श्रुती पानसे
दिवाळीची सुटी लागली की वेळी खूप गोष्टी कराव्याशा वाटतात पण नक्की काय करायचं हे समजत नाही.
आणि मग सुटी संपली की आपली सुटी वाया गेली असं वाटू शकतं. आपल्याला जे करायला हवं ते नीट ठरवणं म्हणजे नियोजन. म्हणजेच प्लॅनिंग करणं. कोणत्याही गोष्टीचं नियोजन कसं करायचं हे माहीत करून घ्यायचं. एकदा हे समजलं की, ही नियोजन क्षमता कुठेही वापरता येते. अगदी सुटीचं प्लॅनिंगही उत्तम होतं.
समजा आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. अशावेळी घरातल्या सर्व माणसांना कामाला लागावं लागतं. स्वयंपाक, त्यासाठी लागणारी जास्तीची तयारी, घराची स्वच्छता, बैठकव्यवस्था, पाहुण्यांशी गप्पा कोणी मारायच्या, त्यांच्याबरोबर जेवायला कोणी बसायचं , कोणी नंतर बसायचं .. अशा सगळ्या गोष्टी घरात आधी ठरवल्या जातात. जर असं झालं तर घरी पाहुणे आल्यावर गोंधळ उडत नाही. आणि असं नियोजन केलं नाही तर पाहुणे येताच घरातल्या सगळ्यांची धावपळ होते. पण या धावपळीतून आपल्याला आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही आनंद मिळत नाही. शाळेतही वर्धापनदिनाला, स्वातंत्र्यदिनाला, प्रजासत्ताक दिनी पाहुणे येतात. तेव्हा पाहुण्यांना बोलावण्यापासूनच कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली असते. प्रत्यक्ष कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत कोणी करायचं . त्यांचा परिचय कोणी करून द्यायचा, त्यांचा सत्कार कोणी करायचा, हे सर्व आधीच ठरलेलं असतं. सर्व गोष्टींचं नियोजन असतं म्हणून कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडतो.
(Image : google)
सुटीचं नियोजन कसं करणार?
१. मुलांची सुटी आनंदात आणि मजेत घालवण्यासाठी सुट्टीचं नियोजन करायला हवं. यासाठी सुट्टीत नक्की काय काय करायचं आहे यांची एक यादी करा.
२. त्यातल्या काही गोष्टी रोज करायच्या असतील, काही गोष्टी तीन चार दिवसांनी आणि काही गोष्टी एकदाच करायच्या असतील. तर तसे करा. मुख्य म्हणजे आपल्याला काय नेमकं करायचं आहे हे ठरवा.
३. आत्ता सुट्टीत जर याची सवय लागली तर एरवी सुद्धा याचा चांगला उपयोग होईल. दैनंदिन व्यवहारातही छोटी कामं, आपल्या जबाबदाऱ्या, वेळेचं पालन करणं आवश्यक असतं . आपलं दैनंदिन वेळापत्रक, परीक्षेचं वेळापत्रक यासाठी ही नियोजन करण्याची सवय उपयोगी ठरते .
४. आपण अनेकदा अनेक गोष्टींचं नियोजन करत असतो. एखाद्या दिवशी शाळेत लवकर पोहचायचं असेल तर थोडा विचार करुन, कामाचं ठरवून एरवीच्या दिवसांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम उरकतो. त्यातच जर चूक झाली, तर त्याचे दुष्परिणाम होतात. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की, नियोजन करणं एक कौशल्य आहे, ज्याचा आत्ता आणि पुढच्या आयुष्यात फायदाच फायदा आहे.