मुलं लहान असताना आपल्या मागे मागे करत सतत आई आई करतात आणि काहीतरी सांगत असतात. पण जशी मुलं मोठी होतात तसं ते विचार करायला लागतात, त्यांच्या भावना तयार होतात, बाहेरच्या जगात गेल्याने त्यांना असंख्य गोष्टी नकळत समजायला लागतात. इतकंच नाही तर शाळा, क्लासेस, मित्रमंडळी असं मुलांचं एक वेगळं जग तयार होतं. मग हळूहळू मुलं आपल्या जगात रमतात आणि त्यांचा आपल्याशी असलेला कनेक्ट काही प्रमाणात कमी व्हायला लागतो. पालक म्हणून आपल्याला मात्र ते शांत झाले की या गोष्टीबाबत चिंता वाटायला लागते. त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, ते काय विचार करत असतील, कोणत्या गोष्टीची भिती तर नसेल ना असे एक ना अनेक विचार आपल्या मनात येतात. पण मुलांचा आपल्याशी असलेला कनेक्ट कायम राहावा यासाठी पालकांनी एक गोष्ट आवर्जून करायला हवी आणि ती म्हणजे मुलांशी संवाद. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात (Does your child not talk to you much , Do 1 thing)...
नातं बळकट करण्याचं एक उत्तम माध्यम संवाद असल्याने आपला मुलांशी संवाद कमी होत नाही ना किंवा तुटत नाही ना हे पालकांनी वारंवार तपासून पाहायला हवं.या संवादात अगदी रोजच्या गोष्टींबाबत शेअरींग, मुलांच्या किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल चर्चा, कला, सामाजिक विषय अशा कोणत्याही विषयावरच्या गप्पा असू शकतात. पण हा संवाद मुलांसोबतचं नातं बळकट राहण्यासाठी अतिशय आवश्यक असतो हे पालक म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. अनेकदा मुलं शाळेत काय केलं, दिवस कसा होता असे प्रश्न विचारल्यावर एका शब्दात उत्तरं देतात. मग पुढे काय बोलायचं असा प्रश्न पालक म्हणून आपल्यालाही पडतो. तर अशावेळी आपला दिवस कसा होता, आपण ऑफीसमध्ये काय केलं, आपल्याला कोण कोण भेटलं असं काही आपण मुलांना सांगू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय चालू आहे हेही त्यांना कळेल आणि आपण त्यांच्याशी शेअर करतो म्हणजे ते आपल्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहेत असं वाटून त्यांचा आपल्याशी कनेक्ट वाढण्यास मदत होईल.
दिवसभरात आपल्यासोबत घडलेल्या सकारात्मक गोष्टी आपण मुलांना सांगू शकतो. आपल्याकडे सांगण्यासारखं काहीच नसेल तर आपण एखादं पुस्तक वाचत असू, चित्रपट पाहिला असेल, विकेंडला आपले काही प्लॅन असतील, मुलांच्या मित्रमैत्रीणींबद्दल असं वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण त्यांच्याशी बोलू शकतो. मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी जर आपण संवाद करत असू किंवा त्या पद्धतीने संवादाची सुरुवात केली तर मात्र मुलांना ते लक्षात येतं आणि ते स्वत:ला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.आपण काढून घ्यायचे म्हणून त्यांच्याशी बोलत असू तर ते त्यांना कळते आणि नकळत ते आपल्याशी संवाद कमी करतात. पण गप्पा म्हणून त्यांच्याशी बोललात तर मात्र ते त्यांच्या सगळ्या गोष्टी नकळत तुमच्याशी शेअर करतील यात शंकाच नाही.