Join us  

लहान मुलं तासंतास बसून राहतात का? मुलं लहानपणीच लठ्ठ होतात, मठ्ठही झाली तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 2:28 PM

तासंतास बसून काम करण्याची मोठ्यांची बैठी जीवनशैली मुलांवरही लादली जाते आहे, त्याचा परिणाम म्हणजे लहान मुलं लठ्ठ व्हायला लागतात.

ठळक मुद्दे सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम, हालचालीमुळे शरीरात फॅट्स साचून राहणार नाहीत.

डॉ. श्रुती पानसे

संपूर्ण आयुष्याची पायाभरणी ही लहान वयात होत असते. जन्मापासून मुलांची जीवनशैली कशी आहे यावर त्यांचं आरोग्य कसं असेल हे ठरतं. ज्या वयात भरपूर खेळायचं, घामाघूम होईस्तवर धावाधाव करायची, चढ उतार करायची, नाचायचं, खिदळायचं, पळापळी, सुई दोरा, लंगडी, खो खो सारखे दम लागणारे आणि कस बघणारे खेळ खेळायचे त्याच वयात आपली मुलं नक्की काय करताहेत?आजकाल खेळ खेळणं म्हणजे पालकांना वेळ वाया घालवणं असं वाटतं. खेळून तुला पुढे काय मिळणार आहे, त्यापेक्षा अभ्यास कर, असं म्हणून मुलांना खेळापासून परावृत्त केलं जातं.त्यामुळे आपली मुलं धावाधाव करत नाहीत. बसून राहतात. शाळेत, एका बाकावर कमीत कमी पाच – सहा तास बसून राहतात. जाता येता बस – व्हॅन – रिक्षा असते. हे कमी पडतं म्हणून सर्व वयातल्या शालेय मुलांना कमीत कमी दोन तास गृहपाठ असतो. याशिवाय मुलं क्लासेसला जात असतील तर तिथेही बसतात. एकुणात बहुतांश मुलं इतका वेळ फक्त बसतात. प्रौढ लोक जसे ऑफिसमध्ये जाऊन आठ दहा किंवा त्यापेक्षा जास्त तास बसून काम करतात, त्याच पद्धतीने छोटी छोटी मुलं ही बसून अभ्यास करतात. त्यांची ही आता बैठी जीवनशैली झाली आहे.तेच मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. 

https://www.lokmat.com/sakhi/parenting/child-obesity-and-stress-why-kids-become-obese-how-to-deal-with-it-a298/

(Image : Google)

का वाढतो मुलांमध्ये लठ्ठपणा?

आपल्या मेंदूमध्ये कॉर्पस कलोझम या नावाचा एक अवयव असतो. हा अवयव जास्तीत जास्त सक्षम व्हावा, ही शरीराची गरज असते. भरपूर हालचाली कारणं हेच त्या अवयवाचं टॉनिक. तासनतास आपली मुलं जर बसून राहणार असतील तर त्यांचा हा अवयव सक्षम कसा होणार? विशेषत: आठ – दहा वर्षापर्यंतच्या आसपासच्या मुलांनी तर विविध पद्धतीने भरपूर हालचाली करायला हव्यात.इतका वेळ बसूनही घरी आल्यावर मुलं पुन्हा टीव्हीसमोर किंवा हातात मोबाईल घेऊन बसतात. त्यांचं हे असं बसणं, यामुळे मुलं दिवसेंदिवस लठ्ठ होत जातात. त्यांच्या आरोग्याच्या एकेक समस्या निर्माण होत जातात.

(Image : Google)

उपाय काय?

१. टीव्ही कमी कारणं – शक्यतो बंदच करणं हे खूपच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेणं किंवा त्याचं एक टाईम टेबल ठरवणं हे करायलाच लागेल. २. त्यांनी रोज खेळायला जावं अशी व्यवस्था कारणं खूप आवश्यक आहे.३. आजकाल शहरी भागात मैदानं कमी होत चालली आहेत. त्यामुळे मुलं खेळणार कुठे, हा प्रश्नच असतो. ग्रामीण भागात मैदानं आहेत, मोकळ्या जागा आहेत, पण म्हणून मुलं खूप खेळत आहेत, असं चित्र तिथंही कमी दिसतं आहे. याचं कारण अभ्यासाच्या वाढलेल्या वेळा आणि टीव्ही, मोबाईलची सवय. ही दोन्हीही कारणं गंभीर आहेत.  अभ्यास जितका महत्वाचा आहे, त्यापेक्षा व्यायाम अत्यावश्यक आहे.४. मैदानात खेळणं – एखाद्या आवडत्या, विशिष्ट खेळावर लक्ष्य केंद्रित करून स्वत:ला कसोटीला लावणं हे मुलांनी करायला हवं. समजा ते काही कारणाने शक्य नसेल तर अशा परिस्थितीत किमान टेबल टेनिस, टेनिस, जिम्नॅस्टिक, दोरीवरच्या उड्या, वेगवान नाच, एरोबीक्स्, योगासनं, सूर्य नमस्कार – अशा गोष्टी घरात, सोसायटी हॉलमध्ये, गच्चीवर नियमित करायला हवेत. अशा प्रकारच्या व्यायाम, खेळ, हालचालीमुळे मेंदूत सेरोटोनिन नावाचं रसायन निर्माण होतं. हे शरीरात आनंद निर्माण करतं. आमचं मूल खेळत नाही, असं म्हणण्यापेक्षा त्याला लहानपणापासून फिरायला नेणं, टेकड्या चढण्यातली गंमत वाटणं त्याचीच सवय लागणं हे जास्त छान आहे.५. सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम, हालचालीमुळे शरीरात फॅट्स साचून राहणार नाहीत. शरीर तंदुरुस्त राहील आणि मनही. मूल लठ्ठ झाल्यावर हे सर्व करणं आवश्यक आहेच, पण आरोग्य चांगलं राहावं म्हणून लहानपणापासून अवश्य करावं.

लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी)

 

टॅग्स :पालकत्व