Join us  

घरी येणाऱ्या मदतनीसांच्या घरी कधी तुम्ही मुलांना नेलंय का? शिकवलं कष्टांचा सन्मान करणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2022 6:51 PM

घरी रोज मदतीला येणारी ही आपली महत्त्वाची माणसं, त्यांचा  सन्मान करणं हे महत्त्वाचं नाही का?

ठळक मुद्देकष्टांचा सन्मान करायचा हे शिकवू आणि शिकवूच नाही तर आपण स्वत:ही तसं जगू.. 

दिवाळी सणाचा एक मोठा आणि अविभाज्य भाग म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना फराळासाठी आपल्या घरी बोलावणं आणि आपण त्यांच्या घरी जाणं. अजूनही सेलिब्रेशन, फराळ सुरुच आहेत. पण आपण कोणाकडे जातो? तर मुख्यतः आपल्या गावात किंवा शहरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे आणि मित्रमंडळींकडे. तिथे जाऊन आपण काय करतो? तर मुख्यतः छान नवीन कपडे घालून जातो, जातांना त्या लोकांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जातो, मस्त गप्पा मारतो आणि आपल्या घरी परत येतो. बरोबर ना? पण याच सगळ्या कार्यक्रमातून आपल्या अगदी जवळच्या, रोजच्या जगण्यात फार महत्त्वाच्या काही व्यक्ती मात्र राहून जातात. त्या म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या मदतनीस ताई.

(Image :google)

आपल्या घरी येणाऱ्या ताईंना / मावशींना आपण अगदी बजावून सांगितलेलं असतं, की दिवाळीत प्लीज सुट्टी घेऊ नका. घरी खूप धावपळ आहे. पाहुणे येणार आहेत. वाटलं तर दिवाळीच्या नंतर दोन दिवस सुट्टी घ्या. आणि या ताया / मावश्या त्यांच्या घरची दिवाळी, त्यांच्याकडे येणारे पाहुणे, त्यांची हौसमौज आणि ती करण्यासाठीची आर्थिक जुळवाजुळव हे सगळं जमवून शिवाय आपल्याही मदतीला येत असतात. आता यावर कोणी म्हणेल, की त्यासाठी त्यांना दिवाळीचा बोनस दिलेला असतो. ते जरी खरं असलं, तरी त्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही हेही खरं असतंच ना? त्या आपल्या घरच्या दिवाळीत सहभागी होत असतात. मग यावर्षी आपणही त्यांच्या घरच्या दिवाळीत सहभागी झालो तर?त्यासाठी काय करायचं? तर आपल्या इतर जवळच्या लोकांकडे जसे आपण आवर्जून मुलांना घेऊन भेटायला जातो, तसं मावशींच्या घरीसुद्धा जाऊन यायचं. जातांना एखादी भेटवस्तू घेऊन जायची. आपल्या घरी रोज येणाऱ्या मावशी / ताई कुठे राहतात हे आपणही वर्षानुवर्षं बघितलेलं नसतं. मग आपल्या मुलांना ते कुठून माहिती असणार?पण असं बघायला गेलं, तर या मावशी आपल्या अगदी जवळच्या माणसांपैकी एक असतात. आपल्या अडीनडीला आपण त्यांनाच हक्काने हाक मारतो आणि त्याही आपल्यालाच अडचणी सांगतात. मग ज्यांच्याशी आपण दुःख सहज वाटून घेतो त्यांच्याशी आनंदही वाटून घेऊया. आणि या वाटून घेण्यातली भावना सहजपणे मुलांनाही शिकवूया. आणि प्रेमानं वागायचं, माणसांचा सन्मान करायचा, कष्टांचा सन्मान करायचा हे शिकवू आणि शिकवूच नाही तर आपण स्वत:ही तसं जगू.. 

टॅग्स :पालकत्व