Join us  

ताप आला की मुलं काही खातच नाहीत, काय करायचं? ३ पचायला हलके पदार्थ, भाताला हेल्दी पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 2:30 PM

Easy Recipes For Unwell Kids : मुलं आजारी पडली की त्यांना खायला काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. आजारपणात मुलांना ताकद देणाऱ्या ३ खास रेसिपी....

ठळक मुद्देपीठे पचायला हलकी असतात त्यामुळे सतत भात आणि खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा उत्तम पर्याय ठरतो. आजारपणात मुलं काहीच खायला नको म्हणत असतील तर करा थोड्या वेगळ्या पण पौष्टीक रेसिपी

मागच्या ४ ते ५ दिवसांपासून राज्यभरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. उशीरा सुरू झाला तरी जेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे त्याने काही थांबायचे नावच घेतलेले नाही. पाऊस सुरू झाला की आजारपण ओघानेच आले. वातावरणात होणाऱ्या बदलांचा आपल्या आरोग्यावर लगेचच परिणाम होतो. (Parenting Tips) लहान मुलांना तर अशा मधेच दमट आणि मधेच गारठा असलेल्या हवेचा नक्की त्रास होतो. गेल्या आठवड्यात हवामानातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि पोटदुखीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. (Cooking Tips) लहान मुले तर ताप आला की अगदीच मलूल होऊन जातात. काहीच खात-पीत नाहीत, त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. इतकेच काय ताप आला की मुले औषधे घ्यायला नको म्हणतात. सतत कुरकुर करतात आणि आई किंवा वडिलांना चिकटून झोपून राहतात (Easy Recipes For Unwell Kids). 

(Image : Google)

एरवी घरभर बागडणारी आणि खेळणारी मुलं शांत झाली की घर पण अचानक शांत होऊन जाते आणि घरातील कोणाचेच कशातच लक्ष लागत नाही. अशावेळी मुलांचे खाणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे सांगतात..पावसाळ्यासारख्या दिवसांत ताप असताना मुलांना हलका आणि सहज पचेल असा आहार द्यावा. तसेच मुलांची तोंडाची चव गेलेली असल्याने त्यांना चव येईल असे वेगवेगळे पदार्थ द्यायला हवेत. मुलांना सारखा भात देऊन उपयोग नाही, याचे कारण म्हणजे त्याने पोट भरत असले तरी म्हणावी तशी ताकद भरुन निघत नाही. ताप, सर्दी असेल तर त्यांना गळून गेल्यासारखे होते आणि अशक्तपणा येतो. अशावेळी त्यांना ताकद येईल असा पौष्टीक आहार द्यायला हवा. पाहूयात आजारी पडल्यावर मुलांना देता येतील अशा पदार्थांच्या रेसिपी...

अभिनेत्री आदिती शारंगधरने मुलाचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी शोधला भन्नाट उपाय, मोबाइलचा नाद सुटला

१. ताकद देणारी खीर 

खीर हा आजारपणात ताकद देणारा पदार्थ आहे. पचायला हलकी असणारी खीर मुलांना आवडते. दूध, तूप, थोडा सुकामेवा आणि गूळ किंवा साखर असलेली खीर ताकद देणारी ठरत असल्याने हा उत्तम उपाय आहे. यामध्ये आपण रवा, तांदूळ, दलिया, नाचणी, साबुदाणा, राजगिरी अशा वेगवेगळ्या पदार्थांची खीर देऊ शकतो. हे पदार्थ आधी तूपावर चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्यामध्ये गूळ किंवा साखर आणि आणि दूध घालून शिजवायचे. त्यात मुलांच्या आवडीनुसार सुकामेवा, वेलची पावडर घालून द्यायची. ही खीर थोडी पातळ केल्यास खायला सोपी आणि पोटभरीची होते. 

लहान मुलांच्या मनावरही असतो स्ट्रेस; ५ उपाय-मुलांची मानसिक वाढही होईल उत्तम

२. धिरड्यांचे प्रकार

मुलं गोड खात नसतील तर वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे हा उत्तम उपाय असतो. गरमागरम धिरडी मुलांना आवडतात आणि सॉस किंवा चटणीसोबत मुलं ही धिरडी अगदी आवडीने खाऊ शकतात. हिरवे मूग, नाचणीचे पिठ, आंबोळी, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, रवा-तांदूळ, बेसन पीठ अशा कोणत्याही पीठाची धिरडी फार छान होतात. यात मुलांच्या आवडीनुसार लसूण, टोमॅटो, किसलेल्या भाज्या, कोथिंबीर घालू शकतो. थोडं दही, ओवा आणि मीठ आवर्जून घालावं. पोळी-भाकरीपेक्षा गरम धिरडी खायला तर छान लागतातच आणि पौष्टीक, पोटभरीचीही होतात. 

(Image : Google)

३. तोंडाला चव आणणारी उकड

आपण अनेकदा तांदळाची उकड करतो. त्याचप्रमाणे नाचणीचे पीठ, ज्वारीचे पीठ यांची उकड करता येते. मिश्र डाळींचे पीठ असेल तर त्याचीही अशी उकड चांगली लागते. गरम असल्याने ही उकड मुलं आवडीने खातात. यासाठी पीठात पाणी, दही, साखर आणि मीठ घालून ते एकजीव करुन घ्यायचे. फोडणीला जीरे, कडिपत्ता, एखादी मिरची, लसूण असे घालावे. त्यामध्ये एकत्र केलेले मिश्रण घालून पाणी घालून चांगली वाफ येऊ द्यावी. यावर कोथिंबीर आणि तूप घालून गरमागरम उकड खायला घ्यावी. पीठाची असल्याने ही उकड फारशी चावावी लागत नाही. तोंडाची गेलेली चव येण्यास हा पदार्थ अतिशय उत्तम ठरतो. ही पीठे पचायला हलकी असतात त्यामुळे सतत भात आणि खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा उत्तम पर्याय ठरतो.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्यपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.