आपलं लहानपण आपल्या आयुष्यभराची शिदोरी असतं. लहानपणात आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या गोष्टी पुढे पूर्ण आयुष्य आपल्या सोबत राहतात. त्यामुळे लहानपणी मनावर काही आघात झाले तर त्याचे घाव बराच काळ भरुन येणारे नसतात. म्हणूनच लहान मुलांना अतिशय जपायला हवे, त्यांच्या वाढीच्या काळात त्यांच्या आजुबाजूला चांगेल वातावरण असायला हवे असे आपण वारंवार ऐकतो. मात्र काही ना काही कारणाने मुलांच्या मनावर लहानपणी ओरखाडे ओढले जातातच. महत्त्वाचे म्हणजे लहानपणी त्याचे परीणाम दिसत नाही, पण मोठेपणी भावनिक परिस्थिती कशी हाताळायची किंवा नातेसंबंधांतील भावनिक ताणतणावांतून कसा मार्ग काढायचा हे या लोकांसाठी अतिशय अवघड होऊन जाते. यामध्ये त्या मुलांची काहीच चूक नसते पण भावनिकता नसलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असतो हेच काय ते (Effects of Childhood emotional neglect).
काय अडचणी येतात...
१. नातेसंबंधांमध्ये एखादा भावनिक प्रसंग आला तर कसे वागायचे हे काही लोकांना अजिबात समजत नाही. ज्या प्रसंगांत भावना गुंतलेल्या आहेत अशा प्रसंगात स्वत:ला सावरताना किंवा परिस्थितीशी जुळवून घेताना हे लोक पुरते गोंधळून जातात. यामध्ये त्या व्यक्तींचा काहीच दोष नसतो पण लहानपणापासून भावनिक गोष्टी हाताळण्याचे ज्ञान नसल्याने असे घडते.
२. अनेकदा मुलांना लहानपणी एखाद्या भावनिक प्रसंगापासून जाणूनबुजून दूर ठेवले जाते. त्यामुळे ते भावनिकरित्या प्रगल्भ न होता दुर्लक्षित राहतात. याचा परीणाम म्हणजे कुटुंबातील व्यक्तींमध्ये असलेली भावनिक असुरक्षितता ही मुले लहानपणापासून अनुभवतात. त्यामुळे एखाद्या भावनिक प्रसंगी आपली प्रतिक्रिया काय असावी, ती व्यक्त कशी करावी याविषयी या मुलांना ज्ञान नसते.
३. लहानपणापासून हे लोक स्वत:च्याच भावना आणि भावनिक गरजांबद्दल योग्य ते धडे घेत नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासूनच नातेसंबंध निरोगी आणि परिपूर्ण बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे भविष्यात या लोकांचे नातेसंबंध सुदृढ बनतातच असे नाही.
बालपणातील भावनिक दुर्लक्ष निरोगी नातेसंबांधासाठी कसे चुकीचे ठरते
१. पालक अनेकदा कळत किंवा नकळत आपल्या पाल्याच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भावना व्यक्त करणे, त्यांची देवाणघेवाण करणे हे निरुपयोगी आणि बिनमहत्त्वाचे आहे असे या मुलांना वाटते.
२. मुले भावनिक आधारासाठी जेव्हा आपल्या पालकांकडे जातात, तेव्हा त्यांना पालकांकडून चुकीच्या पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळतात. अशाप्रकारे भावनिक होणे कसे चुकीचे आहे हे मुलांच्या मनावर बिंबवले जाते. मात्र भविष्यात नातेसंबंध जोडताना किंवा व्यक्त होताना या मुलांना बऱ्याच अडचणी येतात.
३. ज्या कुटुंबांमध्ये भावनिक गोष्टींना महत्त्व नसते त्या घरातील लोकांचे भावनिक भाषेसंबंधीचे ज्ञानही अतिशय तोकडे असते. हे शब्द माहित नसल्याने हे लोक आपल्या भावना समोरच्या व्यक्तीकडे व्यक्तच करु शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात त्यांना आपले म्हणणे सांगायचे असेल तर ते काहीसे अवघड जाते.
४. प्रेम, ओलावा, माया या भावना व्यक्त करणे म्हणजे आपली कमतरता आहे असे भावनिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोकांना वाटते. मात्र प्रेम किंवा मायेची भावना व्यक्त करणे आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त असतात असे एका अभ्यासात सांगण्यात आले आहे.