लहान बाळ वरचे खायला सुरुवात झाली की आपण त्याला भाताची पेज, मूगाची खिचडी, मऊ भात, भाज्या घातलेला भात असे भाताचे वेगवेगळे प्रकार द्यायला सुरू करतो. गरमागरम तूप घालून दिलेला भात लहान मुले आवडीने खातातही. पण नुसता भात खाऊन मुलांना म्हणावे तसे पोषण मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या आहारात इतरही धान्यांचा समावेश असायला हवा असे एका अभ्यासातून नुकतेच समोर आले आहे. आता इतर धान्ये म्हणजे कोणती तर आपण नियमितपणे ज्यांचा तुलनेने कमी प्रमाणात वापर करतो अशी धान्ये आहारात आवर्जून वापरायला हवीत. त्यामुळे मुलांचे लहानवयापासूनच चांगले पोषण होण्यास मदत होते असं एका अभ्यासातून नुकतेच समोर आले आहे.
उंच होण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि दणकट तब्येतीसाठी आपल्या आहारात गहू आणि तांदूळ यांच्याबरोबर ज्वारी, बाजरी, राळं, नाचणी यांसारख्या धान्यांचा समावेश आवर्जून असायला हवा अशी नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे. हैद्राबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये संशोधक आणि आहारतज्ज्ञ डॉ. एस.अनिथा यांनी हा अभ्यास केला आहे. भारतात याआधी याच विषयावर करण्यात आलेल्या ८ अभ्यासांचा सदर्भ त्यांनी यामध्ये घेतला आहे. हा अभ्यास करताना लहान बाळांबरोबरच, ३ ते ६ वयोगटातील मुले आणि शाळेत जाणारी मुले अशा सगळ्यांचा अभ्यास करण्यात आला होता. ज्या मुलांच्या आहारात भाताबरोबरच इतर पोषक आणि प्रथिने असलेल्या धान्यांचा समावेश होता त्यांच्या आरोग्याचा अभ्यास यामध्ये करण्यात आला होता.
जी मुले ज्वारी, बाजरी, नाचणी, राळं यांसारखी धान्ये खात होती त्यांची उंची इतर भात खाणाऱ्या मुलांपेक्षा २८ टक्क्यांनी वाढली होती तर वजन २६ टक्क्यांनी वाढलेले होते. तसेच आहारात या धान्यांचा समावेश असलेल्या मुलांना इतर मुलांपेक्षा भविष्यात टाइप २ डायबिटीस, कोलेस्टेरॉलची पातळी कमी असणे, लठ्ठपणा, अॅनिमिया यांसारख्या तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे अभ्यासात नोंदवण्यात आले होते. भाताशिवायच्या इतर धान्यांमध्ये मुलांची वाढ होण्याच्यादृष्टीने प्रथिने, सल्फर - अमिनो अॅसिड, कॅल्शियम यांसारखे अतिशय उत्तम घटक असतात असं अनिथा यांनी आपल्या अभ्यासात नोंदवले आहे. नाचणीमध्ये तर आरोग्यासाठी उत्तम असे असंख्य घटक असल्याने नाचणीचा लहान मुलांच्या आहारात आवर्जून समावेश असायला हवा असे त्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.