Join us  

'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 5:24 PM

मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

ठळक मुद्देमुलाला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात अशी माझी आणि पत्नीची इच्छा होती मुलांवर दबाव टाकून त्यांच्या करिअरला कधीच आकार देता येणार नाही.

प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. हे अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या करीयरमध्ये बिझी असले किंवा त्यांना स्टारडम मिळत असले तरी आपल्या कुटुंबियांना ते कायमच प्राधान्य देत असल्याचे दिसते. आर. माधवन त्याचेच एक उदाहरण असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आर. माधवन याचा मुलगा वेदांत हा राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेदांतला सहभागी व्हायचे आहे. त्यादृष्टीने तो आतापासून तयारी करत आहे. त्याच्याच करीयरसाठी आणि खेळातील प्रगतीसाठी आर.माधवन याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात जलतरणाच्यादृष्टीने पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे आपण पत्नी सरितासोबत दुबईमध्ये शिफ्ट होत असल्याचे त्याने म्हटले आहे. 

(Image : Google)

आपल्या मुलाच्या म्हणजेच वेदांतच्या करीयरविषयी बोलताना आर. माधवन म्हणाला, “मुंबईमध्ये सध्या कोविडमुळे बरेचसे जलतरण तलाव बंद आहेत. जे आहेत ते दूर अंतरावर आहेत. त्यामुळे त्याला योग्य पद्धतीने मोठ्या जलतरण तलावात सराव करण्याच्या दृष्टीने आम्ही दुबईमध्ये शिफ्ट झालो आहोत. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेची तयारी करत असताना आपल्या मुलाला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात अशी माझी आणि पत्नीची इच्छा होती त्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचेही आर. माधवन सांगतो. 

 

तो म्हणतो, वेदांतला ज्यामध्ये आवड आहे, ते क्षेत्र त्याने निवडावं. पालक म्हणून आम्ही त्याचासोबत आहोत. गेल्या काही काळापासून तो वेगवेगळ्या स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकतोय. त्याच्या या प्रगतीमुळे आम्हाला त्याचा अभिमान वाटू लागलाय. त्याने अभिनयाचे क्षेत्र नाकारले, याबद्दल मला कोणतेही दु:ख नाही. त्याने निवडलेलं क्षेत्र माझ्या करिअरपेक्षा मी जास्त महत्त्वाचे मानतो. मुलांवर दबाव टाकून त्यांच्या करिअरला कधीच आकार देता येणार नाही. त्यामुळे अभिनयापेक्षा त्याला खेळात अधिक रस असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पालक म्हणून त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आता ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्याला पुरवण्याकडे आम्ही दोघेही कटाक्षाने लक्ष देत आहोत.” असंही आर. माधवन म्हणाला. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यायला हवे असेच त्याला सांगायचे आहे. 

आर. माधवन आणि सुरविन चावला यांची ‘डिकपल्ड’ ही वेब सिरीज १७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. लग्नानंतर अनेक वर्षांनी ब्रेकअप करण्याच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या एका जोडप्याची ही गोष्ट असून त्याबद्दल आर. माधवनने नुकतेच महत्त्वाचे वक्तव्य केले होते. “हल्ली जोडपी अगदी सहज एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करतात. मात्र त्यामध्ये प्राधान्यक्रमांची वाट लागते. नात्यामध्ये काय महत्त्वाचे आहे हे दोन्ही बाजुंनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे नात्याची वाट लागण्याचे कारण म्हणजे खूप जास्त ताण आणि डिस्ट्रॅक्शन हे आहे. कॉर्पोरेट ट्रेंडमुळे लोक स्वत:ला अपूर्ण समजतात, मात्र हे योग्य नाही. असे तो म्हणाला होता.  

टॅग्स :पालकत्वआर.माधवनदुबईपोहणे