Join us  

इंग्लंडच्या राणीची नातसून हुशार; चारचौघांत लेकरांना दाखवते कोडवर्डचा धाक! आईच्या भन्नाट युक्तीची जगात चर्चा      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 4:06 PM

ब्रिटीश राजघराण्यातील डचेस केट मिडलटन आपल्या मुलांच्या बाबतीत जितकी मऊ आहे तितकीच शिस्तीच्या बाबतीत काटेकोरही. पण् मुलांनी शिस्तीत वागावं म्हणून केटला कधीही मुलांवर आरडाओरडा करावा लागत नाही. ती आपल्या मुलांना शिस्त शिकवते ती कोडवर्डमधे. तिच्या शिस्तीची ही भाषाच वेगळी. 

ठळक मुद्देमुलांना शिस्त शिकवण्यासाठी  केट मिडलटनची एक सांकेतिक भाषा आहे.केट मिडलटननं सुरुवातीला पालकत्त्वाचे धडे भलेही पालकत्त्वाच्या पुस्तकातून् गिरवले. पण नंतर एक आई म्हणून मुलांशी वागण्याची  तिनं तिची खास शैली तयार केली. कोड वर्ड द्वारे मुलांना वागण्या बोलण्याची शिस्त प्रेमानं पण निर्धारानं शिकवणारी केट मुलांच्या भावनांशी एकरुप होवून त्यांना मोकळं जगण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अनुभव देते आहे. 

चारचौघात आपल्या मुलांनी चांगलं वागावं, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण कधी कधी मुलं अशी वागतात की आई वडिलांना मान खाली घालावी लागते. आपल्या मुलांचं वागणं बघून लोकं काय म्हणतील अशी भीती त्यांना वाटते.  मग त्यांच्यावर ओरडलं जातं, राग खूपच अनावर झाला तर प्रस्ंगी दोन फटकेही द्यावे लागतात. मुलांनी हट्ट करणं, बेशिस्त वागणं, आई वडील म्हणून आपलं चिडणं, ओरडणं हे फक्त आपल्याच बाबतीत होतं असं नाही. सगळीकडे हे सारखंच आहे. पण तरीही मुलांना शिस्त लावण्याच्या, त्यांना मोठं करण्याच्या पध्दती यामधे फरक असतो. आणि जिथे फरक दिसतो तिथून नक्कीच काहीतरी शिकायला मिळतं. आता ब्रिटीश राजघराण्यातील केट मिडलटनचंच पाहा ना, एक आई म्हणून आपल्या तीन मुलांना वाढवताना तिलाही अशी प्रसंगांचा सामना अनेक वेळा  करावा लागतो. पण हे प्रसंग हाताबाहेर जाऊ  नये, हद्द सोडून वागणारी मुलं पटकन शांत व्हावीत यासाठी केट मिडलटन मुलांना रागवत नाही, त्यांच्यावर ओरडत नाही, फटके देऊन त्यांना शांत बसवत नाही की त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या पूर्ण करुन त्यांची खुशामत करुन वेळ/ प्रसंग निभावून नेत नाही.

Image: Google

आता पालकत्त्वाच्या बाबतीत काही सांगताना थेट ब्रिटीश राजघरण्यातील केट मिडलटनचं उदाहरण आपल्या बाबतीत आणि परिस्थितीत कसं बरं लागू पडेल? असा प्रश्न नक्कीच पडेल.पण केट मिडलटन ही ब्रिटीश राजघराण्याची 'डचेस' असली तरी ती चारचौंघीसारखी आई देखील आहे. ब्रिटीश राजघराण्यात मुलं वाढवली जातात ती शिस्तीच्या टोकावर. हे केट मिडलटनला आपल्या पहिल्या मुलाच्या म्हणजेच जॉर्जच्या जन्माच्या वेळेसच माहिती होतं. त्यामुळे आपल्याला आपलं आई म्हणून वागणं आता बदलावं लागेल याचा तिला अंदाज आलेला होता. पण् म्हणून तिला आपल्या मुलांना शिस्त लावताना धारेवरही धरायचं नव्हतं.आपल्या पालकत्त्वाच्या अनुभवाबद्दल ती जेव्हा प्रसारमाध्यमांना मुलाखती देते तेव्हा पालकत्त्वाचे सुरुवातीचे धडे मी याबाबतचे पुस्तकं वाचूनच गिरवले आणि  पुढे पुढे मला माझं हे जमत गेलं, असं मोकळेपणानं मुलाखती देताना सांगते. 

Image: Google

ब्रिटीश राजघराण्यातील डचेस आणि आई म्हणून वावरताना आपल्याला प्रचंड ताण जाणवतो हे केट मान्य करते. पण चारचौघात आपल्या मुलांसोबत एक आई म्हणून वावरताना हा ताण हाताळण्याचं कौशल्य केटकडे आहे. त्यामुळेच तेथील माध्यमांमधे केटच्या पालकत्त्वाचं, आई म्हणून आपल्या मुलांशी वागण्याचं , पालकत्त्वाबाबतच्या तिच्या विचारांचं कौतुक केलं जातं.  कारण केट मिडलटनची आपल्या मुलांना शिस्त लावण्याची पध्दतच वेगळी आहे. 

