Join us  

परीक्षा जवळ आली तरी मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाहीत? करा फक्त २ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 3:01 PM

Dose your child not agree to sit and study : मुलांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर २ गोष्टी करायलाच हव्यात...

मुलं काही केल्या एका ठिकाणी बसून अभ्यास करत नाहीत अशी तक्रार अनेक पालक वारंवार करताना दिसतात. परीक्षा तोंडावर आल्या तरी मुलं नीट अभ्यास करत नसतील तर पालकांना टेन्शन येणे स्वाभाविक असते. अभ्यासाला बसले की सतत काही ना काही कारणाने उठतात आणि त्यामुळे अभ्यासात नीट लक्षच लागत नाही. अशाने ते काय वाचतात काय करतात त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. मग विषय, अभ्यास सोपा असून आणि सगळं येत असूनही ऐन परीक्षेत कमी गुण मिळतात आणि मुलं मागे राहतात. या सगळ्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न तमाम पालकांना पडलेला असतो. त्यासाठीच समुपदेशक प्रिती वैष्णवी २ महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला पालकांना देतात. त्या गोष्टी कोणत्या आणि त्यामुळे खरंच उपयोग होईल का ते पाहूया (Dose your child not agree to sit and study)...

१. मुलांचे नियमित शेड्यूल आहे का? 

आपल्या मुलाचे नियमित शेड्यूल आहे की नाही हे तपासणे अतिशय गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर शाळा, त्यानंतर आल्यावर फ्रेश होऊन जेवण, मग थोडा आराम किंवा स्क्रीन टाइम, मग अभ्यास, एखादा क्लास किंवा ग्राऊंड आणि मग परत अभ्यास असे काही ठोस रुटीन असेल तर मुलांना ठराविक वेळेत ठराविक गोष्ट करायची आहे याची सवय लागते आणि मुलं नकळत एका जागी बसायला शिकतात. मुलांचे नेमके शेड्यूल असेल तर त्यामुळे आपण जे सांगतो ते ऐकण्याची मुलांची क्षमता जास्त असण्याची शक्यता असते. पण रुटीन सतत बदलत असेल तर मूल फोकस राहत नाही आणि आपले म्हणणेही ऐकून घेण्याची शक्यता कमी असते. 

२. अभ्यासासाठी प्रमाणापेक्षा जास्त मागे लागणे 

काही वेळा पालक मुलांच्या अभ्यासासाठी खूप मागे लागतात. तू अभ्यास केला नाहीस तर असं होईल किंवा तू अभ्यास केला नाहीस तर अमुक होईल असं काही ना काही सांगून आपण त्यांच्या खूप मागे लागतो. अशावेळी मुलं नकळत आपले कान बंद करतात आणि ते पालकांचे काहीच ऐकेनासे होतात. अशावेळी मुलांच्या लहानातल्या लहान गोष्टींचे कौतुक करणे अतिशय उपयुक्त ठरते. यामध्ये अगदी आज तू डबा किती छान संपवलास इथपासून ते तू माझं सगळं किती छान ऐकतोस इथपर्यंत काहीही असू शकेल. असं केल्याने मुलांचे बंद झालेले कान उघडण्यास मदत होईल आणि आपण जे म्हणतो आहोत ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं