मुलगा असो वा मुलगी ते मोठे झाले की त्यांनी कसं स्मार्ट असावं ( दिसायला नव्हे तर वागण्यात) असं प्रत्येक आई बाबांना वाटतं. पण स्मार्ट होणं ही एक प्रक्रिया आहे. मूल मोठं झालं की ते अचानक, एकाएकी स्मार्ट होतं असं नाही. मुलांना स्मार्ट करण्याची तयारी लहानपणापासूनच करायला हवी. मुलांना स्मार्ट बनवण्याचे उपाय कुठे छापील पुस्तकात किंवा इंटरनेटवर आयते मिळणार नाहीत. खरंतर प्रत्येक आई बाबा आपल्या कौशल्यातून हे करु शकतात. पण त्यांना मदत व्हावी यासाठी म्हणून या काही टिप्स. अर्थात त्या वाचून प्रत्येक आई बाबाला त्यांचे त्यांचे पर्याय नक्की सापडतील.
छायाचित्र- गुगल
मुलं स्मार्ट होण्यासाठी
1. मुलांशी सतत बोलत राहाणं, त्यांना प्रश्न विचारुन बोलतं करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. साधं दुकानात किंवा बाजारात खरेदी करताना जर आपल्यासोबत आपलं मूल असेल तर त्यांना घरी आल्यावर त्यांना दुकानात किंवा बाजारात काय दिसलं याबद्दल बोलायला हवं. या बोलण्यातूनच मुलांनाही नवनवीन प्रश्न पडतात. मुलं सोबत असतात तेव्हा जागरुकतेनं अवती भवती पाहतात. आपलं मनातलं मुलांनी सांगावं, आई बाबांशी मोकळं ढाकळं वागावं असं आई बाबांना वाटतंच. पण आधी लहानपणापासून मुलांना बोलतं करण्याची, त्यांना मन मोकळं करण्याची संधी आई बाबांनी मुलांना द्यायला हवी.
2. एखाद्या सहलीला मुलांना घेऊन गेलात तर ती जागा मुलांसोबत अनुभवताना मुलांना मुद्दाम प्रश्न विचारावेत. त्या विशिष्ट जागेबद्द्ल त्यांना कसं वाटतंय, त्यांना त्याबद्दल काय सांगायचं आहे का? हे विचारलं गेलं पाहिजे. घरी आल्यावर आपल्या सहलीबद्दल चित्र, माहिती किंवा कवितेतून काय वाटलं ते व्यक्त कर सारख्या कृती मुलांकडून करुन घ्यायला हव्यात. यामुळे मौज मजा यासोबतच मुलं अनुभव घ्यायला आणि अनुभव व्यक्त करायला शिकतात. यातून त्यांचं संवादाचं माध्यम मजबूत होतं. त्यांच्यातल्या छुप्या कौशल्याला वाव मिळतो. शिवाय एखादी गोष्ट अनुभवली आणि विसरुन गेलो असं होत नाही. घेतलेल्या अनुभवाला मुलांना व्यक्त करण्याची सवय लावली तर मुलांची स्मरणशक्ती दांडगी होते.
छायाचित्र- गुगल
3. मुलांना मोठं झालं की शिकवू घरकाम असं कधीच करु नये. मुलं मोठी होईपर्यंत जर त्यांना घरकामात सहभागीच करुन घेतलं नाही तर घरकामातून शिकल्या जाणार्या कौशल्यापासून ते वंचित राहातात. नंतर हे आपलं कामच नाही अशा पध्दतीनं घरकामाकडे बघतात. हा दृष्टिकोन जर मुलांमधे विकसित झाला तर मुलं स्वावलंबी होत नाही. स्वावलंबी मुलं ही नेहेमी स्मार्ट असतात. हे स्वावलंबन मुलांमधे लहानपणापासूनच रुजण्यासाठी मुलांना घरकामात सहभागी करुन घ्यावं. घरकामात मुलांना सहभागी करुन घेतल्यानं घरात असताना मुलं केवळ एकाजागी बसून राहात नाही. ती अँक्टिव्ह राहातात. त्यांना त्यांच्या वयाला साजेशा कामाची जबाबदारी द्यावी. ते काम त्यांनी केल्यावर त्यांना त्याबद्दल कौतुकाची पावती द्यावी. घरातल्या प्रत्येक कामात मुलांना सहभागी करुन घ्यावं. यामुळे मुलांना वेगवेगळ्या कामांची, कामाशी निगडित अनेक बारीक बारीक गोष्टींची माहिती होते. स्वयंपाक करताना मुलांना किमान भाजी निवडण्यासाठी, बाजारातून आणलेली भाजी वेगवेगळी करुन भरण्याकामी त्यांना सहभागी करुन घ्यावं. यादरम्यान मुलांसोबत जो संवाद घडतो त्यातून मुलांना स्वयंपाकाशी निगडित अनेक गोष्टींची माहिती देता येते, पौष्टिक आहार, त्याचे महत्त्व हे रुजवण्यासाठी स्वयंपाकघरातल्या कामात मुलांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
4. मुलांनी पसारा करायचा आणि तो मोठ्यांनी आवरायचा, असं चित्र बहुतांश घरात दिसतं. त्यामुळे मुलं थोडी समजदार झाली की त्यांना त्यांच्या खेळणी, त्यांचे कपडे, वह्या पुस्तक, दप्तर आवरण्याची, पलंगावरची चादर नीट करण्याची, त्यांचा त्यांचा पसारा आवरुन ठेवण्याची सवय लावावी. यामुळे मुलांना व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणाची सवय लागते. कुठली वस्तू कुठे ठेवायची असते हे त्यांना माहित होते. यामुळेही त्यांची बुध्दी तल्लख होण्यास मदत होते.