लहान मुलांना सांभाळणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. ते जशा नवीन गोष्टी शिकत असतात तसं पालक म्हणून त्यांना कसं वाढवायचं, त्यांच्याशी कसं वागायचं याबाबत आपणही रोज नव्याने काही ना काही शिकतच असतो. मुलं लहान असतात तोपर्यंत ठिक आहे पण जशी मोठी होत जातात तशी त्यांची समज वाढत जाते आणि मग प्रमाणापेक्षा जास्त गोष्टी कळायला लागल्या की त्यांच्याशी डील करणं हा एक टास्क होतो. बरेचदा मुलं आई-वडिलांचे ऐकत नाहीत तर कधी उलटं बोलतात. हे बोलताना मुलांना आपण कुठे आहोत, आजुबाजूला कोण लोक आहेत याचेही भान राहत नाही आणि मग पालक आणि मुलांमधील वाद वाढत जातात (Does your child back Answer you).
पालक मुलांचे ऐकत नाहीत म्हणून मुलं हट्टीपण करतात आणि ते हट्टीपणा करतात म्हणून पालक चिडतात, ओरडतात प्रसंगी मारतातही. हे सगळे प्रसंग अगदी नियमितपणे आपल्या आजुबाजूला घडत असतात. अमुकचा मुलगा किंवा मुलगी किती उलटं बोलते असे संवादही काही वेळा आपल्या कानावर पडतात. उलटं बोललास तर मी असं करेन अशा धमक्याही आपण मुलांना काहीवेळा देतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. मुलांनी चारचौघात उलटं बोललं की आपल्याला ते अपमानास्पद वाटते, आपण चिडतो. पण हे सगळे प्रसंग हाताळायचे आणि मुलांशी योग्य पद्धतीने डील करायचे तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स कोणत्या ते समजून घेऊया...
मुलं उलटं बोलतात कारण त्यांना पालकांना २ गोष्टी सांगायच्या असतात...
१. आई मी आता मोठा किंवा मोठी होत आहे तेव्हा माझे काही निर्णय आता मला घेऊदे. बरेचदा आपण काळजीपोटी मुलांना सतत सूचना करतो किंवा काही ना काही सांगायला जातो. पण मुलं मोठी होत असतात आणि त्यांना त्यांची मतं, निर्णयक्षमता तयार व्हायला लागते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ज्याठिकाणी फारसा तोटा होणार नाही किंवा विशेष फरक पडणार नाही अशावेळी मुलांना त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यायला हवेत. पालक म्हणून आपण काही पावलं मागे जाऊन त्यांना त्यांचे निर्णय स्वत: घेऊ द्यायचे. आपला एखादा निर्णय चुकता हे मुलांच्या लक्षात येईल तेव्हा त्यातून त्यांना काही ना काही नक्की शिकायला मिळेल. पण जे निर्णय बरोबर असतील त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच पण स्वत:विषयी त्यांना नकळत आदर वाटायला लागेल.
२. मुलं आणि पालकांमध्ये असणारे कनेक्शन स्ट्राँग नसते तेव्हा मुलं पालकांना उलटं बोलण्याची शक्यता जास्त असते. मुलांसोबतचे हे कनेक्शन स्ट्राँग होण्यासाठी पालकांनी योग्य वेळी योग्य त्या स्टेप्स अवश्य घ्यायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचे मुलांना सतत गाईड करणे, सूचना देणे थांबवायला हवे. आपण अनेकदा मुलांना हे चूक, ते बरोबर, असं कर, तसं करु नको असं सतत सांगत राहतो. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद करा आणि मुलांसोबत काही क्षण आनंदात, मजेत घालवण्याचा प्रयत्न करा. मुलांना आपल्याला काय सांगायचं आहे त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या आवडीच्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारल्याने तुमचं आणि मुलांचं कनेक्शन नक्कीच स्टाँग होण्यास मदत होईल आणि नकळत मुलामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल.