सायली कुलकर्णी
आज-काल मुलांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांनी सहजच नाराज होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, आत्महत्येचे प्रयत्न करणं अशा समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामागील कारणांचा उहापोह करता आजूबाजूला चालू असलेली रॅट रेस, इतरांशी सततची स्पर्धा, पालकांच्या आणि स्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा, परफेक्ट असण्याचा अट्टाहास अशी अनेक कारणे सांगता येतील. पण या सगळ्या बरोबरीने एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांची असलेली मानसिकता अर्थातच माईंडसेट. एकंदरीतच स्मार्ट असण्यापेक्षा (बीइंग स्मार्ट) स्मार्ट दिसण्याला (लुकिंग स्मार्ट) असलेलं अवास्तव महत्त्व बरेचदा एका ठराविक पॉलिश्ड साच्यात विचार करायला भाग पाडते. आणि यामुळेच अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये मानसशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या डॉ. कॅरल ड्वेक यांनी हजारो मुलांचा अभ्यास केला. त्यांच्यावर मानवी प्रेरणेच्या बाबत विविध प्रयोग केले. यातूनच त्यांनी मानसिकतेचे दोन ठळक प्रकार सांगितले. त्यातील एक म्हणजे 'निश्चित मानसिकता/ फिक्स माईंड सेट' आणि दुसरी म्हणजे 'वाढीची मानसिकता /ग्रोथ माईंडसेट'.डॉ. कॅरल यांच्या मते फिक्स माईन सेट असलेली मुले नवीन आव्हाने स्वीकारत नाहीत, सहजपणे हार मानतात, नवीन गोष्टी शिकणे टाळतात, फीडबॅक स्वीकारत नाहीत किंवा ते घेणेच टाळतात, अपयशाकडे पूर्णविराम सारे काही संपले' म्हणून बघतात. तर ग्रोथ माईंड सेट असलेली मुले पूर्ण प्रयत्नाने नवनवीन गोष्टी शिकतात, सहजासहजी हार न मानता समस्या सोडविण्याकडे त्यांचा कल असतो, अपयशाकडे स्वल्पविराम म्हणजेच तात्पुरत्ते अपयश म्हणून बघतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. मनमोकळेपणाने इतरांनी दिलेला फीडबॅक स्वीकारतात, आशावादी असतात…आता तुम्ही म्हणाल हे सगळं पालकांना सांगायचं काय प्रयोजन? कारण पालकांना बरेचदा आपलं मूल परफेक्ट असावं असं वाटतं. मग पालकांनी मुलांकडून अपेक्षाच ठेवायचा नाहीत का? मला असं अजिबातच म्हणायचं नाही. मी म्हणेन वास्तव किंवा अवास्तव अपेक्षांच्या पुढे जाऊन मुलांची मानसिकता सकारात्मक होईल अशी अपेक्षा मुलांकडून ठेवायला काहीच हरकत नाही. आपल्या अपेक्षा व्यक्त करत असताना नकळतपणे मुलांकडे चुकीचा मेसेज तर जात नाही ना? याची प्रयत्नपूर्वक काळजी पालकांनी घेणं खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या मुलांचा माईंड सेट फिक्स न राहता तो ग्रोथ माईंडसेट होईल.हे समजून घेण्यासाठी डॉ. कॅरल आणि सहकाऱ्यांनी केलेला एक मानसशास्त्रीय प्रयोग समजून घेऊ. हा प्रयोग फीफ्थ ग्रेडच्या ४०० मुलांवर करण्यात आला.१. प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात या मुलांना सोपी बुद्धिमत्ता चाचणी देण्यात आली. प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या चाचणीचा निकाल सांगताना मुलांचे दोन गट करण्यात आले पहिल्या गटातील मुलांना निकाल सांगताना त्यांची 'क्षमता आणि बुद्धिमत्ता' यांबाबत स्तुती करण्यात आली. तर दुसऱ्या गटातील मुलांची त्यांनी केलेल्या 'प्रयत्नांबाबत आणि कामाच्या पद्धतीची' स्तुती करण्यात आली.२. आता प्रयोगाच्या पुढच्या टप्प्यात या मुलांना दोन पर्याय देण्यात आले. त्यांना चाचणीची निवड करायला सांगितली. यामध्ये पहिला पर्याय अवघड, आव्हान देणारी चाचणी तर दुसरा पर्याय आधीच्या चाचणी सारखीच व सोपी चाचणी निवडायला सांगितली. या टप्प्यावर असे दिसून आले की ज्या मुलांची त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी स्तुती केली होती त्या गटातील ६७ टक्के मुलांनी सोप्या चाचणीची निवड केली तर ज्या गटातील मुलांची त्यांच्या प्रयत्नांसाठी, कामाच्या पद्धती साठी स्तुती करण्यात आली होती त्यांपैकी ९२ टक्के मुलांनी अवघड,आव्हान देणाऱ्या चाचणीची निवड केली.३. याच प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात या सर्व मुलांना सोपी अशी फायनल टेस्ट देण्यात आली. क्षमता व बुद्धिमत्तेबाबत स्तुती करून ज्या मुलांचा फिक्स माईंड सेट तयार करण्यात आला होता त्या मुलांना चाचणीवर -20% गुणांक मिळाले. तर ज्या मुलांचा प्रक्रिया व प्रयत्नांसाठी स्तुतीद्वारे ग्रोथ माईंड सेट तयार करण्यात आला होता त्या मुलांनी त्याच चाचणीवर +30% गुणांक मिळवले.
