ऋता भिडे
“आई, मला भूक लागलीये. आत्ताच्या आत्ता काहीतरी खायला दे ना.” “ अरे तो बॉल नीट टाक.” “ माझा अभ्यास झाला.” अशी आणि अश्या प्रकारची वाक्य मुलं सहज बोलतात. पण काही मुलांना ही सोपी वाक्य, शब्द म्हणायला खूप अवघड जातं. वयानुसार मूल बोलत नसेल, उच्चार बरोबर करत नसेल, विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देऊ शकत नसेल तर पालकांना टेन्शन यायला लागते. इतकेच नाही तर अनेकदा मुलं आपण बोललेलं परत परत बोलतात, खूप अडखळत बोलतात. पण आपलं मूल काय बोलतंय हे समोरच्या व्यक्तीला समजत नसेल, गटामध्ये दिलेल्या सूचना समजायला आणि त्यानुसार वागायला त्याला वेळ लागत असेल तर मुलाच्या वाचा आणि भाषा कौशल्य विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवं. पालक म्हणून आपण मुलांच्या शारीरिक विकासाकडे, बौद्धिक विकासाकडे लक्ष देतो पण त्याचवेळी बाकी विकास कौशल्यांकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं.
सध्या मुलं एकलकोंडी, गटामध्ये असूनसुद्धा एकेकटं खेळायला प्राधान्य देणारी, पालकांच्या प्रश्नाचं उत्तरं बऱ्याचदा माहिती असूनसुद्धा ( असं पालकांचं म्हणणं असतं) न देणारी, एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सतत मोबाइलला चिकटलेली असतात अशा तक्रारी पालक सातत्यानं करतात. म्हणजेच मुलं आभासी जगात जास्त आणि खऱ्या जगात कमी राहायला लागली आहेत. बरेचदा मूल लवकर बोलत नसेल तर पालक तीन वर्षापर्यंत वाट बघत थांबतात, लगेच डॉक्टरकडे जात नाहीत. काही जणं डॉक्टर किंवा भाषातज्ज्ञ सोडून बाकीच्यांच्या सल्ल्यानुसार मुलांवरती बोलण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहतात. पण या सगळ्यामध्ये महत्वाचा वेळ वाया जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत स्पीच डिले असे म्हणतात.
स्पीच डिले होऊ नये म्हणून काय करायला हवे?
मुलांच्या भाषा विकासामध्ये त्यांचे पालक आणि आजूबाजूच्या वातावरणाचा महत्वाचा सहभाग असतो. मुलांना मोठ्यांबरोबर समारंभाला नेणं, भाजी आणण्यासाठी नेणं, छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांची मदत घेणं अशा दैनंदिन गोष्टींमधून मुलांचे वाच्यता आणि भाषा कौशल्य वाढवता येऊ शकतं. याबरोबर आणखी कोणत्या गोष्टी केल्याने मूल वेळेत आणि स्पष्ट बोलू शकेल ते पाहूया..
१. मुलांबरोबर संवाद वाढवा - लहान मुलांशी खेळणं, त्यांना वेगवेगळ्या विषयांच्या गोष्टी सांगणं, त्यांच्याबरोबर पुस्तकं वाचणं, आपल्या कामामध्ये मुलांना त्यांना जमतील अशी कामं करायला देणं, पालकांबरोबर सार्वजनिक ठिकाणी जाणं आणि तिथे गेल्यावर मुलांना इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन देणं अशा अनेक गोष्टी पालक मुलांबरोबर संवाद वाढवण्यासाठी करु शकतात.
२. स्क्रीन टाइम ठरवणे - मुलांचा स्क्रीन टाइम हा सध्या पालकांचा अगदी कळीचा मुद्दा झालेला आहे. मुलांना स्क्रीन बंद करण्याआधी वॉर्निंग अलार्म द्या. व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत थांबा. मुलांनाच व्हिडिओ बंद करायला सांगा. स्क्रीन बंद झाल्यावरती पुढे काय करायचं हे मुलांना सांगा.
३. मुलांना बागेमध्ये किंवा मैदानामध्ये खेळायला न्या - गटामध्ये (group) खेळल्यामुळे मुलांचा मुलांशी संवाद वाढवायला मदत होते. खेळामध्ये असलेले नियम समजून मुलं छान खेळू शकतात. यामुळे मुलांची ऐकण्याची क्षमता वाढायला मदत होते. निरनिराळ्या गोष्टींचा, खेळांचा, समन्वय मुलांना साधता येऊ शकतो.
४. सार्वजनिक ठिकाणी मुलांना न्या - बँक, पोस्ट, किराणामालाचे दुकान, सायकल किंवा रिक्षा स्टॅन्ड, बस स्टॉप अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना घेऊन गेल्यास त्यांना व्यवहारिक अनुभव येतो. पालक म्हणून तुम्ही एक तरी नवीन जागा तुमच्या मुलाला आठवड्यातून एकदा दाखवा. त्या जागेविषयी आधी थोडी कल्पना द्या. तिथे मुलांनी कसं वागणं अपेक्षित आहे हे सुद्धा मुलांना सांगा.
५. मुलांबरोबर मनसोक्त खेळ खेळा - पालकांनी मुलांशी वयानुसार खेळ खेळले तर खेळांमधून मुलांच्या भाषेचा विकास होण्यासाठी मदत होईल. लहान मुलांसाठी खेळ हे काम आहे. दिवसभर मोठी माणसं जशी कामं करतात तशीच लहान मुलं खेळतात. कोडी, गाणी, चित्र काढणं, सायकल चालवणं, प्रसंगानुसार आलेले अनुभव सांगणं, नाटक किंवा नकला करणं अशा खेळांमधून पालक मुलांचा भाषा विकास हसत खेळत करू शकतात.
(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहेत.)