Join us  

आपली मुलं भविष्यात यशस्वी व्हावीत असं वाटतं? आईबाबांनो फक्त 3 गोष्टी करा, नियमित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 7:45 PM

प्रत्येक गोष्ट मुलांनी पालकांच्या सल्ल्याने, त्यांच्या दबावापुढे झुकून केली तर मुलं भविष्यात यशस्वी कशी होतील? ती यशस्वी होण्यासाठी पालकांनी तीन गोष्टी करणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात.

ठळक मुद्देपर्याय निवडीचं स्वातंत्र्य मुलांना असायला हवं.पालकांनी मुलांशी मोकळेपणानं बोलायला हवं. त्यांना काय करावंसं वाटतं, त्यांचं कशात मन रमतं याबाबत मोकळेपणानं विचारायला हवं. पालकांनी मुलांना त्यांच्या वयाच्या मुला-मुलींसोबत वावरायला प्रोत्साहन द्यायला हवं.

 प्रत्येक आई बाबांचं एकच स्वप्न असतं आपल्या मुलांनी भविष्यात यशस्वी व्हायला हवं. ती त्यांच्या नावानं ओळखली जायला हवीत. यासाठी मुलांचे प्रयत्न जितके महत्त्वाचे असतात तितकीच पालकांची मदतही महत्त्वाची असते. येथे मदत म्हणजे स्पून फीडींग नव्हे. प्रत्येक गोष्ट मुलांनी पालकांच्या सल्ल्यानं करणं नव्हे. अशा मार्गानं मुलं यशस्वी होत नाही, स्वत:च्या हिंमतीवर मोठी होत नाही हे सत्य आहे. पण मग मुलांनी यशस्वी होण्यासाठी पालकांनी काय करावं? हा प्रश्न उरतोच. या प्रश्नाला ‘अमारिलो चिल्ड्रन्स होम एग्जीक्यूटीव’चे संचाक बेलिंडा पेलेसियस यांनी मुलांच्या मानसिक गरजा काय असतात आणि त्या पूर्ण करण्यात पालकांची भूमिका काय याबाबत मार्गदर्शन केलं आहे. त्यासाठी त्यांनी तीन उपाय सांगितले आहे.

Image: Google

मुलांनी यशस्वी होण्यासाठी

1. मुलांनी भविष्यात काय करावं, कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणता क्लास लावावा, क्लास लावावा की नको, कोणता खेळ खेळावा याबाबतचे सर्व निर्णय हे बहुतांश वेळी पालकच घेतात. बर्‍याचदा पालकांनी मुलांसाठी निवडलेला पर्याय त्यांना पटत नाही. कारण एकतर तो मुलांशी बोलून निवडलेला नसतो, त्यात मुलांच्या काहीही म्हणण्याची दखल घेतलेली नसते. अशा पर्यांयासोबत मुलं मन मारुन जातात आणि तज्ज्ञ म्हणतात अशी मुलं भविष्यात यशस्वी होत नाही. तज्ज्ञ म्हणतात की पर्याय निवडीचं स्वातंत्र्य मुलांना असायला हवं. अभ्यास सांगतो जी मुलं अभ्यासात, पुढे करिअरमधे यशस्वी झालेली असतात त्यांना पालकांचा भावनिक आधार मोठ्या प्रमाणावर मिळालेला असतो. त्यांच्या पालकांनी त्यांना निर्णय स्वातंत्र्य दिलेलं असतं. मुलांनी भविष्यात यशस्वी होण्यासाठी मुलांकडे निवडीचं स्वातंत्र्य असायला हवं.

2. बरेच पालक मुलांवर दबाव आणतात की तू अमूक सारखं बनलं पाहिजे, अमूक खेळाडूसारखं तू जिंकायला हवं. पालकांच्या अशा अपेक्षांचं मुलांच्या मनावर दडपण येतं. तज्ज्ञ म्हणतात मुलांना प्रेरणा देण्यासाठी एखाद्याचं उदाहरण देणं, त्यांच्या यशाची, कष्टाची गोष्ट सांगणं हे ठीक पण त्यासाठी आग्रह धरणं, त्यांच्यावर जबरदस्ती करणं ही गोष्ट चूक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यापेक्षा पालकांनी मुलांशी मोकळेपणानं बोलायला हवं. त्यांना काय करावंसं वाटतं, त्यांचं कशात मन रमतं , त्यांना पुढे काय करायला आवडेल याबाबत त्यांचं मत विचारलं तर आपल्या म्हणण्याला आई बाबा महत्त्व देतात ही जाणीव मुलांमधे निर्माण होते. ही जाणीवच त्यांना जबाबदार बनण्यास सहाय्यभूत ठरते.

Image: Google

3. मोठ्या माणसांचं जसं एक सामाजिक विश्व असतं, त्यांच्या जशा ओळखी पाळ्खी असतात, त्यांचं जसं मित्र-मैत्रिणींचं वर्तुळ असतं तसं आपल्यालाही हवं अशी अपेक्षा मुलांना असते. या सामाजिक विश्वातून मुलं खूप शिकतात, त्यांना त्यातून आनंद मिळतो, आत्मविश्वास वाढतो. पण सध्या मुलांच्या सामाजिक विश्वाचं स्वरुपच बदललं आहे. एकतर मुलं घराबाहेर कमी आणि घरात स्क्रीनसमोर जास्त असतात. तज्ज्ञ म्हणतात मुलांच्या वाढीसाठी ही धोकादायक गोष्ट आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या वयाच्या मुला-मुलींसोबत वावरायला प्रोत्साहन द्यायला हवं. या प्रोत्साहनानंच मुलं मैत्री करायला शिकतात, आपल्याला मैत्री करता येते, मैत्री टिकवता येते याबाबतचा त्यांच्यातला आत्मविशास दुणावतो. मुलांना मैत्रीतून नात्याचं महत्त्वही कळतं. ही संवेदनशिलता मुलांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची असते असं तज्ज्ञ म्हणतात.