Join us  

पेपर लिहायला वेळच पुरत नाही अशी तक्रार मुलं करतात? ५ उपाय, पेपर अचूक आणि वेळेत होईल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 8:00 AM

पेपर सोपा होता पण वेळ पुरला नाही ही तक्रार खोटी नसतेच कारण..

ठळक मुद्देनक्की कोणत्या कारणांमुळे वेळ पुरत नाही? की या कारणांशिवाय इतरही काही कारणं आहेत? हे स्वत: शोधावं लागेल.

- डॉ. श्रुती पानसे

परीक्षेच्या दिवसात पेपर देऊन घरी आलेल्या मुलांची तक्रार एकच असते, पेपर सोपा होता पण मला वेळ कमी पडला. अनेक विषयांना वेळ पुरत नाही. त्यांची काय कारणं असू शकतील हे आधी समजावून घेऊ. म्हणजे त्यावरचे उपाय शोधणं सोपं जाईल. असं का होतं? वेळ का पुरत नाही? सराव कमी असतो की लिहिण्याचा वेग कमी पडतो?

वेळ का पुरत नाही?१. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषा विषयात कल्पना वर्णन, प्रश्नांची मोठी उत्तरं, स्वमत उत्तरं असे काही प्रश्न असतात. त्यासाठी विचार करायला वेळ जातो. भाषा विषयात लेखन जास्त असतं त्यामुळेही वेळ जास्त लागतो.२. गणित या विषयात नक्की कोणतं सूत्र वापरायचं, एकदा सोडवलेलं गणित चुकीचं आहे असं वाटलं तर पुन्हा सोडवण्यात वेळ जातो.३. इतर विषयांमध्ये अनेकदा प्रश्नाचं नक्की उत्तर काय हे आठवत नाही, ते आठवण्यात खूप वेळ जातो.४. एकूणच ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आठवत नाहीत त्यासाठी एकतर वेळ जातो किंवा मग आपण नेमकी उत्तरं न लिहिता जास्तीचं लिहून ठेवतो, खूप जास्त लिहितो आणि त्यात कदाचित अनावश्यक लेखनाचाही भाग जास्त असतो का हे शोधायला हवं.५. नक्की कोणत्या कारणांमुळे वेळ पुरत नाही? की या कारणांशिवाय इतरही काही कारणं आहेत? हे स्वत: शोधावं लागेल.

(Image :google)

उपाय काय?

१. उत्तरपत्रिका सोडवताना जे प्रश्न आधी येतात, त्यांची उत्तरं सुरुवातीला सोडवून घ्यावी. म्हणजे ती उत्तरं चांगल्या पद्धतीने लिहून बाजूला ठेवता येतील.ज्या प्रश्नांची उत्तरं आठवून लिहावी लागणार आहेत, त्यासाठी जरा वेळ मिळेल.२. ज्या उत्तरांच्या बाबतीत गोंधळ आहे, त्याचाही विचार करावा लागेल. गणितं चुकीची सोडवून पुन्हा लिहिण्यापेक्षा आधीच पूर्ण विचार करून मग गणित सोडवावं.३. सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर आपल्याला वेळेत सोडवता येतो आहे का ही पाहावं लागेल. त्यासाठी मागच्या वर्षीतला एखादा पेपर घरात घडयाळ लावून सोडवून बघावा. त्यावेळात दुसरं काही करू नये, म्हणजे आपला वेळ नक्की कशात जातो हे समजेल.

(Image : google)

४. शेवटच्या क्षणापर्यंत पेपर कधीच लिहू नये. शेवटची दहा ते पंधरा मिनिटं बाकी असताना पेपर लिहून व्हायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा पेपर नीट वाचायला मिळतो.५. आवश्यक आहे तिथे शब्दांच्या/ मुद्यांच्या खाली रेघा मारणं, आकृत्यामधील सगळी नावं व्यवस्थित लिहिली आहेत का हे बघणं अशा गोष्टी करण्यासाठी वेळ ठेवावा लागतो.६. जेव्हा घरात सराव म्हणून पेपर सोडवला जातो तेव्हाही दहा पंधरा मिनिटं पेपर आधी पूर्ण करा. पूर्ण पेपर वाचायला वेळ मिळतो आहे. घरी केलेल्या या सरावाचा नक्की उपयोग होतो.

(संचालक, अक्रोड)shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :परीक्षाशिक्षणलहान मुलंपालकत्व