांना थकवा, शुद्ध हरपणे आणि छातीत धडधडणे अशी लक्षणे जाणवतात. लक्षणे गंभीर व त्रासदायक असल्याने मुलांच्या जीवन गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो, त्यांच्यामध्ये गंभीर विकृती निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा जीवावर बेतण्याचा देखील धोका असतो. जन्मजात हृदयदोष मुलांना कमजोर करतो आणि जीवघेणा देखील ठरू शकतो ही बाब जरी खरी असली तरी यापैकी बहुतांश दोष उपचारांनी बरे होऊ शकतात. म्हणूनच त्यांना आजार नाही तर दोष म्हटले जाते.

लवकरात लवकर निदान आणि तातडीने उपचार केले गेल्यास जन्मजात हृदयदोष असलेल्या रुग्णांचा जीव वाचण्याचे प्रमाण चांगल्या कार्डियाक केयर सेंटर्समध्ये आज ९५% वर आले आहे. याचाच अर्थ असा की, जन्मजात हृदयदोष असलेल्या रुग्णांना आवश्यक ती योग्य देखभाल तातडीने मिळाली तर ती मुले देखील इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात.

फीटल २डी (2D) इको स्कॅन करून गर्भामध्ये असतानाच बाळाच्या हृदयाची इमेज मिळवणे शक्य आहे. बाळ जन्माला येण्याच्याही आधी जर जन्मजात हृदयदोष लक्षात आला तर उपचार नियोजन करण्यास भरपूर वाव असतो आणि प्रसूतीनंतर लगेचच आवश्यक ती कार्डियाक देखभाल घेणे सुरु करता येऊ शकते. अजून एक सर्वात चांगला पर्याय म्हणजे जन्मानंतर प्रत्येक बाळाचा २डी (2D) इको करणे.  असे केल्यास बाळामध्ये जन्मजात हृदयदोष असेल, किंवा क्लिनिकली तशी शंका असेल तर त्याचे लगेचच निदान केले जाऊ शकते.

बाळाला पुढील उपचारांसाठी डेडिकेटेड कार्डियाक सेंटरमध्ये नेल्यास, त्याठिकाणी बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट्स, पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट्स, कार्डियाक सर्जन, ऍनेस्थेशिओलॉजिस्ट्स, इंटेन्सिव्हिस्ट आणि इतर विशेषज्ञांची सर्वसमावेशक टीम उपलब्ध असल्याने शक्य असलेले सर्वोत्तम उपचार बाळाला मिळू शकतात. प्रत्येक मुलामध्ये असलेला दोष आणि त्याचे/तिचे एकंदरीत आरोग्य यांना अनुसरून उपचार योजना ठरवली जाते.  उपचार हे इंटरव्हेन्शनल किंवा सर्जिकल पद्धतीचे किंवा दोन्हींचा समावेश असलेले असू शकतात. आज भारतातील सर्वोत्तम सेंटर्समध्ये अशा रुग्णांवरील उपचार यशस्वी होण्याचा दर आंतरराष्ट्रीय मानकांच्या तोडीचा आहे.

जन्मजात हृदयदोष उद्भवणे ही काही कोणाची चूक नाही, ना आईची, ना वडिलांची आणि बाळाची तर अजिबातच नाही. करेक्टिव्ह सर्जरी करून दोष दूर करणे हा बहुतांश हृदयदोषांवरील एकमेव उपाय असतो. जन्मजात हृदयदोष असलेले मूल जिवंत राहू शकणार नाही किंवा सामान्य आयुष्य जगू शकणार नाही असे खूप लोकांना वाटते पण हे पूर्णपणे खोटे आहे. जन्मजात हृदयदोष असलेल्या ज्या मुलांवर उपचार केले जातात अशी ९५% पेक्षा जास्त मुले सामान्य दीर्घायुष्य जगू शकतात.

जन्मजात हृदयदोष असलेल्या बाळांना वैद्यकीय देखभाल आणि उपचार मिळवून देण्यात त्यांच्या कुटुंबियांना येणारे सर्वात मोठे अडथळे हे नियोजनाच्या अभावामुळे आणि सामाजिक-आर्थिक घटकांमुळे तसेच या दोषांवरील उपचार परवडण्याजोगे नसतात अशा गैरसमजुतीमुळे निर्माण झालेले असतात. यांचे निवारण करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, राजकारणी, विमा कंपन्या, बँकर, परोपकारी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था आणि देखभाल करणाऱ्या व्यक्ती यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जबाबदारीचे भान असलेला समाज म्हणून आपण सर्वांनी देखील अशा बाळांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मदत म्हणजे केवळ आर्थिक साहाय्य नव्हे तर जागरूकता वाढवणे, माहिती पुरवणे, गैरसमज दूर करणे, उपचार साहाय्य पुरवणे आणि भावनात्मक पाठबळ देणे अशी कामे देखील आपण करू शकतो.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अमृत काळात भारतातील प्रत्येक मुलाला चांगले आरोग्य लाभावे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. जन्मजात हृदयरोगांविषयी संपूर्ण समाजात जागरूकता झाली आणि उद्दिष्टपूर्तीसाठी संपूर्ण समाज सक्रिय झाला तर हे शक्य आहे.  हे काम कठीण आहे पण असंभव नक्कीच नाही. जीवनशैली जर निरोगी असेल तर या आजारांचा धोका कमी होण्यात मदत होऊ शकते आणि एकंदरीत आरोग्यामध्ये देखील सुधारणा होते.

प्राथमिक आरोग्यसेवा यंत्रणा मजबूत केल्यास  कार्डिओलॉजी स्पेशलिस्ट्स न मिळण्यासारखे अडथळे दूर होऊ शकतात, दोषांचे लवकरात लवकर निदान केले जाऊ शकते. त्यापुढील देखभाल आणि उपचारांसाठी मल्टीडिसिप्लिनरी टीम दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांसाठी फुल-टाईम मॉडेल उपयोगात आणले जाऊ शकते. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य