-डॉ. श्रुती पानसे, (मेंदू आणि शिक्षण तज्ज्ञ)
चीनमधे किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर चीनमधील सरकारने निर्बंध लादले आहेत. पूर्वी रोज ९० मिनिटं आणि सुटीच्या दिवशी तीन तास ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना आठवड्यातून फक्त तीन दिवस विशिष्ट वेळेत फक्त एक तासच खेळता येणार आहे. मुलांमधे ऑनलाइन गेमिंगचं व्यसन गंभीर रुप धारण करत असल्यामुळे चीन सरकारने उचलेलं हे पाऊल आहे. चीन सरकारनं हे निर्बंध घालताना मुलांसोबतच ऑनलाइन कंपन्यांनाही जबाबदार धरत त्यांनीही मुलं ठरवून दिलेली वेळ पाळतील याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसंच मुलांना या ऑनलाइन गेमिंगपासून तोडण्यासाठी पालकांच्या गटांनी आणि समाजातल्या जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरजही अधोरेखित केली आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात चीननं उचलेल्या या पावलाची दखल अवघ्या जगानं घेतली. तसेच चीन सरकारच्या या कृतीमुळे ऑनलाइन गेमिंगचा मुलांच्या मनावर होणार्या वाईट परिणामांबद्दलही चर्चा होवू लागली. पण मुळात प्रश्न आहे की, गेमिंगचं एवढं व्यसन मुलांना लागलं कसं?
छायाचित्र:- गुगल
ऑनलाइन गेमकडे मुलं का ओढली जातात?
आसपासचं वातावरण जर डल असेल तर मुलं ऑनलाइन गेमिंगकडे वळतात. जसं आताचं कोरोनामुळे निर्माण झालेलं वातावरण. कारण या परिस्थितीत मुलांना मोकळेपणानं खूप काही करता येण्यासारखं राहिलेलंच नाही. मुलं बोअर होतात. आणि या बोअरडममुळे मुलं ऑनलाइन गेमिंगकडे वळतात. कारण या ऑनलाइन गेममधे खूप काही घडत असतं, तेही वेगानं. इकडे तिकडे बघायलाही मुलांना फुरसत नसते इतका वेग असतो या गेमना. या गेममधे आकर्षर रंग, लक्षवेधी संगीत, आवाज वापरले जातात. त्यामुळे मुलं त्या गेमकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या हातातून तो सोडवत नाही.
छायाचित्र:- गुगल
त्याचे परिणाम काय होतात?
१. मेंदुच्या ग्रे मॅटरवर होतो गंभीर परिणाम
२. मोबाइल गेमिंगचा मुलांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यातलं नेत्रजल जे आपल्याला जन्मत: मिळालेलं असतं ते मोबाइल स्क्रीनचा परिणाम होवून सुकतं. डोळे कोरडे होतात. मोबाइल स्क्रीनमधे प्रचंड उष्णता असते. तासनतास गेम खेळताना मोबाइल स्क्रीनचा प्रकाश डोळे आणि चेहेऱ्यावर पडत असतो. म्हणून तासनतास ऑनलाइन गेम खेळण्याचा परिणाम केवळ डोळ्यांवरच नाही तर त्वचेवरही होतो.
३. मुलं अभ्यासात, त्यांच्या कामात एकाग्र चित्त होवू शकत नाही. चलबिचल होते त्यांची हे करु की ते असा गोंधळ उडतो. तासनतास ऑनलाइन गेम खेळण्याचे परिणाम मुलांवर दीर्घकाळ परिणाम करतात. त्यामुळे वेळीच त्यांच्यातलं हे व्यसन कमी करणं आवश्यक आहे.
४. तासनतास अशी मोबाइल स्क्रीन डोळ्यासमोर धरल्यानं त्याचा परिणाम जितका डोळ्यावर होतो तितकाच तो मेंदूवरही होतो. मेंदूमधे ग्रे मॅटर नावाचा एक भाग असतो. तो काही अवयव नसतो. पण महत्त्वाचा भाग असतो. ऑनलाइन गेमिंगचं प्रमाण खूप झालं की हा ग्रे मॅटर हळूहळू कमी व्हायला लागतो. हा ग्रे मॅटर भाग निर्णयक्षमतेशी संबंधित असतो. याचाच अर्थ ऑनलाइन गेमिंगचं अतिप्रमाण हे मुलांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतं. म्हणूनच प्रमाणापेक्षा जास्त ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना नंतर कसलीच शुध्द राहात नाही. तहान भूक इतकंच काय नैसर्गिक विधीही जाणवत नाही. आपल्याला नक्की काय करायचंय याबाबतचा मेंदूमधला गोंधळ वाढतो. एकूणच हे खूप घातक आहे.
५. मुलांच्या निर्णयक्षमतेवर ऑनलाइन गेमिंगचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा तो एकूणच त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. सगळ्या बाबतीतला गोंधळ वाढतो. मग तो घरातला बाहेरचा असा सर्वच वाढतो.
(मुलाखत आणि शब्दांकन -माधुरी पेठकर)