Join us  

मुलांसाठी आता शाळेत ‘आनंदाचा तास!’ मुलांच्या हातात पुस्तकं देण्यासाठी नक्की काय करायला हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 7:11 PM

मुलं वाचतच नाही असं म्हणण्यापेक्षा मुलांना वाचावं म्हणून काय करता येईल?

ठळक मुद्देहा ‘आनंदाचा तास’ पुरेशा गांभीर्याने राबवला गेला तर वाचनसंस्कृती नव्याने बहरून येण्याचे आशादायक चित्र नजीकच्या भविष्यात नक्कीच निर्माण झालेले दिसेल.

मनीषा उगले(लेखिका प्रयोगशील शिक्षिका आहेत.)बालपणाच्या स्मृती अतिशय गडद असतात, त्यावेळी पंचेन्द्रियांनी घेतलेले अनुभव दीर्घकाळ मेंदूत जिवंत राहतात. मी वाचायला शिकले तेव्हा पाठ्यपुस्तकानंतर सर्वात आधी काय वाचले होते हे आठवण्याचा अनेकदा प्रयत्न करते. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आमच्या प्राथमिक शाळेतील वर्गांतून टांगलेले कॅलेंडरसारखे बहुपानी तक्तेच वारंवार उभे राहतात. त्यातली चित्रे आणि छोट्या-छोट्या गोष्टी मला अजूनही व्यवस्थित आठवतात. लहान वयात वाचनाची इतकी प्रचंड भूक असताना शाळेतले हे चार-दोन तक्ते आणि पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त वाचण्यासाठी फार काही उपलब्ध नव्हते, याची मला फार खंत वाटते. ग्रंथालय हा शाळेचा आत्मा असतो. विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक विकासाची भक्कम पायाभरणी तेथून होत असते. म्हणूनच शाळांतून सुसज्ज ग्रंथालये असणे आणि त्यांचा नियमित वापर होणे गरजेचे आहे. विविध शासकीय योजना आणि अनुदाने यातून सरकारी शाळांना ग्रंथालयांसाठी अधूनमधून थोडीफार पुस्तके मिळत असतात, पण त्यांची संख्या अतिशय तोकडी असते. शाळेच्या पटसंख्येनुसार ग्रंथालयांत पुरेशी पुस्तके आणि ती ठेवण्यासाठी चांगली कपाटे असणे आवश्यक आहेत, ज्यांचा आजघडीला तरी सरकारी शाळांतून मोठा अभाव आहे.

‘गोष्टींचा शनिवार’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ई-पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र दहा वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांसाठी ती फारशी उपयुक्त नाहीत. काही जिल्ह्यांत प्रथम बुक्स, रूम टू रीड, सेव्ह द चिल्ड्रेन आणि रीड इंडियासारख्या स्वयंसहायित संस्था यासंदर्भात काही जिल्ह्यांतील शाळांत चांगले काम करत आहेत. फलटणच्या कमला निंबकर बालभवनच्या माध्यमातूनही सुमारे दीडशे गावांतील बालकांसाठी वाचन चळवळ सुरू आहे. काही शाळांतून शिक्षकांच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तर काही ठिकाणी लोकसहभागातूनही विद्यार्थ्यांसाठी अशा वाचन चळवळी सुरू असल्याचे दिसते. मात्र अशा प्रयत्नांना बऱ्याच मर्यादा असल्याने ते राज्याच्या व्यापक स्तरावर पोहोचू शकत नाहीत.

(Image :google)समाधानाची बाब म्हणजे त्यासंदर्भात मागील आठवड्यातच एक शासन निर्णय पारित झाला आहे. ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम त्यायोगे’ राबविण्यात येणार आहे. सन २०२६ पर्यंत राज्यातील इयत्ता तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल, इयत्ता आठवीपर्यंत प्रत्येक मूल ‘शिकण्यासाठी वाचू लागेल’ हे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची लोकचळवळ निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ, रीड इंडिया आणि प्रथम बुक्स यांच्या एकत्रित प्रयत्नांतून चालवला जाईल. या उपक्रमांतर्गत आठवड्याच्या वेळापत्रकात दोन वाचन तासिकांचा समावेश करण्यात येणार आहे.