केट आपल्या मुलांच्या बाबतीत जितकी मऊ आहे तितकीच शिस्तीच्या बाबतीत काटेकोरही. पण् मुलांनी शिस्तीत वागावं म्हणून केटला कधीही मुलांवर आरडाओरडा करावा लागत नाही. ती आपल्या मुलांना शिस्त शिकवते ती कोड वर्डमधे. मुलांना शिस्त शिकवण्यासाठी तिची एक सांकेतिक भाषा आहे. ते संकेत तिने वापरले, तशा खुणा केल्या की आपल्या आईला काय म्हणायचं आहे, हे आता सर्वात लहान असलेल्या लुईसलाही कळू लागलं आहे. जॉर्ज जेव्हा चारचौघात विचित्रं वागू लागतो, दंगा घालतो तेव्हा केट 'शांत बस नाही तर देईन रट्टा!' असं म्हणत नाही. ती जॉर्जच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवते. आईनं डोक्यावर हात ठेवला की जॉर्जला कळतं की आपल्याला आई शांत व्हायला सांगतेय. 

Image: Google

जॉर्ज, शार्लोट, छोटा लुईस् यांची मस्ती डोईजड होऊ लागली, हाताबाहेर जाऊ लागली की,  'अरे शांत बसा रे कार्ट्यांनो ' असं वैतागून न बोलता केट उत्साहाने म्हणते, 'चला आता ब्रेक घेऊ या!' आईनं असं म्हणताच तिन्ही मुलं शांत होतात आणि आपआपल्या कामाला लागतात. मस्ती झाल्यावर मुलांनी शांत होण्यासाठी केटकडे बऱ्याच कल्पना आहेत. ती मुलांना कोडी सोडवायला देते, वाचायला देते.

केटच्या तिन्ही मुलांमधे शार्लोट जरा हट्टी स्वभावाची. आई बाबांसोबत बाहेर असताना तिचा हट्ट उफाळून येतोच. तेव्हा केट खाली वाकते. शार्लोटच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे बोलते किंवा खाली वाकून तिच्या जवळ जाऊन स्वत:चा बोट वर करते. आई शांतपणे बोलत आहे किंवा तिने बोट वर केला आहे याचा अर्थ आपल्याला शांत व्हायचं आहे, हट्ट सोडायचा आहे हे तिला बरोबर कळतं. 

मुलं जेव्हा चुकीचं वागतात तेव्हा पालक म्हणून आपण आपली भूमिका शांतपणे आणि उत्तमरित्या पार पाडायला हवी. आपली भूमिका अशी हवी ज्यामुळे मुलं दुखावली तर जाणार नाही , पण् मुलांनाही काय योग्य आहे ते कळेल. आणि आपण मुलांशी कठोर वागलो नाही याचं एक आई म्हणून ,पालक म्हणून समाधान आपल्यालाही मिळेल असं केट म्हणते. 

Image: Google

लहान मुलं ही लहान मुलांसारखीच वागणार. त्यांनी लहान प्रौढांसारखं सतत शिस्तीत आणि नियमात वागावं अशी अपेक्षा मी मुलांकडून ठेवत नाही, असं सांगणारी केट म्हणूनच  हात हलवत कौतुकानं पाहाणाऱ्या लोकांना शार्लोट जेव्हा जीभ काढून वाकोल्या दाखवते तेव्हा  तिच्यावर चिडत नाही, किंवा आपली मुलगी अशी काय वागली म्हणून संकोचत नाही. हसण्यावारी हा प्रसंग निभावून नेणाऱ्या केटबद्दल म्हणूनच तेथील लोकांना कौतुक वाटलं. केट म्हणते मुलांच्या प्रत्येक वागण्याला आपण नियंत्रित करु शकत नाही. केट मुलांना काही गांभिर्यानं सांगायचं असेल तर शांतपणे आणि ठामपणे बोलते. आईच्या बोलण्यातला भाव ओळखून मुलांना आईला काय सांगायचं आहे ते कळतं. आपल्या मुलांच्याबाबतीत केट संवेदनशील आहे, मृदू आहे. आपली मुलं येऊन आपल्याला बिलगतात , मीठी मारतात तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा प्रसंग असतो, असं केट सांगते. 

Image: Google

केट मुलांना बाहेर जाऊन खेळण्यास, मस्ती करण्यास प्रेरणा देते.  त्यांनी पावसात भिजावं, उन्हात फिरावं, गारठ्यात कुडकुडावं असं केटला वाटतं.  मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी मोकळं खेळणं, निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी राहाणं महत्त्वाचं आहे असं केट पालकत्त्वा बाबतच्या एका पॉडकास्टमधे बोलताना सांगते.  केट म्हणते , माझी मुलं महालातल्या बागेत भाज्या पिकवतात. त्यांनी गाजर, घेवडा, बीट लावलं आहे. आपल्या हातानं लावलेलं बीट जॉर्ज  आवडीनं खातो. मुलं जेव्हा काही खोदतात, पेरतात, धावतात, पडतात  तेव्हा त्यांना जे धडे मिळतात ते त्यांना आयुष्य जगायला शिकवतात. हे धडे त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक आणि बौध्दिक विकासासाठी अत्यंत गरजेचे आहेत  असं केटला वाटतं. 

Image: Google

कोड वर्ड द्वारे मुलांना वागण्या बोलण्याची शिस्त प्रेमानं पण निर्धारानं शिकवणारी केट मुलांच्या भावनांशी एकरुप होवून त्यांना मोकळं जगण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अनुभव देते आहे. भलेही ब्रिटीश राजघराण्यातील केटची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. पण एक आई म्हणून केटला मुलांच्याबाबतीत असलेली कळकळ, प्रेम, काळजी ही कोण्याही सामान्य स्त्रीसारखीच आहे. म्हणूनच एक आई म्हणून डचेस केट मिडलटन आपल्या पालकत्त्वाच्या अनुभवाबद्दल काय  सांगते याला खूप महत्त्व आहे. 

टॅग्स :पालकत्व