Join us  

काहीही स्वयंपाक करा मुलं खायला नाक मुरडतात, जेवतच नाहीत? मुलांनी व्यवस्थित जेवण्यासाठी ८ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 12:42 PM

मूल काही केल्या नीट खात नसेल आणि त्याची योग्य ती वाढ होत नसेल तर पालकांना टेन्शन यायला लागतं....अशावेळी काय करावं याविषयी....

ठळक मुद्देमुलं काही केलं तरी खातच नसतील तर पालकांनी करायला हव्यात अशा गोष्टीमुलांची योग्य वाढ व्हायची असेल तर पुरेसे लक्ष द्यायलाच हवे

ऋता भिडे 

“ अरे, ये बघ मी किती मस्त खाऊ केलाय.” “ काय करू खायला?” “ आज छान पराठा आहे”. अशी वाक्य पालकांची जवळपास रोजच बोलली जातात. 

काही मुलं खूप कमी खातात  किंवा खाण्याच्या बाबतीत निवडक असतात. म्हणजे विशिष्ट पदार्थच हवा, तो ठराविक पद्दतींनीच ताटात असायला हवा, घरातल्या ठराविक व्यक्तींनीच भरवायला हवं, चावून खायला खूप वेळ लावणं, तोंडात एकाच बाजूला घास ठेवणं अशी एक नाही अनेक कारणं मुलांची खाण्याच्या बाबतीत पालकांकडून ऐकायला मिळतात. 

आता, लहान मुलांना सहा महिन्यापासून आपण जेव्हा दूध सोडून काही देतो त्या वेळेस नवीन पदार्थाची चव विकसित करण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो. मुलं जसजशी मोठी होतात तसं त्यांची नवीन पदार्थ चाखून पाहण्याची सवय विकसित होते. मुलांची  sensory development जशी होईल त्या बरोबर मुलं नवीन पदार्थ स्वीकारत जातील. 

पालकांनी लक्षात ठेवावेत असे मुद्दे

१. एकाच चवीचे पदार्थ न देता वेगवेगळ्या चवीचे पदार्थ द्यावेत. 

मुलांना वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला दिलेत तर मुलांची चव विकसित व्हायला मदत होईल. हे पदार्थ बनवत असताना तुम्ही मुलांचा सहभाग घेऊ शकता. त्यांच्या समोर पदार्थ बनवा, त्यांना काही जिन्नस घालायला द्या म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि तो पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होईल. 

२. एका जागी बसून जेवायची सवय लावावी. 

मुलाला जेवण भरवतना आईने त्याच्यामागे ताट घेऊन फिरलं तर जेवण हा मुलांसाठी एक पकडापकडीचा खेळ होईल. ह्यामध्ये जेवणाचं महत्व निघून जाईल. त्यामुळे असं करणं टाळा. 

३. वाढत्या वयानुसार जेवणाच्या पद्धतीत बदल करावा.

सुरुवातीला मुलांना mixer मधून पदार्थ दिल्यानंतर योग्य वयात ते पदार्थ हाताने mash करून द्या. नंतर तुकडा मुलांच्या ताटात ठेवून मुलाला त्याच्या हाताने खाण्याची सवय लावा. ह्या गोष्टी योग्य वयात करणं खूप गरजेचं असतं. स्वतःच्या हाताने खाण्याची सवय मुलांना उशिरात उशीर तीन वर्षांपर्यंत लागली तर शाळेमध्ये त्यांना अडचण येणार नाही. 

४. मुलांची शारीरिक हालचाल योग्य आणि वयानुसार होऊ द्यावी. 

शारीरिक हालचाल आणि भूक लागणं ह्यांचा एकत्रित संबंध असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मुलांच्या वयानुसार त्यांनी जर मैदानी खेळ खेळले किंवा तशीच शारीरिक हालचाल केली तर त्यांना चांगली भूक लागेल आणि मग मुलं कुरकुर न करता खातील. 

५. एकत्र बसून जेवावे.

एकत्र बसून जेवण्याचे अनेक फायदे आहेत. मुलांबरोबर गप्पा मारत जेवणाचा आनंद कसा घायचा हे तुम्ही त्यांना नकळत शिकवता. बाळं सोडून जी थोडी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक न करता तुम्ही जे जेवत आहेत तेच त्यांना द्या. म्हणजे भाजीला लावून पोळी कशी खायची, किंवा भात कसा कालवून खायचा ह्या गोष्टी मुलांना समजतील. एकत्र जेवत असताना तुम्ही एकमेकांचा दिवस कसा गेला ह्याबद्दल, किंवा तुमच्या  मुलांच्या दृष्टींनी योग्य वाटेल त्या विषयावर बोलू शकता. ह्यामध्ये टीव्ही आणि कोणत्याही गॅजेटचा वापर टाळा. 

(Image : Google)

६. मुलांना भूक लागलेली समजू द्यावी.

खूपदा पालक वेळ झाली आहे म्हणून मुलांना खायला देतात. अशावेळेस मुलं तो पदार्थ खात नाहीत. त्यांना भूक लागलेली नसते. मुलांना खायला देताना दोन खाण्यामध्ये योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. तसंच  दूध पिऊन झाल्यावरती काही मुलं लगेच खात नाहीत तर त्यावेळेस तुमच्या मुलाची भूकेची गरज समजून घ्यावी. मुलांना भूक लागलेली समजली कि ती तुमच्याकडे स्वतःहून खाण्याची इच्छा व्यक्त करतील. तुमच्या मुलाचं खाण्याचं रुटीन ठरलेलं नसेल तर ते सुरळीत होईपर्यंत मुलं तुम्ही नेमून दिलेल्या वेळेला न खाता त्यांना भूक लागली कि खातील. पण हळू हळू पालकांना मुलांच्या खाण्याच्या वेळा समजल्या कि त्यांच्या रुटीनप्रमाणे त्यात बदल करता येणं सोईचं होईल. 

७. द्रव पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात ठेवावा. 

पाण्याबरोबरच  इतर द्रव्य पदार्थांचा मुलांना योग्य वयात परिचय करून दिला तर मुलं ते पदार्थ सुद्धा आवडीने पितील. लिंबू सरबत, ताक, कढी ,आमटी असे पदार्थ जेवताना त्यांच्या ताटात ठेऊ शकता. दुधाचे सेवन मुलांनी वयानुसार घेणं जरुरीचं आहे. ते जास्ती झालं तर मुलं कमी जेवतात. 

 ८.  तरीही मूल जेवत नसेल तर 

सगळं करुनही मूल जेवत नसेल तर त्याची कारणं शोधून काढा. प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचबरोबर मुलांनी जेवायला हवं म्हणून त्यांना फोन वर अथवा टीव्हीवर गाणी , गोष्टी दाखवत खाऊ घालण्याची सवय आधीपासूनच लावू नका. अशी सवय लागली असेल तर प्रयत्नपूर्वक ती बंद करा. त्याऐवजी तुम्ही गोष्टी सांगा, गाणी म्हणा, पुस्तकं  वाचा. त्यामुळे तुमचा मुलांशी संवाद होईल. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं