श्रुती पानसे
परीक्षा हा इतर कोणत्याही शब्दासारखा शब्द तर आहे, पण परीक्षा हा शब्द उच्चारताच एखादं मोठं संकट येत असल्याची जाणीव खूप जणांना होते. अनेकांना तर परीक्षा म्हणताच घाम फुटतो. परीक्षेचं टेन्शन येतं, धास्ती वाटते. नको ती परीक्षा असं होवून जातं . परीक्षेचं इतकं टेन्शन येण्यामागे अनेक कारणं आहेत. आपल्याला जर परीक्षा म्हटलं तर भीती वाटत असेल तर यातलं कुठलं कारण आपल्याला लागू पडतं हे आपणच ठरवायला हवं.
परीक्षेचं टेन्शन का येतं?
परीक्षा तोंडावर आली तरी अभ्यास झालेला नसेल, अभ्यास करायला हातात पुरेसा वेळ राहिला नसेल तर.
परीक्षेत मार्क्स चांगलेच पडायला हवेत, अमूक एक नंबरच यायला हवा असं आई बाबांनी बजावून सांगितलेलं असेल.अमूक एका मित्र मैत्रिणीपेक्षा आपल्यालाच चांगले मार्क्स पडायला हवेत अशी आपण स्पर्धा लावलेली असेल तर.
आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडायला हवेत, आपला १ ते ५ मध्येच नंबर यायला हवा, आपली बेस्ट स्टुडंटची इमेज तशीच राहावी.. असं प्रेशर आपलं आपणच घेतलं असेल तर?
(Image : google)
परीक्षेचं टेन्शन घालवण्यासाठी काय कराल?
१. परीक्षेसाठी सरावाला पुरेसा वेळ काढावा. झालेल्या अभ्यासाची नीट रिव्हीजन झाली तर परीक्षेत कोणताही प्रश्न येवू देत आपल्या सोडवता येईल, हा आत्मविश्वास वाढतो.
२. अभ्यासाची एक योग्य जागा ठरवावी. परीक्षेचा अभ्यास नीट झाला तर परीक्षेचं टेन्शन येत नाही. अभ्यास नीट होण्यासाठी अभ्यासाची एक विशिष्ट जागा ठरलेली हवी. अभ्यास हाॅलमध्ये सोफ्यावर टीव्हीसमोर बसून किंवा बेडरुममध्ये गादीवर लोळून करायला गेल्यास अभ्यासात चित्त एकाग्र होत नाही.
३. टेबल खुर्चीवर शांत बसून अभ्यास करावा. अभ्यासाच्या टेबलवर मोबाइल सारख्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नकोत. अभ्यासाची जागा योग्य असल्यास अभ्यास चांगला होतो. मान- पाठ दुखणे , डोळे दुखणे , हात पाय आखडणे अशा समस्या निर्माण होत नाही.
(Image :google)
४. मन लावून अभ्यास करणं आवश्यक. पण म्हणून तासनतास एका जागेवरुन उठूच नये असं नाही. यामुळे उलट अभ्यास करण्याचाच कंटाळा येतो. हा कंटाळा येवू द्यायचा नसेल, अभ्यासानं आलेला ताण घालवण्यासाठी दर ४५ मिनिटांनी अभ्यासात ब्रेक घ्यावा. पण या ब्रेकच्या वेळेत टी.व्ही बघणं, मोबाइल खेळणं टाळावं.
५. या वेळेत पाणी प्यावं, घरातल्या घरात किंवा घराबाहेर मोकळी जागा असल्यास थोडं चालावं, आजूबाजूची हिरवी झाडं पाहावीत, तोंड धुवून फ्रेश व्हावं यामुळे अभ्यास करुन आलेला थकवा , कंटाळा दूर होतो. पुन्हा अभ्यासाला बसताना फ्रेश वाटतं.
६. अभ्यास करताना नीट लक्ष लागत नसेल तर टेन्शन वाढतं. अशा वेळी लक्ष एकाग्र करण्याचे व्यायाम करावेत. हे व्यायाम एकदम सोपे आहेत. यासाठी आपल्या नाकावाटे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर डोळे मिटून लक्ष केंद्रित करावं. ५ -७ मिनिटं हा व्यायाम केला तरी लक्ष नीट लागतं. किंवा बाहेरुन येणाऱ्या अनेक आवाजांपैकी एका आवाजावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा.
७. आपल्या समोरील पुस्तकात एखादा शब्द निवडून तो धड्यात किती वेळा आला आहे, हे मोजावं . या अशा खेळातूनही लक्ष एकाग्र होण्यास मदत होते.
८. परीक्षेचा अभ्यास नीट होण्यासाठी विषय, आपला झालेला अभ्यास, परीक्षेचं वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून वेळापत्रक तयार करावं. ज्या विषयाचा अभ्यास कमी झालेला असेल त्या विषयाला अभ्यासाच्या वेळापत्रकात पहिलं स्थान द्यावं.
९. परीक्षा जवळ आली, म्हणून सर्व सोडून फक्त अभ्यास एके अभ्यासच करावा असं नाही. आपण दिवसभरात शाळा, क्लास, अभ्यास याशिवाय इतर अनेक गोष्टी करतो. त्यात खेळ, खेळाचा क्लास, एखाद्या छंदाचा क्लास असतो. अभ्यासाचं वेळापत्रक आखताना आपल्या इतर गोष्टींना पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घ्यावी. नाहीतर परीक्षा आहे म्हणून चित्रकलेचा क्लास बुडवला असं केलं तर अभ्यास करण्याची मजाच येणार नाही. अभ्यास कसा मस्त हसत खेळत आणि आनंदाने करायला हवा.
१०. परीक्षेची तयारी करताना एका दिवशी एक विषय असं अभ्यासाचं नियोजन अनेकजण करतात. पण दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करुन कंटाळा येतो. तसं होवू नये, म्हणून एका दिवशी जास्तीत जास्त विषयांचा अभ्यास केला तर अभ्यासातला तोचतोचपणा टाळता येतो.
आपण जे वाचलं त्यातलं आपल्याला काय आणि किती समजलं हे लिहून काढल्यास त्या विषयाचं आकलन वाढतं. केलेला अभ्यास चांगला लक्षात राहातो.
खायचं काय?
परीक्षेच्या काळात चांगले पौष्टिक पदार्थ खावेत. प्रथिनं, कर्बोदकं, खनिजं आणि विविध जीवनसत्वयुक्त पदार्थ आहारात असायला हवेत. आई आग्रहाने भाजी पोळी वरण भात, कोशिंबीर खाण्याचा आग्रह करते, तो योग्यच असतो. कारण अशा पौष्टिक आणि संतुलित आहारामुळे शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळते, आनंद मिळतो. यामुळे अभ्यास करण्याचा उत्साह वाढतो. केलेला अभ्यास लक्षातही राहातो.
वेळेवर झोप,पुरेशी झोप ही गोष्ट अभ्यास चांगला होण्यासाठी आवश्यक आहे. रात्री खूप वेळ जागू नये. त्यामुळे जागही उशिरा येते. झोप पूर्ण झाली नाही असं वाटतो. अभ्यास करताना उत्साह वाटत नाही. आळस येतो. रोज वेळेवर झोपून ७ ते ९ तास झोप घेतली तर सकाळी लवकर उठता येतं. उठल्यावर छान फ्रेश वाटतं. अभ्यासात मन एकाग्र होतं.
(लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)
ishruti2@gmail.com