लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. लहान मुलांना जसे वाढवाल तसे ते वाढतात. आपण शिकवलेल्या विचारांवर आणि संस्कारांवर ते मोठे होतात. लहान मुले हट्टी आणि मस्तीखोर असतात. लहानपणी मस्ती करूनच आपण सगळे मोठे झाले आहोत. मस्ती केल्यानंतर आई - बाबांचा ओरडा खाणे ही सामान्य बाब आहे. मात्र, काही मुलांना मारल्यानंतर ते आणखीन मस्तीखोर होतात.
काही पालक आपल्या पाल्यांवर एवढे रागावतात की, त्यांच्या वयाचे भान न ठेवता मारझोड करतात. मात्र, ही मारझोड आपल्या लहान मुलांच्या बालमनावर घाव करून जाते. त्यांच्यावर केलेला हिंसात्मक प्रकार त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. अशा परिस्थितीत त्यांच्या बाल मनावर आपल्या आई - वडिलांविषयी नकारात्मकतेची भावना उद्भवते. त्यामुळे आपल्या पाल्यांवर शिस्त लावण्याआधी त्यांच्या मनाचा देखील विचार करणे आवश्यक.
आई - बाबांप्रती असलेला आदर कमी होतो
काही पालक आपल्या पाल्यांवर छोट्या - छोट्या गोष्टींवर हात उगारतात. त्यांना सतत मारल्यानंतर पाल्यांच्या मनातील भीती कमी होत जाते. हळूहळू ते आपल्या पालकांचे म्हणणे टाळू लागतात. जस जसे मुले मोठे होतात तस तसे ते आपल्या पालकांचं ऐकणं देखील बंद करतात. पालकांप्रती असलेला सन्मान आणि आदर कमी होत जातो. त्यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्यावर रागवू नका.
लक्ष भटकते
पालकांनी मारल्यानंतर मुलांचे लक्ष भटकायला लागते. मुलांचे लक्ष नेहमीच मारहाणीच्या प्रकरणावर राहते. इतर कशावरही त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. प्रत्येक काम करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या मनात पालकांविषयी भीती निर्माण होत जाते.
कारण नसताना रागावणे
अनेकदा आपण ऐकलं असेल की, मुलं जे पाहतात तेच करायला जातात, आणि त्यातूनच गोष्टी शिकतात. अशा परिस्थितीत पालकांचे वागणे त्यांच्यावर प्रभाव पाडतो. या कारणास्तव अनेक वेळा मुले विनाकारण राग दाखवू लागतात. सामाजिकदृष्ट्या मुले उद्धट होतात.
पालकांपासून दूर होतात
मुलांना मारल्यानंतर, ते हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. नात्यात दुरावा निर्माण होतो. ते प्रत्येक गोष्टी पालकांपासून लपवू लागतात. मुलांच्या मनात भीती निर्माण होते. त्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
आत्मविश्वास कमी होतो
मुलांना मारहाण केल्याने त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. सतत मारहाण केल्यानंतर त्यांना अपराधी असल्यासारखे वाटू लागते. अशा परिस्थितीत त्यांचा आत्मविश्वास कमी होत जातो. कोणतेही काम करण्यापासून ते स्वतःला थांबवतात. त्यांना असे वाटते की ते कोणतेही काम नीट करू शकणार नाहीत. याचा थेट परिणाम शालेय शिक्षणावर पडू लागतो.
मनात हिंसेची भावना वाढते
मारहाणीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. ते आपल्या ते आपल्या मित्रांशी आणि लहान भावंडांशी कठोरपणे वागू लागतात आणि त्यांना मारण्यास सुरुवात करतात. त्यांचे मन एक हिंसात्मक वळण घेऊ लागते.