दिवाळीच्या सुट्टीत आपल्याला नक्की सुट्टी आहे का नाही हे ठरवणं आईबाबांसाठी जरा अवघडच असतं. कारण आईबाबांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा मुलांच्या शाळांनाही सुट्टी असते. आणि मग मुलं दिवसभर आपल्यामागे भुणभूण करत फिरतात. बरं त्यांचं म्हणणं सुद्धा तसं बघितलं तर पूर्ण वेळ एकच असतं, “आता मी काय करू???”
‘आता मी काय करू?’ या खतरनाक प्रश्नाची जितकी भीती आईबाबांना वाटते, तेवढी तर बॉसने अचानक केबिनमध्ये बोलावल्यावरसुद्धा वाटत नाही. किंवा घरभर पसारा असतांना अचानक (नवऱ्याच्या किंवा बायकोच्या) सासरचीमाणसं आल्यावरसुद्धा वाटत नाही. हा प्रश्न विचारणारी मुलं अक्षरशः अल्लाउद्दीनच्या दिव्यातून बाहेर आलेल्या राक्षसासारखी वाटतात.
(Image : Google)
खरं म्हणजे त्या राक्षसापेक्षाही डेंजर वाटतात. कारण त्या राक्षसाला निदान काम सांगता येतं. पण या सुट्टी लागलेल्या लेकरांना काम सांगितलं तर एकतर ते वाकडं तोंड करतात. पण ते परवडलं. कारण काही वेळा ते अत्यंत उत्साहाने कामात ‘मदत’ करायला येतात. पण त्यांची मदत अशी असते की ‘मदत नको पण पसारा आवर’ अशी परिस्थिती येते. मग अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपल्यालाही सुट्टी असेल आणि मुलांनाही सुट्टी असेल तर करायचं काय?
मुलांना स्क्रीन हवा असतो आणि आपल्याला द्यायचा नसतो.
मुलांना सारखं बाहेर जायचं असतं आणि आपल्याला ते शक्य नसतं.
मुलांना सारखं काहीतरी ‘यम्मी’ खायला हवं असतं आणि आपल्याला पौष्टिक दिसत असतं.
आणि त्याचवेळी आपल्याला असं वाटत असतं, की वर्षातले थोडेसेच दिवस आपल्याला मुलांबरोबर अशी छान सुट्टी मिळते. तर त्या सुट्टीत आपण मुलांबरोबर काहीतरी छान करूया. असं काहीतरी, जे आपल्याला सहज करता येईल आणि मुलांनाही त्याची मजा वाटेल. अशाच काही भन्नाट आयडिया तुमच्याशी इथे शेअर करणार आहोत.
त्यापैकी पहिली आयडिया म्हणजे रांगोळी! बहुतेक घरातून रोज सकाळी आणि दिवाळीत संध्याकाळी रांगोळी काढली जाते. पण रांगोळी हा प्रकार मुलांना खेळायला देण्यासाठी सहसा लक्षात येत नाही. जरा मोठी मुलं असतील तर त्यांना रोज मोठी रांगोळी काढायला सांगा. आणि जरा लहान मुलं असतील तर पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी चक्क खेळायला द्या. मुलांना त्याची फार मजा येते. खडूने आकार काढून देऊन त्यावर रांगोळीने गिरवायला सांगितलं तर साधारण तिसरी-चौथीपर्यंतच्या मुलांना फार मजा येते. आणि रोज तीच रांगोळी परत डब्यात भरून ठेवली तर दुसऱ्या दिवशी तीच रांगोळी वापरता येते. एखादा किलो रांगोळीत दोन तीन मुलांना किमान तासभर गुंतवून ठेवायची ताकद असते. एकदा नक्की करून बघा.
क्रमश: