Join us  

बाळाला स्तनपान करताना अडचण येते? ५ पद्धतीने करा स्तनपान - आई आणि बाळ दोघांसाठी सुखकर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 3:34 PM

Best Breastfeeding Positions : स्तनपान करण्याच्या सर्वात उत्तम व आरोग्यास फायदेशीर अशा ५ पद्धतींची माहिती समजून घेऊयात.

स्तनपान ही बाळ व आई दोघांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतात. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध हाच आहार देण्यात येतो. बाळाला दूध पाजणे (breastfeeding) हे अतिशय कठीण असे काम नाही. सुरुवातीला काही प्रमाणात त्रास होत असला तरी पुढील काही दिवसांतच आईला सुद्धा याची सवय होऊन जाते. परंतु बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने स्तनपान मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे. त्यावेळी तिच्या पाठीला आधार असणे महत्त्वाचे आहे. स्तनपान देण्यासाठी विविध पद्धती प्रचलित आहे. त्यापैकी सर्वात उत्तम व आरोग्यास फायदेशीर अशा ५ पद्धतींची माहिती समजून घेऊयात(Best Breastfeeding Positions).

स्तनपान करण्याच्या ५ सोप्या पोझिशन कोणत्या आहेत ते समजून घेऊयात. 

१. साईड लाईंग (Side Lying) - ही स्थिती ज्यांची सिझेरिअन प्रसूती झाली आहे किंवा प्रसूती नंतर शरीर नाजूक झाले असेल तर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.

१. कुशीवर झोपा आणि बाळाचे तोंड तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने बाळाला कुशीवर झोपवा. २. तुमच्या खालच्या स्तनाजवळ बाळाचे डोके येईल असे बाळाला ठेवा. ३. हाताने बाळाच्या डोक्याला आधार द्या आणि गरज भासल्यास मोकळ्या हाताने स्तन बाळाच्या तोंडाजवळ न्यावेत. 

२.  क्रेडल होल्ड (Cradle Hold) - तुमचे बाळ काही आठवड्यांचे झाल्यावर आणि तुम्हाला बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यावर स्तनपानासाठी तुम्ही क्रेडल होल्ड या स्थितीचा वापरू शकता. 

१. मांडी घालून ताठ बसा किंवा आपल्याला जसे योग्य वाटेल त्या स्थितीत बसा. त्यानंतर बाळाला तुमच्या मांडीवर घेऊन एका कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवताना बाळाचा चेहरा आणि शरीर तुमच्या बाजूला ठेवा. २. तुमच्या हातांनी बाळाचे डोके, पाठ आणि नितंबाकडील भागाला आधार द्या. ३. दुसऱ्या हाताने तुमचे स्तन धरा आणि हळूच दाबा जेणेकरून ते बाळाच्या नाकाजवळ जाईल आणि यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. 

३. क्रॉस क्रेडल होल्ड (Cross Cradle Hold) -  सुरुवातीच्या काळात स्तनपानासाठी ही स्थिती वापरा. ही स्थिती खूप कॉमन आहे आणि नवीन मातांसाठी त्याची खूप मदत होते कारण ह्या स्थितीत प्रसूतीनंतर लगेच बाळाची स्तनांवरील पकड योग्य असते. सुरुवातीला थोडे कठीण वाटेल परंतु ह्या स्थितीचा सराव केल्यास ह्या स्तनपानाच्या स्थितीची आई आणि बाळासाठी खूप मदत होते. १. हात असलेल्या खुर्चीवर ताठ बसा२. तुमच्या बाळाला पोटाशी धरा३. तुम्ही पाजत असलेल्या स्तनाच्या विरुद्ध बाजूच्या खुर्चीच्या हाताचा वापर बाळाला टेकवण्यासाठी करा आणि तुमच्या हाताच्या तळव्याने बाळाच्या डोक्याला आधार द्या. ४. मोकळा हात स्तनाला खालून आधार देण्यासाठी आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांपर्यंत नेण्यासाठी वापरा.

 

४. फुटबॉल होल्ड (Football Hold) - ही स्थिती अमेरीकन फुटबॉल पासून प्रेरित होऊन तयार झाली आहे. जर तुमचे सी-सेक्शन झाले असेल किंवा तुम्हाला जुळ्या बाळांना स्तनपान करायचे असेल तर ही स्थिती चांगली आहे. 

 १. तुमच्या बाळाला खाली आधार देऊन धरा.  २. बाळाचे डोके आणि मान तुमच्या हातात धरा.  ३. तुम्ही ज्या बाजूने बाळाला पाजत आहात त्याच बाजूला मागे बाळाला त्याचे पाय जाऊ द्या.  ४. तुमच्या हाताला आधार देण्यासाठी तुम्ही उशीचा वापर करू शकता आणि तुमचा जो हात रिकामा आहे त्या हाताने बाळाचे तोंड तुम्ही स्तनां पर्यंत नेऊ शकता. 

५. रिक्लायनिंग होल्ड (Reclining Hold) -  ज्या स्त्रिया सी-सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असतात किंवा ज्यांना बसण्यास त्रास होत असेल त्यांच्यासाठी ही स्थिती उपयोगी आहे. ज्या स्त्रिया बाळाला बेड वर झोपून दूध पाजतात त्यांनी ह्या स्थितीचा सराव करावा. 

१. बेड किंवा सोफ्यावर आरामदायक स्थितीत बसा. पाहिजे असल्यास पाठीमागे उशीचा आधार घ्या आणि तुमच्या पाठीचा वरचा भाग, मान आणि डोकेआरामदायक स्थितीत आहे ना ह्याची खात्री करा. २. तुमच्या बाळाला पोटावर झोपवा आणि तुमच्या छातीजवळ घ्या आणि बाळाचे तोंड स्तनाग्रांजवळ न्यावे. ३. बाळ अगदी नैसर्गिकरित्या स्तनाग्रे शोधेल, जर गरज भासली तर तुम्ही स्तन हातात घेऊन बाळाच्या तोंडाजवळ नेऊ शकता.

स्तनपान करण्यासाठीच्या विविध पद्धती प्रचलित आहे. त्यापैकी ५ पद्धती आपण समजून घेतल्या. स्तनपान करण्यासाठीच्या अधिक पद्धती समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.   

टॅग्स :पालकत्वस्तनांची काळजी