(Image : google)
काही गोष्टी ..
१. तुमचे मुलांशी होणारे संभाषण त्यांचा माईंडसेट तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.२. चुकीच्या पद्धतीने मुलांना फीडबॅक दिल्यास त्यांचा माईंडसेट न बदलणारा, फिक्स होऊ शकतो. तर योग्य पद्धतीने मुलांना फीडबॅक दिल्यास त्यांचा वाढीचा म्हणजेच ग्रोथ माईंडसेट तयार करणे शक्य आहे.३. ग्रोथ माईंडसेट असणारी मुले प्रयत्न करणारी, आयुष्यातील उतार चढावांचा सामना करू शकणारी, समस्यांना न घाबरता समर्थपणे तोंड देऊ शकणारी, शिकण्यास उत्सुक आणि शैक्षणिक उपलब्धी मिळवणारी असतात.
(Image : google)
ग्रोथ माईंड सेट तयार होण्यामागे पालकांची नेमकी काय भूमिका असावी?
१. मुलांची स्तुती जरूर करा पण ती त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी..२. फायनल रिझल्ट बरोबरीनं मुलांना प्रक्रियेचा (प्रोसेसचा) आनंद घ्यायला शिकवा.३. परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्त्व देऊ नका.४. ग्रोथ माईंडसेट असणाऱ्या मुलांना चांगलेच गुण मिळतील. त्यासाठी त्यांच्या माईंडसेटवर काम करा.५. मुलांच्या चुका सहजपणे स्वीकारा आणि त्यांना त्या स्वीकारण्यासाठी मदत करा.६. मुलांना त्यांच्या चुका नक्की दाखवून द्या पण त्या कुशलतेने. चुकांमुळे अपराधीपणाची भावना जागी होऊ देऊ नका.७. मुलांना त्यांच्या चुकांबद्दल मोकळेपणाने बोलायची संधी द्या. त्यासाठी तुमच्या चुकांबद्दलही मुलांपाशी मोकळेपणाने बोला.८. चुकणं साहजिक आहे पण त्यापासून शिकणं जास्त महत्त्वाचा आहे हे मुलांना समजू द्या.९. समस्यांवर वेगवेगळे पर्याय निवडून ते पडताळून पाहण्यासाठी प्रयत्न करा.१०. 'प्रयत्न केल्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात' हे मुलांना तुमच्या वागण्यातून शिकवा.११. स्मार्ट दिसण्याच्या बरोबरीने ( किंबहुना त्याहीपेक्षा) स्मार्ट असणं महत्त्वाचं आहे हे आवर्जून सांगा.१२. मुलांपुढे आपल्या अपेक्षा व्यक्त करत असताना नकळत त्यांच्या मानसिकतेला घाला तर घातला जात नाहीये ना? याबाबत जागरूक रहा.१३. जसे परफेक्ट पेरेंटिंग नसते तसे परफेक्ट चाइल्ड ही नसते. परफेक्शनचा अट्टाहास सोडा.१४. मुलांना इतरांपेक्षा स्वतःशी स्पर्धा करायला शिकवा.१५. मुलांचा काय पण आपलाही माईंड सेट चेक करा. माईंड सेट बदलता येतो यावर विश्वास ठेवा.
(लेखिका सायकॉलॉजिस्ट आहेत.)