Join us  

आई, बोअर होतंय काय करु, मोबाइल दे! ही भुणभूण बंद करणाऱ्या ५ ॲक्टिव्हिटी-मुलंही खुश, मोबाइलला सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 1:32 PM

Easy Home Activities For Kids Parenting Tips : सहज जमतील अशा काही अॅक्टीव्हिटीज मुलांना दिल्या तर त्यांचा वेळ तर चांगला जातोच पण त्यांचा विकासही होतो.

ऋता भिडे 

“आई कंटाळा आलाय. आता मी काय करू ?” असं वाक्य तुमची मुलं सुद्धा तुम्हाला दिवसातून एकदा तरी म्हणत असतील. घरामध्ये खूप खेळणी असतात, मुलांना दुकानात नेऊन त्यांना हवे ते खेळ पण घेतलेले असतात पण तरीही थोड्या दिवसांनी मुलांना त्याचा कंटाळा येतो आणि मग परत आता काय हा प्रश्न येतो. खरं तर पालक, घरातल्या व्यक्ती आणि मित्र मैत्रिणी हीच मुलांच्यासाठी उत्तम खेळणी आहेत. पण प्रत्येक वेळेस मुलांशी खेळायला कोणी असतंच असं नाही. अशावेळी मुलं आपल्याकडे मोबाइलचा हट्ट धरतात आणि मग मोबाइल किंवा टीव्हीवरचे कार्टून पाहत बसतात. पण यापेक्षा काही चांगल्या अॅक्टीव्हीटीज आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो. ज्यामुळे मुलांचा वेळ तर चांगला जाईलच पण तो सत्कारणीही लागेल (Easy Home Activities For Kids Parenting Tips).  

१. गोष्टी सांगणे - तुमच्या मुलांना बोलायला आवडत असेल तर त्यांना तुम्ही गोष्टी वाचायला, लिहायला सांगू शकता. मुलांचं वक्तृत्व चांगलं होण्यासाठी, उच्चार सुधारण्यासाठी , भाषेचा विकास होण्यासाठी, कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी गोष्टी सांगणं खूप फायद्याचं ठरू शकत. 

(Image : Google)

२. घरातल्या कामांमध्ये मदत-लहान मुलं तुमच्या कामात लुडबुड करत असतील तर त्यांना तुम्हाला मदत करुदेत. ही मदत त्यांच्या वयानुसार करायला द्या. जसं की कपडे मशीनमध्ये टाकायला मदत करणे, कपाट आवरायला मदत करणे, घरातल्या गोष्टी सुशोभित करणे, एखाद्या पदार्थ बनवण्यासाठी मदत करणे, जेवायला घ्यायचे असेल तर ताट, वाट्या, पाणी घेणे, झाडाला पाणी घालणे वगैरे. यामुळे मुलं स्वावलंबी होतील आणि तुम्हालाही मदत होईल. 

 ३. पेन्टिंग - मुलांना पेंटिंग करायला देणं ही त्यांच्यासाठी आवडीची आणि त्यांना शांत करणारी ऍक्टिव्हिटी असते. मुलांच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी त्यांना रंग आणि कागद दिलेत तर ते समजण्यास मदत होते. मुलांना सुरुवातीला चित्र काढता येत नसेल तर त्यांना चित्र काढून रंगवायला द्या. रंगीत खडू, वॉटर कलर, रंगीत पेन्सिल यांमुळे मुलांची हाताची क्षमता, बौद्धिक क्षमता, कल्पनाशक्ती नक्कीच वाढेल. 

(Image : Freepik)

४. रांगोळी आणि मातीशी खेळणे- आपल्याकडे रांगोळी आणि माती सहज उपलब्ध होते. मुलांची सेन्सरी डेव्हलपमेंट होण्यासाठी ह्याचा वापर नक्की करा. तुमच्या मुलाच्या वयानुसार तुम्ही ह्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता. जसं  की लहान मुलांना बोटाने रांगोळी मध्ये वेगवेगळे आकार काढायला देणे, तर थोड्या मोठ्या मुलांना मातीमध्ये पाणी घालून त्याला आकार देऊन कलाकृती निर्माण करणे. 

५. विनोद सांगणे आणि कोडी घालणे - मुलांना बोलत करण्यासाठी तुम्ही त्यांना विनोद सांगू शकता. सोप्पे विनोद त्यांचं मनोरंजन पण करतील आणि त्यांना त्यांच्या मित्रांना ते सांगता पण येतील. मुलांना कोडी घालतील तर त्यातून मज्जा येईल आणि मुलंसुद्धा कोडी स्वतः बनवतील. 

 (लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं