हवाबदल झाला की घरोघरी सर्दी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढायला लागते. लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेच शिंकायला आणि खोकायला लागतात. उन्हाचा तडाखा आहे तेवढाच आहे मात्र अचानक वारे सुटल्याने हवेत झालेला बदल आरोग्यावर परिणाम करतो आहे. हवाबदल झाला की तब्येत बिघडजलेली चांगली असते असं जरी म्हटलं जात असलं तरी सर्दी आणि ताप जास्त असेल तर मात्र आपल्याला टेन्शन येते. सर्दी-ताप ही सामान्य लक्षणे असली तरी त्यामुळे गळून गेल्यासारखे झाले असेल तर आपण ते तितके सहज घेत नाही.
ताप म्हणजे शरीरातील व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शनला शरीरानेच केलेला प्रतिसाद असतो. जंतूं शरीरात गेल्यावर, ताप येणं म्हणजे आपल्या शरीराची एक ‘सुरक्षा यंत्रणा’ (डिफेन्स मेकॅनिझम) कार्यान्वित होणे. सर्वसामान्यपणे आपल्या शरीराचं तापमान ९८.६ फॅरेनहाइट असतं. बऱ्याच जंतूंना हे तापमान त्यांच्या वाढीच्या दृष्टीनं अत्यंत पोषक असतं. त्यामुळे शरीराचं तापमान वाढवून त्यांना नष्ट करण्यासाठी आपल्या मेंदूद्वारेही काही प्रयत्न कले जातात. मात्र सर्दी ताप झाल्यावर लगेचच डॉक्टरांकडे पळायला हवे असेही नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी यावर इलाज झाला तर विनाकारण औषधे घेऊन आपली प्रतिकारशक्ती कमी का करुन घ्यायची? पाहूयात डॉक्टरांकडे जाण्याआधी सर्दी-तापावर घरच्या घरी कोणते उपाय करता येतात याविषयी सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे..
१. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही हे लक्षात घ्या. अशावेळी बाळाला आपण नेहमी देत असलेले पॅरासिटमॉल देऊन बघा. हे किती प्रमाणात द्यायचे याविषयी त्या औषधावर लिहीलेले असते किंवा त्याबाबत डॉक्टरांना विचारा.
२. ताप असेल तर तो मोजण्यासाठी थर्मामीटरचा अवश्य वापर करा. म्हणजे आपल्याला किती ताप आहे याचा अंदाज येईल. हे तापमापक काखेत, तोंडात किंवा गुदद्वारात ठेवून ताप मोजता येतो. काचेच्या तापमापकात पारा असतो, तापमान फॅरेनहिट किंवा सेंटिग्रेडमध्ये मोजतात. डिजिटल अथवा इलेक्ट्रॉनिक तापमापक वापरायला सोपे व जास्त सुरक्षित असते.
३. ताप कमी होण्यासाठी आपण मोठ्यांच्या डोक्यावर ज्याप्रमाणे गार पाण्याच्या पट्ट्या ठेवतो त्याचप्रमाणे लहान मुलांना स्पिंजिंग करुन घ्यायला हवे. मात्र यासाठी थंड पाणी न वापरता कोमट पाणी वापरावं. एका भांड्यात कोमट पाणी आणि दोन छोटे स्वच्छ, कोरडे नॅपकिन घ्यावेत. बाळाचे सर्व कपडे काढून कोमट पाण्यात एक नॅपकिन बुडवून घ्यावा. तो पिळून त्यातील पाणी काढून टाकावं आणि त्या ओल्या नॅपकिननं बाळाचे संपूर्ण अंग पुसून घ्यावे. नंतर दुसऱ्या कोरड्या नॅपकिननं पुसावे. परत पहिला नॅपकिन कोमट पाण्यात बुडवून, पिळून बाळाचं संपूर्ण अंग पुसावं आणि पुन्हा कोरड्या नॅपकिनने पुसून घ्यावं. ही क्रिया कमीत कमी आठ ते दहा वेळा झटपट करणं, म्हणजे एका वेळेचं स्पंजिंग!
४. तापामुळे आणि घामामुळे बालकांच्या शरीरातलं पाणी कमी होत असतं. त्यामुळे ताप असताना मुलांना थोडं थोडं पाणी जास्त वेळा प्यायला द्यावं. त्यामुळे त्यांच्या शरीरात ताकद राहण्यास मदत होते. ताप किंवा सर्दी झाल्यावर मुलांना हलका आहार द्यावा. मूग डाळ कढण, भाताची पेज, मऊ खिचडी, भाज्यांचा सूप त्याला आलं-लसूण आणि हिंगाची फोडणी देऊन प्यायला द्यावे.
५. सर्दी असल्यास गरम पाण्याची वाफ देणे, गरम पाणी प्यायला देणे अशा उपायांनी सर्दी कमी होऊ शकते. तसेच घरात असलेले कफ सिरप योग्य त्या प्रमाणात द्यावे जेणेकरुन कफ असल्यास तो पातळ व्हायला मदत होते. हे सगळे उपाय करुनही ताप कमी होत नसेल किंवा मूल अजिबातच खात पित नसेल आणि खूप मलूल झाले असेल तर डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो.