Join us  

प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे ५ पदार्थ, संतुलित आहार पालक देतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 9:01 AM

Healthy Food for Kids : मुलांचा चांगला विकास व्हायचा असेल तर आहारातून त्यांचे उत्तम पोषण व्हायला हवे...

ठळक मुद्देमुलांच्या वाढीच्या वयात त्यांचे चांगले पोषण व्हायचे असेल तर त्यासाठी पालकांनी आवर्जून लक्ष द्यायला हवेआहार चांगला असेल तर शरीर आणि मेंदूची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांच्या आहाराबाबत पालकांनी काळजी घ्यायला हवी

मूल मोठं होऊ लागलं की त्याला अमुक एक नको, तमुक गोष्ट हवी अशी आवड निर्माण व्हायला लागते. मग लहानपणी आपण देऊ ते गपचूप खाणाऱ्या मुलांचे खायच्या बाबतीत नखरे सुरू होतात. अनेकदा त्यांना दूध, पालेभाज्या, पौष्टीक गोष्टी नको असतात. पण हेच त्यांना जंक फूड दिले तर मात्र ते अतिशय आवडीने खातात. पण शरीराचा, मनाचा आणि सगळाच विकास होत असताना मुलांचे योग्य रितीने पोषण होणे आवश्यक असते (Healthy Food for Kids). यासाठी मुलांच्या आहारात सर्व प्रकारचे पोषण देणारे अन्नघटक आवर्जून जायला हवेत. मूल खात नाही ही सबब न देता पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विशिष्ट पदार्थ त्यांच्या पोटात कसे जातील याची काळजी घ्यायला हवी. तसेच मुलांची प्रतिकारशक्ती चांगली हवी तर मुलांचा आहार चांगला असायला हवा. प्रतिकारशक्ती चांगली नसेल तर मुलं आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे आहारात आवर्जून असायलाच हवेत असे पदार्थ कोणते पाहूया...

(Image : Google)

१. हिरव्या पालेभाज्या 

रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि डायबिटीसपासून दूर राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अतिशय उपयुक्त असतात. शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्याचे काम या पालेभाज्यांच्या माध्यमातून होते. त्यामुळे या भाज्या आहारात असायलाच हव्यात. हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात शिजल्या किंवा खूप जास्त शिजल्या तरी त्यातून म्हणावे तितके पोषण मिळत नाही. त्यामुळे या भाज्या योग्य प्रमाणात शिजवणे आवश्यक आहे. 

२. बिन्स 

भाज्यांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिन्स आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. कार्बोहायड्रेटसचा उत्तम सोर्स असलेल्या बिया असलेल्या भाज्या, मटार, मसूर यांसारख्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच कॅन्सरपासून संरक्षण होण्यासाठी यांचा वापर आहारात उपयुक्त ठरतो. 

३. मशरुम 

छातीचा, पोटाचा कॅन्सर होऊ नये म्हणून आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा मशरुम आवर्जून खायला हवेत. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या महिला नियमित मशरुम खात होत्या त्यांना ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता ६४ टक्क्यांनी कमी होती. पण मशरुम कायम शिजवून खायला हवेत. ते कच्चे खाल्ले तर त्यातून काही इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

४. बेरीज 

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरी या गोष्टी आहारात अतिशय उपयुक्त असतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि पोषणमूल्य अधिक असते. यामध्ये अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने शरीर स्वच्छ होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मेंदूसाठी बेरीज खाणे अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे स्मरणशक्ती आणि मोटारस्कील सुधारण्यास मदत होते. 

५. बिया 

जवस, चिया सीडस, मगज बिया यांसारख्या बी वर्गातील गोष्टी मुलांच्या आहारात आवर्जून असायला हव्यात. दाणे प्रकारापेक्षा बियांमध्ये खनिजे, प्रथिने जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराचे चांगले पोषण होते. तसेच बियांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने त्याचा पोषण होण्यास चांगला उपयोग होतो.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआहार योजनाअन्न