डॉ. श्रुती पानसे
अभ्यासाला बसलं की अभ्यास किती वेळ करायचा हा एक प्रश्न असतो. सलग दोन तीन तास अभ्यास केलेला चांगला की मधून मधून ब्रेक घेतलेला चांगला? ब्रेक घ्यायचा तर त्या वेळात करायचं काय, असे प्रश्न अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला पडतात.
याचं साधं सोपं असं उत्तर असं आहे की ते आपण ठरवायचं. आपल्याला एखादा विषय करत राहावासा वाटला तर जास्त वेळ करायला हरकत नाही. पण ते तरी योग्य असतं का? अभ्यासात मन लागलं तरी अधून मधून उठत राहणं हे शरीरासाठी चांगलं असतं. याचा अर्थ आई बाबाचा डोळा चुकवून सारखं सारखं उठायचं, टी व्ही बघायचा, मोबाईलवर खूप वेळ रेंगाळत राहायचं, असं मात्र नाही.
मग काय करायचं, या छोट्या ब्रेक मध्ये?
1.अभ्यास आणि त्यानंतर थोडा वेळ घरात, गच्चीवर, अंगणात, फिरणं, सायकलवरून एक छोटी चक्कर मारून येणं, छोटासा व्यायाम करणं असं केलं तर आपला पुढचा अभ्यास जास्त छान होईल.
2. या ब्रेकमध्ये मोबाईल बघण्यापेक्षा किंवा टीव्ही बघण्यापेक्षा कोणाशी तरी गप्पा मारुया, जागच्याजागी उड्या मारणं, कुंड्यांना पाणी घालणं, उद्याचं दप्तर भरणं, चित्र काढणं, असं काही केलं तर आपला अभ्यासाचा ताण अधून-मधून हलका होईल.
3. समजा आपण अगदी दिवसभर अभ्यास केला तरी सलग अजून जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा जर आपण एखादा मैदानी खेळ खेळत असू किंवा नृत्याच्या क्लासला जात असू तर त्याला सुट्टी कधीच घेऊ नये . कारण यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजन मिळतो.
4.अभ्यासाला आपण बसतो. त्यामुळे अभ्यासातल्या ब्रेकमध्ये बसायचं नाही. शरीराची हालचाल करायची. शरीराचं रक्ताभिसरण वाढल्यामुळे शरीर आणि मेंदू तरतरीत होतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास होतो .
5. थोडा अभ्यास लेखी आणि थोडा अभ्यास तोंडी असं जर असं वर्गीकरण केलं तर आपल्याला अभ्यास सोयीचा आणि सोपा होईल. नेहमीच्या त्याच त्या पद्धतीत थोडा बदल करणं हे मेंदूसाठी आवश्यक आहे.
6. समजा आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करत असू आणि तो जरा अवघड असेल तर पुढचा विषय थोडा सोपं, आवडता असावा. याने पण ताण हलका होतो.
7. अनेकदा आपल्याला आपले पालक अभ्यासासाठी ढकलत असतात. त्यांनी रागावलं, ते वैतागले की मग आपण अभ्यासाला बसतो. त्यामुले आधीच आपला मूड गेलेला असतो. त्यातून अभ्यास मग नकोसंच वाटतो. त्यापेक्षा स्वत: च अभ्यासाला बसावं. कोणीही सांगायची वाट बघू नये. म्हणजे आपला मूड छान राहील. आणि अभ्यासही छान होईल.
अशा काही गोष्टी नक्कीच कराव्यात. जे आपल्याला टाळता येणार नाही ते आधीच करावं. अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा येण्याआधीच चांगल्या पद्धतीने, आपल्याला फ्रेश करणारे ब्रेक घ्यावेत.
(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.)
संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830
अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी))