आई - वडील दोघंही वर्किंग असले की अनेकदा मुलांकडे पाहायला वेळच मिळत नाही. दिवस कामात निघून गेल्यावर संध्याकाळी आपणं आधीच थकलेले असतो, यामुळे मुलांसाठी आपण हवा तसा वेळ देऊ (Explained What Is 7-7-7 Rule Of Parenting) शकत नाही. मुलांना वेळच देता येत नाही अशी तक्रार आजकाल प्रत्येक पालक करत आहेत. आई - वडील म्हणून मुलांना नीट वेळ देता आला नाही की त्यांची खंत प्रत्येक पालकांच्या मनात राहतेच. काळानुसार जसा प्रत्येक (Parenting Tips) गोष्टीत बदल होत चाललेला आहे तसाच बदल आता पालकत्वामध्येही होत आहे.
साधारण १५ -२० वर्षांपूर्वी किंवा त्या आधीच्या काळात पालकांची जी भुमिका होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. बदलत्या काळानुसार पालकत्वाचे वेगवेगळे ट्रेंड देखील फारच लोकप्रिय होत जात आहेत. अशातच, जे पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांनी दिवसांतील फक्त २१ मिनिटं मुलांसाठी काढावीत असा एक नवीन पॅरेंटिंगचा ट्रेंड सध्या खूप व्हायरल होत आहे. जर आई - वडील म्ह्णून तुम्ही मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसाल तर दिवसांतील किमान ही २१ मिनिटे तरी मुलांसाठी काढाच. या २१ मिनिटांत नेमकं करायचं काय ते पाहा.
७-७-७ पॅरेंटिंगचा नवीन ट्रेंड आहे तरी काय ?
७-७-७ पालकत्वाच्या नियमानुसार, पालकांनी दररोज सकाळी किमान ७ मिनिटे, संध्याकाळी ७ मिनिटे आणि रात्री ७ मिनिटे त्यांच्या मुलासोबत घालवावेत. मुलांच्या विकासासाठी ही दिवसांतील २१ मिनिटे खूप महत्वाची आहेत. या नियमामुळे मुलांची मानसिक आणि शारीरिक वाढ तर होतेच, शिवाय पालक आणि मुलांमध्ये एक मजबूत बंधही निर्माण होतो. या पालकत्वाच्या नियमाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या नियमात दररोज फक्त २१ मिनिटे लागतात, जी व्यस्त पालक देखील त्यांच्या मुलांसाठी राखून ठेवू शकतात. तुमच्या मुलांसोबत घालवलेली ही २१ मिनिटे त्यांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
१. सकाळी ७ मिनिटे :- मुलांना सकाळीच संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक राहण्यास शिकवा :-
पालकत्वाच्या ७-७-७ नियमात, सकाळची ७ मिनिटे खूप महत्त्वाची आहे. या सात मिनिटांत, मुलांमध्ये शक्य तितके सकारात्मक विचार देणेहे पालकांचे मुख्य काम असते. कारण त्याचा मुलांच्या संपूर्ण दिवसावर सकारात्मक परिणाम होतो. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की सकाळी तुमचे मुलं जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा थोडा वेळ त्याच्यासोबत घालवा, आणि त्यांना प्रेरित करून त्यांच्या दिवसाची सुरुवात करून द्या. मुलांशी त्यांच्या दिवसभरातील प्लॅन्स विषयी बोला. शाळेत काही खास घडतंय का ते त्यांना विचारा. तुम्ही त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्ये बद्दल आणि आज तुम्ही तुमचे काम कसे पूर्ण कराल याबद्दल देखील सांगावे. यामुळे मुलांना प्रेरणा मिळते. अशा छोटाशा गोष्टीमुळे दिवसभर मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते.
२. संध्याकाळी ७ मिनिटे :- तुमचा दिवस कसा गेला - मुलांनी दिवसभरात काय केले जाणून घ्या :-
संध्याकाळी ७ मिनिटांत, मुलांनी त्यांच्या संपूर्ण दिवसभरात काय केले तसेच तुम्ही देखील दिवसभरात काय केले हे एकमेकांशी शेअर करा. जर दिवसभरात मुलाने काही चांगले काम केले असेल किंवा एखादी गोष्ट साध्य केली असेल तर त्याची प्रशंसा करा, कौतुकाची थाप द्या. याचबरोबर, जर त्याने काही चूक केली असेल तर ते काम कसे करायला हवे होते ते त्याला प्रेमाने समजावून सांगा. मुलांमध्ये दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा. तुम्ही तुमचे अनुभव मुलांसोबत शेअर करू शकता. यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन मुलांशी निरोगी संबंध निर्माण करण्यास मदत होते.
३. रात्री ७ मिनिटे: भावनिक बंधन तयार करण्याची उत्तम वेळ :-
रात्रीची ७ मिनिटे मुलांसाठी सर्वात खास असायला हवीत. झोपण्यापूर्वीचा हा काळ पालक आणि मुलांमधील नातेसंबंध अधिक घट्ट करण्यास चांगला मानला जातो. या वेळी तुम्ही मुलांना गोष्ट सांगू शकता, दिवसभरातील चांगल्या आठवणी त्यांच्यासोबत शेअर करु शकता किंवा त्यांना मिठीत घेऊन तुमचे त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करु शकता. या रात्रीच्या ७ मिनिटांमुळे मुलांच्या मनात आराम आणि शांतीची भावना निर्माण होते, ज्यामुळे त्यांना चांगली झोप देखील येते. यामुळे मुल पुढच्या दिवसासाठी फ्रेश आणि चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन झोपतात.