‘ड्रॉप एव्हरीथिंग अँड रिड’ (DEAR) या संकल्पनेतून शाळेच्या वेळेत किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी १५-२० मिनिटे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाचण्याकरिता आनंदाचा तास घ्यायचा आहे. यात विद्यार्थ्यांनी नुसते वाचनच करायचे नाही तर वाचलेल्या कथेचा सारांश सांगणे किंवा त्यातील आवडलेल्या पात्राचे चित्र काढणे यासारखी अभिव्यक्तीसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित आहे. अनेक कृती कार्यक्रमांनी भरगच्च असलेल्या या उपक्रमाचे फलित काय निघते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वाचनातून मुलांवर चांगले संस्कार घडवणे असा एक मुद्दा या उपक्रमाच्या तपशिलात नोंदवलेला आहे. वाचनातून मुलांना ‘बोध देण्याच्या’ आणि त्यांच्यावर ‘संस्कार करण्याच्या’ आग्रहातून आपण कधी बाहेर पडणार? निखळ आनंदासाठी मुलांना वाचू द्यायला हवे. एरवीही आपण त्यांना सतत काहीतरी शिकवत असतोच. आनंदाच्या तासालाही त्यांना ‘शिकवूनच सोडायचे’ असेल, तर त्यात आनंद तो काय शिल्लक राहील?

(Image :google)

मग अभ्यास कधी करणार?

१. काही पालक किंवा शिक्षकांच्या मनात अशी शंका असू शकते की, अवांतर पुस्तके वाचणे हा अभ्यासाच्या वेळेचा अपव्यय आहे का? तर तसे अजिबातच नाही. वाचनाने मुलांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, आकलन आणि विश्लेषण क्षमता विस्तारते. त्यांची नुसती शब्दसंपत्तीच वाढते असे नाही तर विचारांची प्रगल्भताही वाढते. मोबाइलच्या आहारी गेलेल्या मुलांना वाचनाची गोडी लागली तर त्यांचा स्क्रीन टाईम आपोआपच कमी होईल२. मुलांनी वाचते व्हावे, असे वाटत असेल तर शिक्षक आणि पालकांनी त्यांच्यासमोर आवर्जून वाचायला घेण्याची गरज आहे. मुले उपदेशाने शिकत नाहीत, ती अनुकरणाने शिकतात. लहान मुलांना चांगली पुस्तके वाचून दाखवायला हवीत. पुस्तकात गंमत आहे, त्यातून आवडीच्या गोष्टी वाचायला मिळतात हे मुलांना जेव्हा कळते तेव्हा ती आपणहून पुस्तके मागायला येतात, हा आमचा शिक्षक म्हणून अनुभव आहे.

३. ‘महाराष्ट्राची वाचन चळवळ’ या उपक्रमासाठी शासनाकडून विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे मुलांपर्यंत सकस आणि दर्जेदार वाचन साहित्य आणि आनुषंगिक सोयीसुविधा पोहोचतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. फक्त हे तास उपक्रमाच्या नोंदी दाखवा आणि फोटो अपलोड करा अशा औपचारिकतेत अडकून पडू नयेत म्हणजे झाले! अनेक उपक्रमांच्या बाबतीत माहितीचा असा जाच झाल्याने नवीन उपक्रम म्हटले की, शिक्षक धास्तावतात हे खरे आहे.

त्यामुळे केवळ कागदोपत्री माहितीला महत्त्व न देता या उपक्रमाच्या खऱ्याखुऱ्या अंमलबजावणीवर अधिक भर दिला तरच अपेक्षित परिणाम साध्य होतील. सध्या फक्त सरकारी शाळांसाठी प्रस्तावित असणाऱ्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्वच शाळांतील बालकांना व्हावा, असे वाटते. हा ‘आनंदाचा तास’ पुरेशा गांभीर्याने राबवला गेला तर वाचनसंस्कृती नव्याने बहरून येण्याचे आशादायक चित्र नजीकच्या भविष्यात नक्कीच निर्माण झालेले दिसेल.

ugalemm@gmail.com

टॅग्स :शाळापालकत्वशिक्षण