मूल होणं हा कुणाही जोडप्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. मात्र हा निर्णय घेतल्यापासून महिलांना आपल्या करिअरबाबत चिंता वाटत असते. अशावेळी करिअर आहे तसे सुरु ठेवायचे की ब्रेक घ्यायचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. एकीकडे आपण घेतलेले शिक्षण, करिअरमध्ये ब्रेक झाल्यास मागे पडण्याची चिंता सतावत असते तर दुसरीकडे बाळाचा सांभाळ करायला योग्य असा पर्याय समोर दिसत नसतो. अखेर मनावर दगड ठेवून करिअरमध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय महिला घेतात. कधी तो त्यांनी त्यांच्या मनाने घेतलेला असतो तर कधी परिस्थितीमुळे त्यांना तो घ्यायला लागलेला असतो. अशावेळी आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल मनात सतत गिल्ट न आणता एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याचा नीट स्वीकार करणंही आवश्यक असतं (What you feel About taking break in career after Pregnancy).
ब्रेक तर घेतला पण..
आपण नोकरी करत नसल्याने नकळत आपल्या मनात कमीपणाची भावना येऊ शकते. हातात पैसे नसल्याने आपण कोणावर तरी अवलंबून आहोत किंवा नवऱ्याला आपले ओझे होऊ शकते अशाप्रकारच्या भावना महिलांच्या मनात येतात. या काळात मन आधीच हलके झालेले असल्याने मनात सतत विविध प्रकारचे विचार येत असतात. अशावेळी आपण घेतलेला निर्णय हा सगळ्यात योग्य असून त्याबाबत रिग्रेट करण्याची आवश्यकता नसते हे लक्षात घ्यायला हवे. आपण काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे यामध्ये गिल्टी वाटण्यासारखे काहीच नसते हे प्रत्येक आईने लक्षात घ्यायला हवे.
काही वर्षांनी आपण पुन्हा आपले करिअर सुरू करु शकतो. माझ्या बाळाला आता माझी गरज असल्याने मी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. अशाप्रकारची भावना आई म्हणून तुमच्या मनात असायला हवी. नाहीतर सतत मनात गिल्ट राहतो आणि त्यासोबत आपण जगत राहीलो तर आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही. आपण आनंदी नसू तर आपले कुटुंब आणि मूलही आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे सारासार विचार करुन घेतलेला कोणताही निर्णय हा आपल्यासाठी उत्तम आहे ही भावना मनात कायम हवी, तरच आपण मूल होण्याची आणि त्यानंतरच्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.