-डॉ. हेमंत सोननीस
फेब्रुवारी महिना म्हणजे परीक्षेचा हंगाम. आणि परीक्षा म्हटल्या की आपल्याकडे घरातील वातावरण पूर्णच बदलते. नाटकाचा सेट बदलतो तसे. जसजशी परीक्षा जवळ येऊ लागते तशी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि घरात सगळेच अधीर अस्वस्थ होऊ लागतात. पालकांचा एक वर्ग असतो. तो म्हणतो, ‘आमच्या वेळी आम्हाला एवढे क्लासेस, सुविधा काहीच नव्हत्या. आता तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात तर तुम्ही कसा अभ्यास करायला हवा!’ तहानभूक हरपून असे मनातल्या मनात मुलांचे उत्तर अपेक्षित असते. पालकांचा दुसरा एक वर्ग असतो. जो पूर्वी फार कमी होता, आता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात दिसतो. सुखद बदल आहे. ते म्हणतात, ‘डॉक्टर आमची मुळीच अपेक्षा नाही मुलांनी वर्गात पहिलं यावं, किंवा पैकीच्या पैकी मार्क मिळावेत; पण मुलंच ऐकत नाही. परीक्षेचं टेन्शन घेऊन बसले आहेत.’
आताशा अनेक घरांत हा अनुभव येतो आहे. मुलंच अभ्यासाचा प्रचंड ताण घेतात.
(Image : google)
मुलांना कसला ताण येतो?
१) स्वतःची इमेज/ प्रतिमा. माझे मित्र, आईवडील, शेजारी काय म्हणतील मी चांगलेच मार्क मिळवले पाहिजेत.
२) तुलना. तो बघ शेजारच्या किंवा तो बघ त्या काकांचा मुलगा किंवा तुझी मोठी बहीण बघ कसं छान करते आहे.
३) पिअर प्रेशर- माझ्या मैत्रिणीला मिळतात तेवढेच मार्क मलाही मिळाले पाहिजेत. नाही तर सगळे तिचे कौतुक करतात.
४) सोशल मीडिया इफेक्ट - स्टेटस, पोस्ट, लाइकच्या काळात स्वतःचं अस्तित्व तिथे सिद्ध करणं, त्या जगात नाव होणं.
(Image : google)
अपेक्षांचे ओझे मोठे
सर्वात मोठे ओझे कोणते असेच तर ते अपेक्षांचे! त्यामुळे दिवसभर पुस्तक घेऊन बसले तरी अभ्यास होत नाही. लक्ष लागत नाही. एकाग्रचित्त होत नाही. अभ्यास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकत नाही. स्पर्धा वाढलीये. मला कोणी समजून घेणार नाही, असे वाटते. सर्वांना वाटेल मी कमजोर आहे म्हणून मी हरले आहे.
पूर्णपणे किंवा काही प्रमाणात हे विचार आणि भावना विद्यार्थ्यांच्या मनात वादळासारखं थैमान मांडतात. सकृत्तदर्शनी व्यवस्थित दिसणारी ही मुलं आतून कोलमडून पडलेली असू शकतात. कधीकधी पालक आणि शिक्षकांच्या हे खरोखर लक्षात येत नाही. प्रेम आणि काळजी असते; पण ही मनःस्थिती लक्षात येत नाही. ‘आम्ही तुमच्यापेक्षा कठीण परिस्थितीत करून दाखवलं आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? हे करावंच लागेल आपल्याला. नाही तर पुढे कसा टिकाव लागणार? असं पालक सहज म्हणतात; पण मुलांसाठी ते सोपं नसतं.
(Image : google)
परीक्षेच्या काळात काय करावं?
२. चांगली झोप सर्वात महत्त्वाची. परीक्षेच्या अभ्यासासाठी रात्रीची झोप कमी केली पाहिजे, हा समज चुकीचा आहे. दिवसातले चोवीस तास आपल्या हातात असतात. रात्री सात तास चांगली झोप घेऊनही आपल्याकडे अभ्यासासाठी भरपूर वेळ उरतो. चांगली झोप झाल्याने मेंदू ताजातवाना होऊन अभ्यास करण्यासाठी सज्ज होतो, हे अनुमान काढणे काही कठीण नाही.
२. पुरेसा, वेळेच्या वेळी, सकस आहार घ्या.
३. मोबाइलचा वापर कमी करा, अभ्यासातल्या विश्रांतीसाठी मोबाइल फोनची मदत घेणे टाळा.
४. दहा मिनिटे मोकळ्या हवेत चालणे देखील तुमचा ताण बऱ्यापैकी कमी करू शकतो.
५. संगीत, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मदत करतात.
६. दिवसभरात किती वेळ अभ्यास करणार, ते निश्चित करा. वेळेचे योग्य नियोजन करून तो पूर्ण करा. अपेक्षित अभ्यास पूर्ण केल्यास थांबून घ्या आणि स्वतःची पाठ थोपटा.
७. पालकांनी मुलांच्या अभ्यासात जास्त हस्तक्षेप करू नये. मुलांना टिंगल-अपमान वाटेल असं बोलणं टळा.
८. अस्वस्थपणा, उदासीनता, बेचैनी खूप जास्त होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. परीक्षा द्या. चलते रहो ! डर के आगे जीत है!!
(मानसोपचार तज्ज्ञ आणि अध्यक्ष, मानसिक आरोग्य समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र)