Join us  

तुम्ही बनवला का मुलांसोबत दिवाळीचा किल्ला? मुलांची दिवाळी यादगार कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2022 2:05 PM

Diwali 2022 : फक्त बाजारातून वस्तू आणून दिल्या, झाली दिवाळी असं कशाला करायचं? जरा एकत्र काम करू..

ठळक मुद्देमुलं किती रंगून जातात हा उद्योग करताना, त्यांची दिवाळी नाहीतर यादगार कशी होणार?

आत्ता आईबाबा वयात असणारे सगळेजण त्यांच्या लहानपणी प्रत्येक दिवाळीत मस्त मातीचा किल्ला बनवायचे. हो ना? आठवून बघा बरं… किती मजा यायची तो किल्ला बनवायला. पण आता मात्र आपल्याला असं वाटतं, की कशाला मुलांनी मातीत हात घालायचे? आजारी पडले तर? कपडे मळवतील… त्यापेक्षा सरळ तयार प्लॅस्टिकचा किल्ला आणून देणं सोपं आहे. एकदाच किल्ला आणायचा आणि दिवाळी झाली की नीट उचलून ठेऊन द्यायचा. माती नाही, पसारा नाही, कटकट नाही…पण खरं सांगा बरं, मातीचा किल्ला करण्यातली मजा प्लॅस्टिकच्या किल्ल्याला आहे का? आता बहुतेक घरातून जागेची अडचण असते. घर लहान असतं, त्यात मातीचा पसारा नको वाटतं हे तर खरंच आहे. पण वर्षातून तेवढा आठवडाभर मातीचा किल्ला घरात ठेवणं आपण जमवू शकतो का? असा विचार करून बघूया का? गॅलरीत? हॉलच्या कोपऱ्यात? दाराच्या बाहेर? सोसायटीच्या पार्किंगमध्ये? बिल्डिंगच्या गच्चीत? कुठेतरी तर एक फूट बाय एक फूट एवढी जागा आपण मुलांना देऊ शकतो ना? त्यातही खाली वाळवणासाठी आणलेलं प्लॅस्टिक घालायचं आणि त्यावर एखादी जुनी चादर किंवा साडी किंवा ओढणी घालायची. म्हणजे मग मातीचा पसारा थोडक्या जागेत राहतो.

(Image : Google)

आणि मग आईबाबा जेव्हा मुलांबरोबर मातीत हात घालून किल्ला बनवायला घेतात तेव्हा मुलांना जी काय मजा येते ती त्यांच्या चेहेऱ्यावर बघणं हा एकूण पालक असण्यातला एक फार फार छान अनुभव असतो. छोटासा किल्ला, त्याला बुरुज, तटबंदी हे सगळं बनवण्यासाठी मुलं जे काय मटेरियल शोधून आणतात ना, त्यात खरी गंमत असते. किल्ल्याच्या पायथ्याशी एखाद्या पेल्याची विहीर करू द्या. तेवढा पेला किंवा वाटी नंतर घासून घ्यायला लागेल, एवढंच ना? ते काम तर मुलंही आनंदाने करतील. त्या किल्ल्यावर हळीव पेरून ते दोन दिवसात उगवलेले बघण्यात मुलांना किती मजा येते.पण एक गोष्ट करायची. तो किल्ला पारंपरिक असावा असा आग्रह धरायचा नाही. त्या किल्ल्यावर महाराजांचे मावळे आणि सुपरहिरोज एकत्र पहारा देतील याची मनाची तयारी ठेवायची. प्लॅस्टिकच्या घोड्याशेजारी एखादा पंखवाला युनिकॉर्न गोठ्यात उभा राहील आणि काड्यापेटीच्या बैलगाडीशेजारी एखादी रेसर कार गॅरेजमध्ये पार्क होईल. होऊ द्या!मुलं किती रंगून जातात हा उद्योग करताना, त्यांची दिवाळी नाहीतर यादगार कशी होणार?

टॅग्स :दिवाळी 2022लहान मुलं